नवीन लेखन...

उगाच काहीतरी -२०

लेट सिटींग
डिस्कलेमर : हे माझं वैयक्तिक निरीक्षण आणि मत आहे. तुमचे विचार वेगळे असू शकतात.
‌आपल्या भारतीयांचे काही वैशिष्ट्य असतात म्हणजे भारतीय मेहनती असतात. प्रामाणिक असतात, आणि लवचिक असतात.याचे उदाहरण म्हणजे आपल्याकडच्या कॉल सेंटर वगैरे. परदेशी वेळेच्या हिशोबाने आपल्याकडे काम करण्याच्या जी लवचिकता आहे त्यामुळेच आपल्याकडे bpo आणि कॉल सेंटर एवढ्या प्रमाणात स्थापित होऊ शकले आहेत.
जागतिककरणानंतर बरेच मल्टिनॅशनल कंपन्यांचे कॉर्पोरेट ऑफिस आपल्याकडे आले. आणि त्या वैशिष्ट्या मध्ये आणखी एक भर पडली ते म्हणजे लेट सिटींग म्हणजे ऑफिस मध्ये उशिरापर्यंत बसण्याची क्षमता.
आता मी जरी याला वैशिष्ट्ये म्हणालो तरी माझ्या दृष्टीने अतिशय घाणेरडे वैशिष्ट्य आहे. आणि खास करून खाजगी कॉर्पोरेट क्षेत्रात हे खूप प्रमाणात चालत.
लेट सीटिंग म्हणजे ऑफिसचे तास संपल्यानंतर उशिरापर्यंत ऑफिसमध्ये राहणे अथवा काम करणे. मला एक गोष्ट कळत नाही जे काम तुम्ही नऊ तासात नाही करू शकले ते ऑफिस नंतर अजून दोन-तीन तास थांबून होणार आहेत का?
पण नाही आपल्याकडे ऑफिसला उशीरापर्यंत थांबणे हा प्रेस्टीज इशू असतो. अतिशय नाईलाज असेल तेव्हा अथवा खरंच काही काम असेल तर थांबणे वेगळे पण रोजच स्वतः थांबणे आणि तुमच्या टीमला हे थांबवणे हे वाईटच.
मी बऱ्याच बॉसना बोलताना ऐकले आहे की ” My official time is till six but I mostly leave office after 9.00 pm” किंवा असंच काहीतरी. आणि हा रिकामटवळा संपूर्ण दिवस कॉफी पिणे, सिगारेटी फुंकणे आणि एक-दोन कॉन कॉल अटेंड करणे या व्यतिरिक्त काहीही करत नसतो. सहा वाजे नंतरही तो काही मोठा तीर मारत असतो असं नाही पण मी लेट पर्यंत थांबतो हे मॅनेजमेंटला दाखवण्यासाठी बऱ्याच जणांचा हा खटाटोप चालू असतो. यात मरण होतं ते त्यांच्या सबोर्डीनेट चं. हा थांबतो म्हणून त्या बिचाऱ्याला पण थांबावं लागतं.
‌माझं एक निरीक्षण असं आहे की जे टॉप मॅनेजमेंट असतात जसे सीईओ किंवा MD अथवा चेअरमन, ते कधीही ऑफिस टाइमिंग नंतर थांबत नाहीत. हा रिकामा उद्योग फक्त मिडल मॅनेजमेंट वाले करतात.
‌ एका प्रतिष्ठित मीडिया हाऊस मध्ये असताना माझी सुटायची वेळ होती ५.३० पण आमचा टेक्निकल हेड मीटिंग केव्हा लावायचा? संध्याकाळी ७.३० -८.०० ला. ती पार दीड दोन तास चालायची आणि मग तो कारमध्ये बसून सुरर्कन निघून जायचा आणि आम्ही बिचारे ऑफिस वरून स्टेशन आणि स्टेशन वरून लोकल पकडून घरी जायचो. आणि हे रोज चालायचं. शेवटी मग आम्ही वेळेवर निघायला सुरुवात केली. याचा फोन आला की मेसेज करायचो ” Almost reached home” आधी काही दिवस त्याने संताप केला पण नंतर तो ही समजून गेला हे थांबणारे नाहीत आणि आम्ही नसू तर मीटिंग कोणाची घेणार मग म्हणून तो ही वेळेवर निघून जायला लागला.
