नेहमी चर्चा होत असतात की बाहेर सहलीला गेल्यानंतर आलेले भयानक अनुभव. आता या अनुभवांसाठी भुतंखेतं काहीतरी विचित्र घटना असलं पाहिजे असं काही नाही. भयानक अनुभव म्हणजे काय की जो तुमची झोप उडवून टाकतो.
आता हेच पहा ना तुम्ही तुमच्या नव्या कोर्या करकरीत फ्लॅटमध्ये २-३ दिवसांपूर्वीच शिफ्ट झाले आहात. बिल्डिंग मध्ये तसे अजून जास्त लोकं राहायला आलेले नाहीत आणि आले असले तरी तुमचा अजून त्यांच्याशी परिचय झालेला नाहीये. तशातच तुमची दहा दिवसांची सुट्टी मंजूर होऊन बऱ्याच वेळा पासून प्लॅनिंग सुरू असलेल्या विदेशातल्या टूर वर तुम्ही सगळं कुटुंब गेलं. ( आता नवीन फ्लॅट घेणे आणि आणि विदेशात दूरवर जाणे हे एकत्र कसे परवडेल हा प्रश्न विचारू नका कारण ही एक हायपोथेटिखल सिच्युएशन आपण घेतली आहे).
तुमचं सगळं कुटुंब अतिशय आनंदात आहे. उतरल्यानंतर तुम्ही पूर्ण दिवस इकडे तिकडे फिरण्यात मौज मजा करण्यात घालवलेला आहे. पण तिथे आल्यापासून तुम्हाला मनामध्ये काहीतरी चुकल्यासारखं वाटत असतं. संध्याकाळी हॉटेलच्या आलिशान रेस्टॉरंट मध्ये जेवण करून तुम्ही तुमच्या रूममध्ये येता. दिवसभराच्या घडामोडींच्या एकमेकांशी गप्पा मारता आणि मग थकलेले तुम्ही कॉटवर आडवे पडता.
रात्री कधीतरी अचानक तुमचा डोळा उघडतो. त्या गडद अंधारात आणि एसीच्या थंड हवेत तुम्ही विचार करत असता आणि मग अचानक तुम्हाला आठवतं की अरे काल घरी पाणी गेलेलं होतं आणि पाणी आलेलं कळावं म्हणून तुम्ही बेसिनचा आणि बाथरूमचा नळ सुरू ठेवलेला होता. .. आणि मग तुम्ही विचारात पडता की आपण निघालो त्यावेळेस आपण नळ बंद केला होता की नाही? आणि मग लगेच दुसरा विचार येतो हिने निघताना गॅसच बटन तर चेक केलं होतं ना? मग लक्षात येतं की ही तर मुलांना घेऊन आधीच घराबाहेर पडली होती आणि घर लॉक तुम्हीच केलं होतं.
नवीन बिल्डिंग असल्यामुळे अजून जास्त कोणी राहायला आलेलं नाहीये आणि नुकतीच चावी ताब्यात घेतलेली असल्यामुळे कोणाकडे दुसऱ्या चावीचा सेटही दिलेलं नाहीये.
बस्स, त्या क्षणानंतर पुढचे उरलेले सर्व दिवस तुमची सहल तुमच्यासाठी एक भयानक अनुभवच राहील.
— अमोल पाटील.
Leave a Reply