बाईकवर असताना फोनची रिंग वाजते. आपण घेत नाही,
परत वाजते काहीतरी महत्त्वाचे असेल म्हणून आपण गाडी बाजूला घेतो. रेनकोटच्या आत ट्राउझरच्या खिशात ठेवलेला मोबाइल बाहेर काढतो. घरून दोन मिस्ड कॉल्स आलेले असतात. लगोलग दोन कॉल्स म्हणून आपण थोडे धास्तावतो म्हणून मग हेल्मेट काढून किंवा वर करून फोन डायल करून कानाला लावतो. रींग वाजत असते आणि मग आवाज येतो.
” कुठे आहात? “
” रस्त्यात”
” अहो रस्त्यात म्हणजे नक्की कुठे ? “
” हायवे ला”
” तुम्ही हायवेनेच येताना? मग हायवेवर कुठे ते सांगा ना? “
तुम्ही विचारात पडता की आता ही ला एक्झॅक्टली कुठे आहे ते कसं सांगायचं? काही जरी सांगितले तरी तिला त्या रस्त्यावर काय काय लागतं ते माहीती नाही.
तरीपण तुम्ही सांगता- “कुठल्यातरी ढाब्याजवळ”
” कुठे आहे तो? “
मग अचानक तुम्ही तिला माहिती असलेल्या एरीयाचे नाव सांगता.
” बाणकोली च्या अलिकडे “
वास्तविक तुम्ही त्याच्या पासून ५ किमी दुर असता पण तिला ओळखता येणारा तोच एक एरिया असतो.
वरुन पावसाच्या सरी वर सर सुरू असते.
” काय झालं? “
” अहो आज ऑफिस मधुन घरी यायला पावसामुळे बराच वेळ लागला. त्यात त्या कुलकर्णी मॅडम भेटल्या. त्यामुळे अजून ऊशीर झाला. एकदम बारीक झाल्या आहेत. कुठलं डाएट करताहेत काय माहिती. तुम्ही केव्हापासून एक्सरसाइज सुरू करताय? ऐका न आमच्या गृप च्या सगळ्या रविवारी माळशेज ला जायचं म्हणताहेत. मी त्यांना हो सांगितलं. जाऊ न? “
” आता जर तू हो सांगितलं तर मला का विचारते आहे?
” तुम्ही म्हणाल तर नाही जाणार. असंही तुम्ही पण कुठे नेत नाही”
” जाऊन ये, जाऊन ये”
” तुम्ही वाटच बघा मी कुधी बाहेर जाते ते. म्हणजे तुम्हाला रान मोकळं”
एव्हाना दहा मिनिटे होऊन गेलेली आणि सरींची साइज वाढलेली असते.
“हे सांगण्यासाठी फोन केला का तू? घरी नव्हतं का सांगता येणार? ए बाबा तु फोन कशासाठी केला ते सांग. मी इथे भर पावसात रस्त्यावर उभा राहून बोलतोय”
” अरे हो, मी कशासाठी फोन केला तेच आठवत नाहीये”
” ठीक आहे ठेवतो. आठवले की घरी आल्यावर सांग”
” थांबा थांबा, येताना दुध आणायला जमेल का? मी विसरले आणायला “
” ओके आणतो”
” ऐका न जमलं तर आणा उगाच भर पावसात इकडे तिकडे नका जाऊ. उद्या सकाळ पर्यंतचा चहा होईल. नाही आणलं तर मी उद्या येताना घेऊन येईल. “
” ठीक आहे ” – आता तुमच्या आवाजात चिडचिड असते. तुम्ही हेल्मेट घालायला हात उचलता
” किती वेळ लागेल यायला? “
” तू बोलणं थांबवलं तर पाऊण तासात पोचेन नाहीतर तू जेव्हा थांबतील त्याच्या पुढे पाऊण तासाने”
” उशिरा निघाले का आज? “
” अरे काय लावलय. रस्त्यावर मी एकटाच गाडी वाला आहे का? पावसामुळे ट्राफिक मरणाची आहे.वरून पाऊस पडतोय. त्यात परत तुझं काय नाटक चाललंय? “
” तसं नाही हो. पिठलं भाकरी करायचा प्लान आहे. केव्हा पोहचाल ते कळलं तर त्या हिशोबाने बनवेल म्हणजे तुम्हाला गरमागरम खायला मिळेल. “
तुमची चिडचिड जरा कमी होते.
तुम्ही फोन ठेवता आणि तयार होऊन गाडी सुरू करता आणि रस्त्यावर पाहता. आतापर्यंत बर्यापैकी मोकळा असलेल्या रस्त्यावर गाड्यांची रांग लागलेली असते. कुठल्यातरी गाडीवान दादाने काहीतरी कांड केलेले असते त्यामुळे फुल्ल ट्राफिक जाम झालेले असते.
तुम्हाला माहीती असते की आता आपल्याला पाऊण नाही तर दिड तास लागणार आहे, पिठलं भाकरी थंड झाल्याचे खापर तुमच्यावर फुटणार आहे आणि वरून पुन्हा ” मला माहीती आहे, मी फोन केला तेव्हा तुम्ही ऑफिस मधून निघाले पण नव्हते” हे ही ऐकावं लागणार आहे.
–अमोल पाटील
Leave a Reply