नवीन लेखन...

उगाच काहीतरी – ८ (एंट्रन्स एक्साम्स , क्लासेस आणि पालक)

सूचना – इथे कोणावरही टीका करण्याचा किंवा सल्ला देण्याचा काहीही हेतू नाहीये. त्यावरून प्लिज कोणताही निर्णय घेऊ नये.


मीना ची दहावी अर्ध्यात पोहोचली म्हणजे सप्टेंबर/ऑक्टोबर उजाडला आणि तिच्या पालकांच्या मोबाईलवर अचानक क्लासेसचे फोन यायला लागले. आमच्या क्लास ची स्कॉलरशिपची परीक्षा तुमच्या मुलीला द्यायला लावा म्हणजे तिचा आता पर्यंतचा अभ्यास कसा चाललंय तेही कळेल आणि त्या मार्क्सवर आमच्या क्लासच्या फी वर आम्ही तुम्हाला सवलत ही देऊ.

मग इतर होतकरू पालकांसारखं त्यांनी पण एका रविवारी एका क्लासची ५०० रुपये फी देऊन तिला परीक्षा द्यायला लावली. जवळ जवळ २००-२५० मुलं केंद्रावर आलेली होती. दोन दिवसानंतर त्यांना फोन आला की त्यांच्या मुलीला मिळालेल्या मार्क्स वर ते मीनाला फी वर १५ टक्के डिस्काउंट देणार होते. जर त्यांना जास्त सवलत पाहिजे असेल तर ते पुन्हा परीक्षा द्यायचा प्रयत्न करू शकतात. तिच्या पालकांनी दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या कामाला लागले .

त्यानंतर मग एका पाठोपाठ एक क्लासेसचे फोन यायला लागले. प्रत्येकाचे म्हणणे तेच होते की स्कॉलरशिपची परीक्षा देऊन बघा. प्रत्येकाची फी ३००ते ५०० च्या दरम्यान असायची. या परीक्षा ते सप्टेंबर ते फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक रविवारी आयोजित करायचे.

मुलांचा अभ्यास सुरु होता. आणि पालकांचा त्यांना कोणत्या ब्रँडेड क्लास ला टाकायचं याचा अभ्यास सुरु होता. आमच्या मुलाला आम्ही इथे ऍडमिशन घेतली, आम्हाला या क्लासने इतका डिस्काउंट दिला या चर्चा सुरु होत्या. हा क्लास नीट च्या परीक्षेसाठी चांगला आहे. तो जे इ इ साठी उत्तम, हा दिल्लीचा आहे. तो कोटा चा बेस्ट क्लास आहे. असं सगळं सुरु होतं.
मग मीनाच्या वडिलांनी पण अभ्यास सुरु केला. काही क्लासेसला व्हिजिट केलं. त्यांचे आलिशान वर्ग, सुटबुटवाले कॉऊंसेलर्स आणि २. ५० ते ३. ५० लाखांमध्ये फिया.

एंट्रन्स एक्साम्स , क्लासेस आणि पालक. असो …

मग तिच्या वडिलांनी त्यांना काही साधे प्रश्न विचाराले जसे तुमच्या एकूण किती शाखा आहेत? एका ब्रांच मध्ये किती मुलं असतात ?

तेव्हा समजलं की प्रत्येकाच्या भारतभर १५० ते २०० ब्रॅंचेस आहेत आणि प्रत्येक ब्रांच मध्ये सरासरी १०० ते १५० मुलं असतात. प्रत्येकाची फी सरासरी २ लाख. करा हिशोब. आणि हो हे स्कॉलरशिप टेस्ट चा आग्रह धरायचे त्याचं अर्थकारण जर पाहिलं तर जवळ जवळ २० रविवार प्रत्येक ब्रांच ला सरासरी १०० मुलं ३०० ते ५०० रुपये भरून स्कॉलरशिप टेस्ट द्यायचे. आता हा पण करा हिशोब. कमावो बापडे आपल्याला काय.

आय आय टी किंवा मेडिकल ला ऍडमिशन मिळालेल्या मुलांची संख्या विचारली असता ते देशभरातून निवड झालेल्या मुलांची संख्या सांगायचे पण मीनाच्या शहरातील ब्रांचमधून निवड झालेल्या मुलांची संख्या विचारल्यावर उत्तर तसे निराशाजनक असायचे.

