काल बऱ्याच वर्षांनी शाळेतला मित्र भेटला. फॉर्मालिटी प्रमाणे जुन्या गोष्टी, आठवणी झाल्या. बऱ्याच गप्पा झाल्या.
त्याला विचारलं
” काय करतोस आजकाल?”
” आय हॅव क्वाईट ए फिव व्हेंचर्स ऑफ माय ओन”
” हं..ग्रेट. म्हणजे एंटरप्रेन्युर झालायेस एकुण. ” – मला कौतुक वाटलं.
“आंत्रप्रन्योर…आंत्रप्रन्योर”
” ते शरद तांदळे यांचं पुस्तक ना. त्याची पण एजन्सी आहे का तुझी. वाह! छान”
” अरे बावळट ( खरं म्हणजे त्याने त्याच अर्थाचा शुद्ध तुपात तळलेला आणि साखरेत घोळलेला ‘ च ‘ च्या बाराखडीने सुरु होणारा शब्द वापरला होता पण इथे तो देता येत नाही. ) इट्स आंत्रप्रन्योर, नॉट एंटरप्रेन्युर . डोन्ट स्पॉइल द वर्ड्स मॅन”
” अच्छा. ओके. लक्षात ठेवेन यापुढे”
हा माणूस सतत इंग्रजीतच बोलत होता पण शिव्या मात्र मराठीतूनच देत होता. एक मात्र नक्की, इंग्रजीतल्या चित्रपटातून ऐकलेल्या ‘२- ४ शिव्या कुठे आणि मातृभाषेतला शिव्यांचा खजिना कुठे. कोणी कितीही इंग्रजाळलेला असो पण जेव्हा सिरीयसली शिव्या घालायची वेळ येते तेव्हा मातृभाषेशिवाय दुसरा पर्याय नाही.
असो.. मग बोलत बोलत आम्ही त्याच्या कार पर्यंत आलो.
” विच वन इज युवर्स? ”
” दॅट वन देअर” – मी माझी बाईक दाखवली
” ओह..यु आर युजींग अ बाईक” – त्याला झालेली निराशा आणि आनंद एकत्र स्पष्ट दिसत होता.
आम्ही त्याच्या गाडी कडे आलो.
” वोक्सवेगन जेट्टा का?
” अरे बावळटा ( या वेळेस त्याने पुन्हा Y आणि Z या अद्याक्षराने सुरु होणारा समानार्थी शब्द वापरला.) इट्स फॉक्स वॅगन नॉट वोक्सवेगन. डोन्ट स्पॉइल द वर्ड्स मॅन”
आता आलेली जिवावर लपवत मी विचारलं
” अजुन तिथेच राहतोस का?”
” नोप! हॅव मुव्ह्ड तो वेस्टर्न लॉंग बॅक. नाऊ अॅम इन बॅंड्रा ”
” वेट अ मुमेंट. व्हॉट डिड यु से? अरे बावळटा ( मी पण मग इथे ‘भ’ च्या बाराखडीतला शब्द वापरला)
इट्स वांद्रे नॉट बॅंड्रा. डोन्ट ब्लडी स्पॉईल द वर्ड्स”
आणि गाडीला किक मारून निघून गेलो.
– अमोल पाटील.
Leave a Reply