गोष्ट तशी बरीच जुनी आहे. माझ्या मामाचा एक मित्र आहे. आपण त्याला सौमित्र देशपांडे म्हणूया. आता ह्या सौमित्र मध्ये मित्रची क्वांटिटी तशीच कमीच. म्हणजे जे मित्र झाले ते झाले बाकी नवीन व्हायची शक्यता तशी कमीच. लोकांशी नडायला भांडायला एक नंबर म्हणजे मोबाईल फोन वर टाईमपास करता येण्याच्या उगम व्हायच्या आधी हा जर कोणाची वाट पहात उभा असेल तर आल्यावर हा कोणाशी तरी भांडतांना आढळायचा का तर वाट बघता बघता वेळ घालवायला काहीतरी हवं म्हणून एखाद्याशी कारण नसताना भांडण उकरून काढायचं म्हणजे तेवढाच टाईमपास.
पण जे काही मित्र आहेत त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर जीव ओवाळून टाकतो. पण विषय तो नाहीये.
त्या काळी आपल्याकडे गावावरून कोणी पाहुणे आले तर ते परत जाताना त्यांना सोडायला स्टेशन अथवा बस स्टॅन्ड पर्यंत जायचे आणि गाडीत बसवून,गाडी निघाल्यावर पार टाटा करूनच परत येण्याची पद्धत होती बहुतेक ते पुहा परत गेल्यापावली परत येणार नाही याची खात्री करण्यासाठी असेल. तर ते काम घरातील तरुण मुलांकडे असायचे. तर एकदा असेच काम सौमित्र कडे लागले. सकाळी ५ ला उठून त्याला पाहुण्यांसोबत स्टेशनला दामटण्यात आले. जीवावर आले तरी तो गेला. गाडी येऊन ते जाई पर्यंत चांगले साडे पाच पावणे सहा झाले होते पण दिवस थंडीचे असल्यामुळे अंधारच होता. परत येत असताना अर्ध्या रस्त्यात त्याला जाणवले की आपली रोजची वेळ आता झालेली आहे आणि काल रात्रीचा पाहुणे स्पेशल मेनू आता पोटात राहायला काही तयार नाहीये. बरं त्याचं पोट ही त्याच्यासारखं वात्रट घरी जाई इतपत दम धरायला तयार नाही. त्याला राईट हिअर राईट नॉव खाली व्हायचं होतं.
आसपास कुठे सुलभ कंपनीचे रिलीफ सेंटर ( थोडक्यात शौचालय) ही दिसत नव्हते. सौमित्र कासावीस झाला. एक पाऊलही पुढे टाकले जात नव्हते. केव्हाही पॅन्टचा कलर बदलेल अशी परिस्थिती झाली होती. रस्त्यावर रहदारी थोडी थोडी सुरु झाली होती. तरी बरं रस्त्याच्या दोघं बाजूला झाडी होती. पोट अनावर झालेला सौमित्र काय होईल ते बघू असं म्हणत बाजूच्या झाडीत घुसला आणि बसणार तेवढ्यात विचार आला पाण्याचं काय?? धुणार कशी? पण म्हणतात ना देव आहे तसं थोडाच पुढे सौमित्र ला एक जण बसलेला दिसला. समोर बऱ्यापैकी मोठं टमरेल होतं त्यात दोघांचं भागलं असतं. बसल्या बसल्या दात पण घासत होता म्हणजे मल्टिटास्किंग चाललं होतं
सौमित्र पुढे जाऊन त्याला थोडा लांबूनच म्हणाला – “” भैया, थोडा पाणी मुझे भी देना प्लिज. चलते चलते अचानक जोर से लग गयी यार””
कुठल्या परिस्थितीत कोण कसा भाव खाली सांगता येत नाही.