‌एका मल्टी नॅशनल बँकेत असताना एक डिपार्टमेंट हेड हा रोज रात्री साडे अकरा – बारा शिवाय घरी जायचा नाही आणि त्याच्या स्टाफला ही सोडायचा नाही. ऑफिसची इमारतीत फक्त दिवसा चालणारे ऑफिसेस होते त्यामुळे बिल्डिंग मॅनेजमेंट हे संध्याकाळी सात वाजता मुख्य एसी प्लांट बंद करून टाकायचे. पण हा आपला बसायचा म्हणून त्यांना प्लांट सुरू ठेवावा लागायचा आणि तेवढ्या वेळेचा संपूर्ण चार्ज ते आमच्या बँकेकडून घ्यायचे. त्याला बऱ्याचदा सांगूनही तो ऐकत नव्हता. आम्हाला कामं असतात असं त्याचं म्हणणं असायचं.
‌शेवटी मग तिथल्या अडमिन हेड ने संध्यकाळी ७. ०० नंतर येणारे बिल सरळ त्या डिपार्टमेंट कडून वसूल करायला सुरुवात केली. आणि महिन्याला लाखो रुपये आपल्या बजेट मधून जाताहेत म्हटल्यावर तो ऑफिस सुटल्यावर लगेच घरी निघून जायला लागला. आणि त्याच्या ज्युनिअर चा ही जीव भांड्यात पडला. एकूण निष्कर्ष की हा उशिरा थांबून कुठलं ही असं काम करत नव्हता जे ऑफिस वेळेत झालं नसतं. नंतर त्याच्या एका ज्युनियर ने सांगितलं की त्याची बायको कुठल्यातरी कॉल सेंटर मध्ये कामाला होती आणि रात्री साडे बारा किंवा एक ला घरी यायची तोवर हा टाईमपास करायचा आणि त्याच्या ज्युनिअरच्या संसाराचा सत्यानाश करायचा.
‌ माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी कफ परेड च्या एका मोठ्या हॉटेलमध्ये इंजीनियरिंग डिपार्टमेंट मध्ये कामाला होतो. तिथली तऱ्हाच न्यारी होती. म्हणजे मॉर्निंग शिफ्ट वाल्यांनी चार वाजता निघायला पाहिजे त्याला संध्याकाळी सात किंवा आठ वाजता सोडत असत. नाईट शिफ्ट वाल्याने सकाळी सातला जायला हवा पण चीफ इंजिनियर ला भेटल्या शिवाय जाऊ नये असा त्यांचा नियम होता आणि महाशय यायचे सकाळी दहा साडेदहाला. मग त्यानंतर तासभर मीटिंग चालायची आणि मग त्यानंतर अकरा साडेअकराला घरी जायला निघायचं आणि माझ्यासारख्याला मग तिकडून पुढे दोन अडीच तास प्रवास करून घरी पोहोचावे लागायचं. याचा त्रास एवढा व्हायला लागला की शेवटी जॉब सोडला. कंपनी चांगली होती पण वरिष्ठांच्या या विचित्र हट्टापायी सोडावी लागली.
हे खूळ माझ्यामते आपल्याकडेच आहे. बाकी इतर देशांत हा लोचटपणा करताना कोणी आढळतं नाही.
‌ मी काही वर्ष कतारला होतो. आमच्या ऑफिसची वेळ सहा वाजेपर्यंत असायची. मी तिथे नवीन रुजू झालो होतो. मला वाटतं तिसरा की चौथाच दिवस असावा. मी काही वाचत माझ्या केबिन मध्ये बसलो होतो आणि जवळ जवळ साडे सहा वाजता घरी जायला निघालो. भारताच्या दृष्टीने पाहिलं तर तसं लवकरच होतं. बाहेर येऊन बघतो तर संपूर्ण ऑफिस मध्ये अंधार. ऑफिस चवथा मजल्यावर होतं. कसाबसा ऑफिसच्या मुख्य दारापर्यंत आलो तर तिथे बाहेरून कुलूप. शेवटी ऑफिस अडमीन ला फोन केला तर तो आश्चर्यचकित झाला. शेवटी त्याने प्यून ला पुन्हा चावी घेऊन पाठवलं आणि ऑफिस उघडुन त्याने मला बाहेर काढलं.
‌” सर, छ बजे के बाद कोई रुकता नहीं है. मैं भी सवा छ तक बंद करके चला जाता हुं. आप कैसे रुक गये?” म्हणजे ऑफिस सुटल्यावर पुढे अर्धा तास कोणी ऑफिसमध्ये थांबू शकतो याची तो कल्पना ही करू शकत नव्हता. त्या दिवसापासून बरोबर वेळेवर निघायला लागलो. नंतर लक्षात आलं की ऑफिस वेळ सगळेच अतिशय कटाक्षाने पाळताहेत.
