माझ्या घराजवळच्या बाजारात एक फेरी वाली बाई बसते. घरगुती वापराचे छोटे-मोठे सामान विकायला ती बाई तिथे जमिनीवर मांडून बसते. तिच्या सोबत नेहमी तिची एक चार-पाच वर्षांची लहान मुलगी असते. नवरा क्वचित काहीतरी सामान आणताना नेताना दिसतो पण शक्यतो ही बाई आणि मुलगी या दोघीच असतात.
एकंदर वागण्या बोलण्यावरुन ती चांगली सुशिक्षित आणि चांगल्या घरातली वाटते. माझी पत्नी नेहमी काही घ्यायचं असेल तर तिच्याकडं घेत असते त्यामुळे त्यांच्या थोडासा परिचय आहे.
त्या दिवशी असंच आम्ही दोघं बाजारात गेलो असताना माझी पत्नी तिच्याकडून काही सामान घेण्यासाठी थांबली. त्या दिवशी त्या बाईचा मुड अतिशय खराब वाटत होता. तिचं धंद्याकडे लक्षच नव्हतं. असं वाटत होतं की तिला कोणाची काही पडलेलीच नाही. तिला मी काही विचारले तर “लेना है तो लो नही तो रहने दो” टाईपचे उत्तरं देत होती.
तिचं असं वागणं पाहून माझ्या जीवावर आले मी पत्नीला म्हटलं की तिच्याकडे राहू दे. पुढे मिळून जाईल ती वस्तू तिथून घेऊ या.
पण माझ्या पत्नीने तिच्याकडूनच वस्तू घ्यायचा हट्ट धरला म्हणून मग नाईलाजास्तव मी पुढे इतर बाजार करायला गेलो. मला तिचं ते तुसडेपणा वागणं जराही सहन झालं नव्हत.
काही वेळाने मी परत आलो तेव्हा माझी पत्नी आणि ती बऱ्यापैकी गप्पा मारत होत्या आणि ती बाई पण व्यवस्थित बोलत होती.
पण माझ्या डोक्यात अजूनही तिचं ते वागणं भिणभिणत होतं म्हणून मी पत्नीला म्हटलं ” तू पण काय हट्ट करून बसते तिच्याकडून च वस्तू घ्यायच्या?? बोलणं बघितलं का तिचं? गिऱ्हाईकांशी असं कोण बोलतं? आपण काय फुकटात वस्तू घेतो क??”
त्यावर माझ्या पत्नीने सांगितलं की तिलाही आज त्या बाईचं वागणं खटकल पण ती नेहमीच असं वागत नाही म्हणून हिला वाटलं की नक्की काहीतरी चुकलं आहे म्हणूनच मुद्दामच ही तिच्याशी बोलत थांबली तेंव्हा कळलं की आज जेव्हा ती सामान घेऊन आली आणि लावत होती त्यावेळेस जरा फक्त काही कारणास्तव मागे वळली तितक्या वेळात कोणीतरी मोटरसायकवर येऊन तिचं एक गाठोडे घेऊन पळाला. हिच्या लक्षात येई पर्यंत तो बऱ्याच दूर निघून गेला होता.
जवळ जवळ २-३ हजाराचे सामान होते. एका समानामागे ५-१० रुपये सुटणाऱ्या तिच्यासाठी ती रक्कम खूप होती. नफा तर सोडूनच द्या पण आता पदरचेच २-३ हजार गेले होते. म्हणून तिचं मनच लागत नव्हतं आणि चिडचिड होत होती आणि तिचं ते छोटं लेकरू बिचारं आज आई असं का वागते आहे या विचाराने कावरंबावरं होऊन बसलं होतं.
माझ्या पत्नीशी बोलल्यानंतर तिला जरा बरं वाटलं. नंतर तिने तिच्या नवऱ्याला फोन करून सगळं सांगितलं. तो ही समजदार होता. त्यानेही तिला समजावून सांगितलं तेव्हा ती थोडी शांत झाली होती.
आणि हे सगळं समजेपर्यंत उगाच आपला गैरसमज करून बसलेला मी आता त्यांना कशी मदत करता येईल यावर चर्चा करू लागलो.
एकूण पुढे लक्षात ठेवायचं ठरवलं की जर एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल दिसत असेल तर नक्कीच त्यामागे काही महत्वाचे कारण असणार उगाच त्यावरून त्या व्यक्तीची पारख करणं योग्य नाही.
–अमोल पाटील
Leave a Reply