अशी काही प्रश्नावली विचारल्यावर काही क्लासेस चे सेल्स एजेंट तिच्या पालकांवर थोडे नाराज ही झाले आणि त्यांच्या क्लासला ऍडमिशन घ्यायची जरी ठरवलं तरी ते आता कुठलाही डिस्काउंट देणार नव्हते असं स्पष्ट शब्दात सांगायला लागले. मीनाचे वडील म्हणाले ते पुढचं पुढे बघू.

जसजशी दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ यायला लागली तसतशी अकरावी बारावीच्या क्लास बद्दल पालकांची पण चर्चांना उधाण येऊ लागलं . ज्या क्लास ची फी जास्त तो उत्तम असं पालक भासवु लागले. जणू काही ते क्लासवाले ह्यांच्या मुलांच्या सीट्स आय आय टी आणि मेडिकल ला बुकच करून ठेवणार होते. जाऊ द्या आपल्याला काय आपण आपल्यापुरता बघू असं मीनाच्या पालकांनी ठरवलं.

त्यांच्या -दोन असं लक्षात आलं की या क्लासेसच्या पूर्ण विद्यार्थी संख्येतून अवघी अर्धा किंवा एक टक्के मुलांची निवड होत होती पण यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी एकदम पॉवरफुल होती. त्यात अजून एक इंटिग्रेटेड कॉलेज ची भानगड होती. म्हणजे ते क्लासवाले कुठल्यातरी गल्लीबोळातील टुकार कॉलेज बरोबर टाय अप करायचे ( अर्थात त्याचे चार्जेस वेगळे होते ) जेणेकरून तुमची मुलं ६- ७ तास क्लास मध्ये असणार पण त्यांची हजेरी मात्र त्या कॉलेज ला लागणार. बरं या ६-७ तासात ते फक्त गणित आणि सायन्सचं शिकणार. बाकीचे विषय तुमचे तुम्ही मॅनेज करायचे.आणि हो जर तुमची निवड नाही झाली तर पुन्हा परीक्षा देण्यासाठी अर्ध्या फी मध्ये रिपीटर्स बॅचला ऍडमिशन देण्याची कृपा ही ते करणार होते.
त्या नामांकित क्लासेसच्या वेबसाईटवर गेल्यावर मीनाच्या वडिलांना वेगळाच प्रकार लक्षात आला. त्यांच्या जाहिरातींमधील त्यावर्षी टॉपर्स म्हणून निवड झालेली तीच मुलं असायची. म्हणजे तोच विद्यार्थी ३- ४ क्लासच्या जाहिरातीत असायचा. खाली फक्त बारीक अक्षरात क्लासरूम बॅच, डिस्टन्स लर्निंग बॅच, टेस्ट सिरीज, स्कॉलरशिप टेस्ट, असं काहीबाही लिहिलेलं असायचं . हे ही लक्षात आलं की ज्या उत्कृष्ट नोट्स देण्यासाठी हे लोक एवढी फी क्लासच्या मुलांना लावतात, काही क्लासेसच्या त्याच नोट्स ऑनलाईन शॉपिंग साईट्स वर अवघ्या ५ – १० हजारात उपलब्ध होत्या.

मीनाच्या पालकांना तसाही ऑफिसनंतर मोकळा वेळ भरपूर होता त्यामुळे मग ते काही क्लासेस च्या काही विद्यार्थ्यांना भेटले . पालकांनी भरपूर फी भरली असल्याकारणाने त्यांनी लावलेल्या क्लासेसचं कौतुकच केलं. पण विद्यार्थ्यांना विचारल्यावर त्यांनी बिचार्यांनी खरं काय ते सांगून टाकलं. दर आठवड्याला प्रत्येक धड्यावर टेस्ट्स ठेऊन मुलांची घोकंपट्टी करवली जात होती. काय आणि किती समजलं यापेक्षा दिलेल्या नोट्स लक्षात ठेवण्यावर जास्त भर दिला जात होता. संपूर्ण दिवस गणित आणि विज्ञान करून करून मुलांना इतर विषयांसाठी वेळच मिळत नव्हता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या क्लासेसने दिल्ली वा कोटा वरून आयात केलेल्या शिक्षकांची शिकवायची पद्धत आपल्या मुलांना समजत नव्हती ( हे मात्र त्यांना जवळ जवळ ६० टक्के मुलांनी सांगितलं). बाकी वर्ग प्रशस्त आणि वातानुकूलित होते. लायब्ररीज अद्यावत आणि त्या विषयांवरच्या पुस्तकांनी भरलेल्या असायच्या, तसेच प्रश्न सोडवायचे काही शॉर्टकट्स त्यांना शिकवायचे हे पण तितकच खरं होतं.

