टीप : हे खाली मी जे काही लिहिलंय ना ते अगदी कंटाळून गेल्यामुळे लिहिलंय. कोणाला ही दुखवायचा हेतू नाहीये सो प्लिज डोन्ट माईंड…
सोशल मीडिया आल्यापासून काही नतद्रष्ट लोकांनी चंगच बांधलेला आहे की आपल्याला एक ही सण आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने करू द्यायचा नाही. हे लोक इतर वेळेस झोपलेले असतात पण एखादा सण आला की यांना जाग येते आणि मग पोस्ट सुरु होतात.
” लेट्स सेलेब्रेट वॉटरलेस होली”, ” कृपया दहीहंडीत पाणी वाया घालवू नका”, ” गणपती मध्ये मूर्ती च्या बनावटीवर, उंचीवर, यांच्या पोस्ट्स सुरु होतात, नवरात्रीत पण सुरु असतात. इ. इ.
आता दिवाळी आली तशी यांना वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण याच्या बद्दल चिंता वाटायला लागल्या आणि मग से नो टू क्रॅकर्स वगैरे सुरु झालं.
काही बाबतीत त्यात तथ्य ही असतं पण यांचं मत असतं की डायरेक्ट बंदीच घाला. म्हणजे दही हंडीच्या उंचीवर कंट्रोल हवा हे खरंय पण यांचं म्हणणं असतं की गोविंदा एकदम बंदच करून टाका.
होळीत रंग उडवण्याचा पण यांना त्रास होतो कारण पाणी वाया जातं. जणू यांच्या गाड्या वर्षभर बिनपाण्याच्या धुतलेल्या असतात.
आता सुतळी बॉम्ब किंवा लक्ष्मी बॉम्ब ( ह्या नावाचा बॉम्ब आमच्या जमान्यात खरंच होता. उगाच भावना दुखावल्याचा आळ माझ्यावर नको यायला म्हणून सांगितलेलं बरं) हे खरोखर कानाचे पडदे फाडणारे होते त्यांना बंद केलं ते ठीक आहे. पण यांचं म्हणणं की बाकीचे पिटिक, पुटूक आवाज करणारे आणि आवाज न करणारे पण बंद करून टाका. का तर म्हणे प्रदूषण करतात. बहुतेक आजकाल जगात होणारं प्रदूषण हे सगळं दिवाळीच्या फटाक्यांमुळेच होत असेल. यांच्यातली काही मंडळी नवीन वर्षाची आतषबाजी वगैरे बघायला विदेशात किंवा मुंबई, गोवा अशा ठिकाणी जातात किंवा मग यांचे साहेब निवडून येतात किंवा मॅच जिंकल्यावर किंवा लग्नसराईत जेव्हा फटाके फोडले जातात त्यावेळेस प्रदूषण होत नसतं ते फक्त दिवाळी स्पेशल असतं.
बाकी एक पाहिलंय की दिवाळी नंतर कमीतकमी महिनाभर तरी मच्छर चावत नाहीत. बहुतेक फटाक्यांच्या धुराने डास, मच्छर मरत असावेत किंवा आवाजच्या भीतीने पळून तरी जात असावेत.
गेल्या काही दिवसांपासून एक जण आपला सारखा कुठले तरी गरीब दिसणाऱ्या लहानमुलांचे कोमेजलेले चेहऱ्याचे फोटो पोस्ट करून खाली लिहीत होता – ” इनकी भी तो दिवाली हैं”
हो हैं न. आम्ही कुठे नाही म्हणतो. मग?
खाली वाचलं- पोस्ट को लाईक और शेअर करो.
म्हणजे याच्या पोस्ट ला लाईक आणि शेअर मिळाव्या म्हणून हा तुम्हाला फराळाच्या प्रत्येक घासागणिक गिल्टी फील करवणार.
त्याला फोन करून विचारलं की बाबा ही मुलं कोण ?
” माहिती नाही, मला कोणीतरी पाठवल मी फेसबुकवर पोस्ट करून टाकलं.”
“बरं मग उसकी भी दिवाळी चांगली जाण्यासाठी तू काय केलं? ”
” अरे, मी काय करणार? मला काय माहिती ते पोरं कोण आहेत नि काय आहेत. ते सोड फराळाला केव्हा येतोयस? चकल्या आणि चिवडा मस्त झाला आहे. संपून जाईल. लवकर ये ”
” अरे टिम्ब टिम्ब टिम्ब टिम्ब, तशा मुलांच्या बाबत मला जे करायचंय ते मी करतोय आणि इतर सगळेच करतात त्यांच्या परीने. आणि वरून तुझ्यासारखे .. अजून आम्हाला गिल्टी फील करणार. चकल्या आणि चिवडा माझ्यासाठी बाकी ठेव. लाडू संपवलेस तरी चालेल ”
बाय द वे हे म्हणतात त्याप्रमाणे माझ्या पाहण्यात अजून तरी फटाके ऐकून लपून बसणारा किंवा बहिरा झालेला कुत्रा पाहण्यात आलेला नाही. आमच्या इथले कुत्रे उलटे आमच्यासारखे गंमत बघायला उभे राहतात. हे मी रस्त्यावरच्या कुत्र्यांबद्दल बोलतोय पाळीव कुत्र्यांबद्दल मला माहिती नाही.