त्याने दात घासणं थांबवून वर पाहिलं आणि एकदम खेकसला “” पाणी वानी कुछ नाही है भागो. किधर और से लेलो. साला संडास आये है बिना पाणी के””
सौमित्र काकुळतीला येऊन म्हणाला “” प्लिज भैया इमरजेंसी है थोडा सा दे दो. भलेही तुम्हारा होने के बाद जो बचेंगा उसमेसे देना.”” एरवी गुरगुरणारा सौमित्र चक्क विनंत्या करत होता. देव कोणावर काय वेळ आणेल सांगता येत नाही.
“” अबे भाग यहा से. बोला ना नाही है पाणी. भाग. आ जाते है कहाँ कहाँ से”” असं म्हणून त्याने बसल्या जागी ब्रश तोंडातून काढून एक पिंक मारली आणि शेजारी पडलेला एक छोटासा दगड सौमित्र च्या दिशेने भिरकावला.
आता मात्र सौमित्रची सटकली. तो ताड ताड त्या बसलेल्या माणसाजवळ गेला आणि त्याला काही कळायच्या आत झटक्यात त्याच्या पुढचं टमरेल उचलून पळाला तो सरळ रस्ता क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जाऊन बसला.
इकडे टमरेल वाल्याला कळलं काय झालं तो एकदम हैराणच झाला. आधी तर तो सौमित्र ला शिव्या द्यायला लागला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की शिव्या देऊन काही उपयोग नाहीये. आणि अशा अवस्थेत त्याला सौमित्रच्या मागे पळता काय चालता पण येणं शक्य नव्हतं आणि पुन्हा तशाच अवस्थेत तो आता बऱ्यापैकी वाहतूक सुरु झालेला रस्ता पार करावा लागला असता.
आता काकुळतीला येण्याची पाळी त्या टमरेल वाल्याची होती. म्हणतात ना नियतीची लीला अगाध आहे. देव कोणावर कधी काय वेळ आणेल सांगता येत नाही.
क्षणांपूर्वी सौमित्रला झिडकारून लावणारा टमरेल वाला कसातरी बसल्या बसल्या सरकत स्त्याच्या जवळ पण आडोशात येऊन सौमित्र ला विनंती करत होता.
“”गल्ती हो गयी दादा. दुबारा नही होगी. पर थोडा पाणी मेरे लिये भी रखना भाई “”
इकडे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आता आरामात बसलेला सौमित्र “” अरे हाड तिच्या…., तेरेसे थोडासा पाणी मांगा था दे देता तो दोनो का काम होता. तेरे उपर ये नौबत नाही आती. अब भाड मे जा. पत्ते से पोंच्छ या कागज से. मेरे को मत बोल “”
“” ऐसा मत करो भाई. कल से आपके लिये भी अलग डब्बा लाते जाऊंगा पर थोडा पानी देना यार””
“” तू क्या चाहता है? मैं रोज इधर —–ने आऊं? “”
असा रस्त्याच्या दोन्ही बाजूने त्यांचा संवाद चालला. टमरेल वाल्याच्या विनंत्या सुरूच होत्या. थोड्यावेळाने सौमित्र चं काम झालं. त्याने त्याची स्वच्छता केल्यावर दया बुद्धीने थोडं पाणी टमरेलात बाकी ठेवले.त्याला माहिती होतं की टमरेल वाला धुवून झालं की आधी त्यालाच शोधत बसेल म्हणून हळू हळू जाऊन त्याने ते टमरेल रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला झाडीत ठेऊन दिले. आणि मग थोडं पुढे जाऊन आवाज दिला “” वो डब्बा और पाणी ऊस पेड के बाजूने रखा है लेलो “” अन पळून गेला. तरी बरं अजून अंधार पूर्ण गेलेला नव्हता त्यामुळे दोघांना एकमेकांचे चेहरे स्पष्ट दिसले नव्हते.
आणि अशा रीतीने सकाळी सकाळी शांत चित्ताने, मोकळ्या पोटाने आणि परोपकार केल्याच्या भावनेने ओतप्रोत झालेला सौमित्र सुखरूप घरी पोहोचला आणि एका प्रसन्न दिवसाला सुरुवात केली.
— अमोल पाटील.
Leave a Reply