काल मी मरता मरता वाचलो.
त्याचं काय झालं की सध्या आमचे कन्यारत्न हॉस्टेल वरून घरी आले आहे आणि नेहमी प्रमाणे आम्हाला बोटावर नाचवणे चालले आहे. तशी तिला हॉस्टेलवर राहून ही आम्हाला फोनवरून नाचवण्याची कला अवगत आहे. पण असो तर पॉंइटाचा मुद्दा हा की तिने दोन दिवसापुर्वी हुकूम सोडला की तिला ती कुठलीशी H&E पेन्सिल पाहिजे आहे.
2-3 ठिकाणी पाहिले पण काही मिळाली नाही. शेवटी कॉंप्लेक्सच्या गेट वरच्या स्टेशनरीवाल्याने उद्या आणुन ठेवतो संध्याकाळी घरी जाताना घेऊन जा म्हणून सांगितले.
त्याप्रमाणे मी काल त्याच्याकडून त्या घेतल्या. त्यातली एक गुलाबी रंगाची आणि दुसरी पर्पल रंगाची होती (तिला तो वायलेट रंगाची म्हणत होता) मला मात्र ती पर्पल दिसत होती असो, दोघांमधील फरक मला नाही माहिती.
पाऊस सुरू असल्यामुळे आणि बाईकवरून काय पाऊस, काय खड्डे, काय ट्राफिक यांचा अगदी थकवणारा एकदम ओक्के असाअनुभव घेऊन आल्यामुळे, मी त्या बॅगेत वगैरे ठेवण्याच्या भानगडीत न पडता सरळ रेनकोटची झिप उघडली आणि शर्टाच्या वरच्या खिशामध्ये ठेवून दिल्या. त्या टोकं केलेल्या अवस्थेत असल्यामुळे उगाच शर्टाच्या खिशाला भोक नको म्हणून मी ते टोकं वरच्या बाजूला ठेवली.
लिफ्ट मधून वर जातानाच रेनकोटची टोपी बाजूला करून थोडीशी रेनकोटची झिप उघडलेली होती. पण पेन्सिल्स मात्र रेनकोट च्या आड दडल्या. पत्नीने दार उघडले आणि दारातच क्षणात तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि खूंखार मांजरीचे भाव आले. मला खाऊ की गिळू असं तिने पाहिले.
मी बुचकळ्यात पडलो ( घाबरलो असं चारचौघांत लिहीलेलं बरं नाही वाटत) च्यायला काय झालं अचानक?? पण तसाच आत गेलो आणि खिशातून त्या दोन पेन्सिली काढून मुलीच्या हातात दिल्या.
त्या काढताना सहज खिशाकडे लक्ष गेले आणि मग पत्नीच्या चेहर्याचा रंग बदलण्याचे कारण माझ्या लक्षात आले.
त्या पेन्सिलच्या टोकांनी माझ्या खिशाच्या वर ह्रदयाजवळ अप्रतिम असा डाग पडलेला होता आणि त्या रंगांमुळे तो लांबुन एखादी लिपस्टिकचा असावा असा दिसत होता आणि पेन्सिल्स रेनकोटच्या आत दिल्यामुळे तिला दिसल्या नव्हत्या.
‘अरे वा पप्पा मिळाल्या का पेंसिल्स. हे बघ मम्मा पप्पांनी आणल्या’ – मुलगी
नशीब असं की तिच्या मम्मी ने मला खिशातून पेन्सिल्स काढताना पाहिले होते. तरीही अरे वा बघू दे म्हणत तिने पेन्सिल्स हातात घेऊन माझ्या नकळत ( असं तिला वाटतं) त्यांचा रंग आणि डागाचा रंग न्याहाळून पाहिलाच. खात्री झाल्यावर मग हसतच ‘ अहो तो शर्टावरचा डाग काही वेगळाच वाटला मला’
मला माहीती आहे वरील सर्व घटना जर वेळेत घडल्या नसत्या तर काही वेळाने तो डाग कसला हे माझ्याही लक्षात आले नसते आणि मग स्पष्टीकरण देताना माझ्या नावापुढे स्व. लागायचे जास्त चान्स होते.
आता मला सांगा जिथे एक सांभाळताना जिव जातो तिथे बाहेर लफडी कोण करेल? आणि खरंच सांगायचे झाले तर आपली कितीही इच्छा असली तरी टाईमपास चित्रपटातल्या प्राजक्ता च्या बापा सारख्या दिसणार्या माणसाला कोण घास डालेंगी. हे बायकांना ही माहिती आहे पण नाही संशय हा घेतलाच पाहिजे.
एनीवे काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती या म्हणीचा प्रत्यय मी घेतला.
सांगण्याचा मुद्दा हा की विवाहित पुरुष हा साध्या पेन्सिलमुळे पण गोत्यात येऊ शकतो. त्यामुळे सतत सावध राहणे योग्य.
(वरील घटना काल्पनिक नसून खरी आहे ही खात्री पटण्यासाठी डागाचा फोटो सोबत जोडत आहे. )
काही प्रश्न, या प्रकारच्या पेन्सिल्स या लिपस्टिकच्या रंगाच्या का बनवतात? बरं मग त्या टोक करून का ठेवलेल्या असतात?या कॉलेज वाल्यांना साध्या रंगीत पेन्सिलने काढलेले डायग्राम का चालत नाही? स्त्रीयांना हे का कळत नाही की कोणता नवरा लिपस्टिक चे डाग कपड्यांवर मिरवत घरी येईल? एवढी हिंमत असलेला नवरा नावाचा प्राणी आजवर माझ्या तरी पाहण्यात आलेला नाही.
–अमोल पाटील
Leave a Reply