‌आमच्या बऱ्याचशा क्लाएंट चे ऑफिस ची वेळ ३ वाजे पर्यंत असायची. त्या वेळेनंतर कामा संदर्भात फोन किंवा बोलणं करायचं नाही असं त्यांचां स्पष्ट संकेत असायचा. कामा व्यतिरिक्त आमचं भेटणं बोलणं व्हायचं पण कामाच्या गोष्टी ऑफिसच्या वेळेतच.
उदाहरण द्यायचं झालं तर एक प्रख्यात एअरलाइन्स कंपनी आमची क्लायंट होती. तिचा फॅसिलिटी हेड एक पाकिस्तानी होता. त्याच्याशी बाहेरच्या सर्कल मध्येही भेटी होत असत. त्यामुळे चांगले संबंध होते पण कामासाठी फोन केला तर त्याचं एकच वाक्य असायचं ” यार बिर्याणी खाने घरपे आजा पर ऑफिस की बात ऑफिस टाईम मे किया कर अनलेस इट्स लाईफ & डेथ सिट्युएशन”
मला खात्री आहे आपल्या कडे एरलाइन्स वाले दिवस रात्र स्वतः ही झोपत नसतील आणि दुसऱ्यांनाही झोपू देत नसतील.आपल्याला खूप काम आहे हे दाखवण्याचा सोस आपल्याकडे जास्त असतो.
आधी सांगितलेल्या बँके मधली गोष्ट तिचं हेड ऑफिस सिंगापूरला होता आणि त्यांना जेव्हा कॉन्फरन्स कॉल लावायचा असायचा ते सकाळी 9 चा वेळ द्यायचं म्हणजे त्यांच्याकडचे ९.०० म्हणजे आपल्याकडचे सकाळचे साडेसहा. आणि विशेष म्हणजे आपल्याकडचे लोक ते मान्यही करायचे. तिथल्या लोकांचे म्हणणे असायचं की एकदा सकाळी आमचा कॉल झाला तिथे त्यांचे काम करायला मोकळे होतात पण मग त्याच्या साठी मला साडेसहा वाजता यावे लागायचं शेवटी मी नकार दिला. बराच वादविवाद झाल्यानंतर त्यांच्याकडची बारा वाजेची वेळ ठरली म्हणजे आपल्याकडे साडेनऊची. आणि याच लोकांच्या उदाहरण द्यायचं झालं आम्ही जर तिकडच्या संध्याकाळी पावणे सहाला जरी कॉल केला तरी ते तो घेत नसत ” We are winding up for the day laa” असे उत्तर यायचे. ते त्यांच्या लंच ब्रेक मध्येही फोन उचलत नसतं.
इतर बऱ्याच विदेशी लोकांशी संबंध आला पण हे ऑफिस वेळे नंतर कोणीही थांबत असल्याचे पाहण्यात आले नाही.
आणि आता लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम मुळे यांचं अजूनच फावले आहे. सहज म्हणून कोणालाही कॉल करून म्हटलं की तुझी काय मजा आहे वर्क फ्रॉम होम तर तो तक्रारींचा पाढा सुरू करतो.
माझे काही परिचित आणि सहकारी सांगतात की त्यांचे वरिष्ठ रात्री दहा-अकरा केव्हाही फोन करून डेटा मागवतात आणि जर त्यांना वेळेबद्दल सांगितले तर ठराविक उत्तर असतं “यू विल हॅव टू डू इट. वर्क फ्रॉम होम का मतलब क्या है” बघा विचारून कोणत्याही वर्क फ्रॉम होम वाल्याला.
आपण स्टेट बँकेवर मारे जोक्स आणि मीमस बनवत असू पण त्यांचा लंच टाईम आणि घरी जायची वेळ ते अतिशय प्रामाणिकपणे पाळतात हे खरंतर कौतुकास्पद असायला पाहिजे.
ऍक्च्युली रोज उशिरा पर्यंत थांबणाऱ्या व्यक्तीला inefficient घोषित करायला हवे कारण हे लोकं त्यांची कामं ठराविक वेळेत पूर्ण करू शकत नाही आणि वरून उशीरापर्यंत बसून कंपनीचे रिसोर्स वापरून आर्थिक नुकसान करत असतात. आणि असं झालं तरच ही सवय सुटायची शक्यता आहे.
तोवर चालूच राहील हे वरिष्ठांच्या दिखव्यासाठी ज्युनिअर चे हाल.
–अमोल पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..