मीनाने पालकांना स्पष्ट सांगितले की ती मेडिकल नाही मिळालं तर इंजिनियरिंग अशा दोघं दगडांवर पाय ठेवणार नव्हती ती फक्त नीट ची परीक्षा देणार होती. त्यामुळे ती अकरावीला तेच विषय घेणार आणि त्यावरच लक्ष केंद्रित करणार होती. डेन्टल करून स्वतःचा व्यवसाय सुरु करून तिला पुढे त्याच विषयात पुढे जायचं होतं.

एवढा क्लियर व्हिजन असल्यावर तिच्या पालकांना तिच्या यशाबद्दल कुठलीही शंका नव्हती. मग त्या दिशेने अभ्यास सुरु केल्यावर लक्षात आलं की नीट च्या परीक्षेसाठी बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री चे काही ठराविक टॉपिकस ठरवले गेलेले होते आणि त्या टॉपिक्स वरच त्यांचा पेपर निघत होता. त्यांची माहिती परीक्षा मंडळाच्या वेबसाईट वर उपलब्ध होती. ते वेगळे असे काही नव्हते स्टेट बोर्ड, सीबीएसई , किंवा तत्सम बोर्डाच्या अकरावी बारावीच्या अभ्यासक्रमातीलच काही टॉपिक्स होते. ते जर समजून घेतले तर बाहेरून असं काही येणार नव्हतं. स्टेट बोर्डाच्या पुस्तकांमध्ये होते तरी NCERT च्या पुस्तकांमध्ये जरा विस्तृत दिलेले होते. एकूण मुलांचं जर बेसिक क्लियर असेल तर त्यांना नीट काय जे इ इ काय कुठलीच परीक्षा द्यायला त्रास होणार नाही हे स्पष्ट झालं.

दहावीची परीक्षा संपली तोवर तिच्या बहुतेक मित्र मैत्रिणींचे कुठले ना कुठले क्लास लावून झाले होते. पालकांनी मीनाला सुट्ट्यांमध्ये थोडा ब्रेकचं घेऊ दिला कारण या नंतर तिच्या आयुष्यात खऱ्या रॅट रेस ला सुरुवात होणार होती. सुट्ट्यांच्या शेवटी मग त्यांनी तिला अकरावी बारावीचे पुस्तके आणि काही NCERT पुस्तके आणून दिली आणि तिने हळू हळू त्यांचे वाचन सुरु केलं.

एकदाचा दहावीचा निकाल लागला आणि त्यात मीनाने रेकॉर्ड ब्रेकिंग यश मिळवले. इकडे शहरभर तिचे सत्कार सुरु झाले आणि पुन्हा तिच्या पालकांना वेगवेगळ्या क्लासेस चे फोन येऊ लागले. त्यांना कसेही करून मीनाला त्यांच्या क्लास मध्ये ऍडमिशन द्यायचं होतं. अगदी फुकट अगदी नावापुरती सुद्धा . कारण आता त्यांना या हुशार विद्यार्थ्यांनी पण त्यांच्याच क्लासची निवड केली याची जाहिरात करायची होती. यात तो क्लासवाला पण होता ज्याने प्रश्न विचारल्यावर एक पैसाही सवलत मिळणार नाही म्हणून सांगितलं होत.