इतर देशात पर्यावरणासाठी खरी ख्रिसमस ट्री कमी नुकसानदायी की आर्टिफिशियल कमी नुकसानदायी यावर चर्चा होतात आणि लोकांनी कुठली वापरणं योग्य ठरेल हे सुचवलं जातं. त्यांचं ही त्याच्यावर एकमत अजून होत नाहीये हा भाग वेगळा पण ख्रिसमस ट्री एकदम बंदच करून टाका असं नाही म्हणत. आपल्याकडे मात्र एकदम बंदच करायची मागणी होते. असो..
या लोकांनी तर लॉकडाऊन पण नाही सोडला. त्याकाळात लोक बिचारे घरात बसून काहीतरी स्पर्धा, काही पक्वान्न बनवून शेअर करत होते. इतर करण्यासारखे काहीही नव्हते पण इथेही काही कपाळकरंटे ” तिकडे डॉक्टर दिवसरात्र काम करताहेत, सैनिक बॉर्डरवर पहारा करताहेत आणि तुम्ही मात्र फोटोसेशन करताय, वेगवेगळ्या रेसिपीज बनवून खाताय” असं काही बाही टाकत होते. त्यात गरीब भुकेने मरताहेत असं वरून अजून टोमणा.
आता आम्ही जर रेसिपीज बनवल्या नाहीत तर आमचा किराणा संपेल कसा आणि मग त्या किराणा वाल्याच घर चालायचं कसं? आम्ही खर्चच नाही केला तर पैसे फिरेल कसा, सरकारला उत्पन्न येईल कसं? आणि मग इतर सुविधा मिळतील कशा? हे जाणण्याएवढे डोके ते वापरत नाहीत.
माझं ऑब्झरव्हेशन आहे की त्याकाळात माझ्या एरियात गरिबांची जेवढी सोय झाली ना तेवढी कोणाचीच झाली नाही. इतर ठिकाणी मला माहिती नाही. प्रत्येक राजकारण्याने, समाजसेवकाने, जे काही वाटप केलं ते सगळं गरिबांना. यांच्यात मेला तो मध्यमवर्गीय. पगार बंद झाले, सामान मिळणं दुरापास्त झालं, बरं भिडेमुळे अन्न वाटपाच्या रांगेत उभे राहणे शक्य होत नव्हते. त्यातल्यात्यात परिचायतली सगळी मंडळं, व्हाट्सअँप ग्रुप, समाजाचा ग्रुप, सोसायटी वाले आणखी या सगळ्यांना गरिबांना दान करून त्याचे फोटो काढायची हौस आली होती आणि सगळ्यांना वर्गणी आपल्याकडूनच पाहिजे होती. अशा परिस्थितीत कसतरी स्वतःला एंटरटेन करायचा प्रयत्न केला तर हे आहेतच टोमणे द्यायला. एकानेही विचारलं नाही ‘मध्यमवर्गीय का भी लॉकडाऊन है. उसका कैसा होयेंगा?”
एकदा असंच एका मंडळाबरोबर गेलो होतो एका सो कॉल्ड गरीब वस्तीत किराणा वाटप करायला. त्यांच्या कडे बाकी सगळ्या गोष्टी होत्या फक्त किराणाच कसा काय नव्हता काही कळत नाही. त्या गरिबांचे मोबाईल बघून मी माझा मोबाईल लपवूनच ठेवला. उगाच आपली इज्जत जायला नको. पुन्हा गेलोच नाही. जाऊ द्या, गेले ते दिवस.
एकूण अशा लोकांना फाट्यावर मारावं आणि खुशाल सण एन्जॉय करावेत नाहीतर पुढच्या पिढीला प्रत्येक सणाला घरात गुपचूप बसून पूजा अर्चा होते आणि इतर कुठलेही ऍक्टिव्हिटीज होत नाहीत असंच वाटत राहील. आणि आनंदाचे क्षण आनंदात साजरे करावेत. बाकी समाजाबद्दलचं आपलं कर्तव्य आपल्याला माहिती असतं आणि आपण ते पार पाडत असतोच.
तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
–अमोल पाटील.
Leave a Reply