तिच्या पालकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. घरी आता कुठला ब्रँडेड क्लास लावावा यावर गांभीर्याने चर्चा सुरु झाली. तिच्या वडिलांनी त्यांच्यासमोर सगळी वस्तुस्थिती ठेवली. शेवटी त्यांनी स्थानिक क्लास लावला. ज्यात वातानुकूलित वर्ग किंवा सूटबूट वाले शिक्षक नव्हते पण वेगवेगळ्या कॉलेज मध्ये शिकवून रिटायर झालेले शिक्षक होते. मुलांना काय आणि कसे समजवायचे हे त्यांना पक्के ज्ञात होते.

शहरातील एका प्रतिष्ठित कॉलेज मध्ये तिचं ऍडमिशन घेतलं. एवढे चांगले मार्क्स मिळून देखील फक्त कॉलेजला न जाता हजेरी लागावी म्हणून गल्लीबोळातील कॉलेज मध्ये ऍडमिशन घेणं तिच्या पालकांना मान्य नव्हतं . आयुष्यात एकदाच तिला मिळणारी ही तारुण्य अनुभवायची संधी ते कुठल्याही महत्वाकांक्षेसाठी दवडू देणार नव्हते .

मीना स्टेट बोर्डाची विद्यार्थिनी होती त्यामुळे तिला अकरावी बारावीच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकांसोबत नीट च्या तयारी साठी NCERT ची पुस्तके, जास्तीत जास्त MCQ’s असतील अशी पुस्तके आणि परीक्षेचा सराव व्हावा म्हणून काही टेस्ट सिरीज ची पुस्तके आणि ऑनलाईन साईट्स पुरवल्या. हे सगळं मार्केट मध्ये अगदी स्वस्तात आणि सरळ उप्लब्ध होतं.
एकूण तिच्या अभ्यासाच्या साधनांची उपलब्धता तिचे वडील करून देत होते तर तिचा अभ्यास, कॉलेज ,क्लास आणि आराम यांचे वेळापत्रक तिच्या आईने तिला मॅनेज करून दिलं.

कुठलाही दबाव न येत तिचा अभ्यास सुरु झाला. त्याचबरोबर इतर मनोरंजनासाठी पण वेळ तिला मिळत होता.
एवढे चांगले मार्क्स मिळवूनही तिला “चांगला ” क्लास ना लावून मीनाचे पालक तिच्या शिक्षणाच्या बाबतीत कॉम्प्रोमाईस करता आहेत अशी कुजबुज आणि टीकाही त्यांच्यावर झाली. पण त्यांना कुठल्याही दबावाखाली अभ्यास करून अथवा घोकंपट्टी करून यश मिळवायचा दबाव तिच्यावर टाकायचा नव्हता. आणि इतरांना काय वाटतं ती पर्वा त्यांनी तरी का करायची. त्यांच्या मुलीच्या यशापयशाची जबाबदारी सर्वस्वी त्यांच्या कुटुंबाची होती. ती दबावमुक्त राहणं हे ही तितकच महत्वाच होतं.

एके दिवशी तिच्या एका मैत्रिणीच्या वडिलांचा मीनाच्या वडिलांना फोन आला. म्हणाले “मला तुमचे सर्व विचार पटताहेत आणि मी पण माझ्या मुलीला एका क्लास पेक्षा एक शिक्षण देणारी शिकवणी लावणार होतो पण दोघी मायलेकींनी तो एक प्रेस्टिज इश्यू करून टाकला शेवटी तिला अबक क्लास च्या इंटिग्रेटेड कोर्स ला ऍडमिशन घेणं भाग पडलं.”

पुन्हा यथावकाश बारावीचा निकाल लागला. नंतर मग नीटचा ही निकाल लागला. दोघांमध्ये मीनाला अतिशय चांगले मार्क्स मिळाले आणि तिला त्यांच्या पसंतीच्या डेंटल कॉलेज ला पहिल्याच लिस्ट मध्ये नंबर लागला.

तिच्या इच्छे प्रमाणे तिचं भवितव्य घडवण्याच्या कामाला ती लागली आणि तिचे पालक पण क्लासेस नावाच्या प्रेस्टिज इश्यू च्या तावडीतून सुटले.

आणि अशा रीतीने मीनाच्या एंट्रन्स एक्साम ची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.

— अमोल पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..