परिस्थितीचा रेटा असायला हवा. त्यात गरिबी हवी. आत खोलवर जाऊन पोहोचलेली स्वाभिमानाची जाणीव हवी. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ईर्ष्या हवी. अडथळ्यांना न जुमानता वाट शोधण्याची दृष्टी हवी. त्यासाठी सभोवतालचा अंदाज घेत कल्पकतेनं उडी मारण्याची आणि उभारी घेण्याची मनाची तयारी हवीच हवी. मग काय होतं?
त्यासाठी मला खूप वर्ष पाठी जायला हवं. शिक्षण चालू होतं. गरिबी असली तरी रडायचं नाही आणि कुणासमोर उगीचंच हात पसरायचे नाहीत हे संस्कार आई अण्णांनी केले होते. पोट भरण्यासाठी कसलंही चांगलं काम करायला लाज वाटून घ्यायची नाही हा अनुभवसिद्ध संस्कार काकूनं केला होता. त्यामुळं पहाटे उठून रत्नभूमी या तेव्हाच्या वर्तमानपत्राची लाईन टाकणे ( घरोघरी पेपर वाटणे ) हे काम करावे लागे आणि दर रविवारी रत्नागिरीतल्या गोखले नाक्यावर रविवारची लोकसत्ता ओरडून विकण्याचे काम करावे लागे.
आपल्या वयाची इतर मुले काय करतात हे बघायलाही तसा वेळ नसायचा किंवा कोण काय म्हणेल याचा विचारसुद्धा मनात आणायला फुरसद नसायची. सकाळी पेपर टाकण्याचे पैसे ठरलेले होते , पण रविवारी पैसे मिळायचे ते स्वतःच्या ओरडण्याच्या क्षमतेवर आणि येणाऱ्याजाणाऱ्यांच्या पाठून पळत त्यांना पेपर घ्यायला लावण्याच्या कौशल्यावर.
मला चांगलं आठवतं , ओरडून पेपर विकणारे आम्ही तीनचार जण होतो . शिवाय एक वृद्ध गृहस्थ पण असायचे पेपर विकायला . खाकी हाफ पॅन्ट , खाकी शर्ट , जुनी सायकल आणि त्यावर पेपरचा मोठा गठ्ठा . सुरुवातीला आम्हा सगळ्यात ते जास्त पेपर विकायचे आणि कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे ठरलेले वाचक त्यांच्याकडूनच पेपर घ्यायचे .
सुरुवातीला ओरडून पेपर विकणे हे मला कसेतरीच वाटायचे. परिणामी पेपर कमी विकले जायचे. त्यामुळे कमिशन कमी मिळायचे. दर रविवारी जवळपास तीन तास खर्च व्हायचे आणि तुलनेत हाती काहीच पडत नव्हते.
– अशाच एका रविवारी उदास होऊन लोकसत्ताचा गठ्ठा मांडीवर घेऊन एसटी स्टँडच्या बाकड्यावर बसलो असताना पुरवणीतल्या एका लेखावर नजर गेली . आणि बघताबघता तो लेख वाचून संपवला . मला काय वाटलं कुणास ठाऊक पण तो लेख मी पुन्हा वाचला . पुन्हा वाचला . आणि त्या लेखाच्या प्रेमातच पडलो. आलंकारिक असली तरी सहजसोपी भाषा . व्यावहारिक उदाहरणे . वेगळे विषय . उर्दू शेरोशायरी . नर्म विनोद आणि असं बरंच काही …
मी लेखकाचं नाव पाहिलं. विद्याधर गोखले. प्रसिद्ध लेखक , नाटककार आणि लोकसत्ताचे तेव्हाचे संपादक .
विद्याधर गोखले यांच्या काळात लोकसत्ता खूप गाजू लागला होता , त्यांच्या अग्रलेखाच्या आणि दर रविवारच्या त्या नितांतसुंदर लेखामुळे.
– मला काहीतरी सापडलं होतं. तो लेख मी बारकाईनं पुन्हा वाचला .मनाशी शब्द जुळवले आणि उठलो.
– एव्हाना बरोबरीचे सगळे पेपर विकायला गेले होते. बहुधा मला सगळे हसत गेले असावेत .
मी मनाशी जुळवलेले विद्याधर गोखल्यांच्या लेखातील शब्द पुन्हा एकदा उच्चारले . लेखाचा मतितार्थ सांगणारे ते एकच वाक्य मी मोठ्यांदा उच्चारले . लोकसत्ता , लोकसत्ता असे पुन्हा एकदा ओरडलो आणि स्टँडच्या बाहेर आलो . रस्त्यावर आल्यावर पुन्हा ते वाक्य ओरडलो .
गंमत म्हणजे त्यावेळी स्टँडच्या बाहेर असणाऱ्या आंबर्डेकरांच्या समर्थ लॉज मधून एक गृहस्थ बाहेर आले आणि मला म्हणाले , ” काय म्हणताहेत गोखले ? ” मी पेपर पुढं केला , त्यांनी दिलेले पैसे घेतले . पुन्हा ओरडत गोखले नाक्यावर आलो. त्या रविवारी मात्र मी एक तासात पेपर संपवून घरी आलो. बाकीचे विक्रेते काय करतात हे न बघता मी माझ्या नव्या शैलीने पेपर विकले .
मला एक वेगळा आत्मविश्वास मिळाला. दर रविवारी मी गोखल्यांचे लेख वाचू लागलो. कळत नकळत लेखनाचे संस्कार होऊ लागले. माझ्या लेखनाच्या उगवतीच्या काळातल्या ह्या कळा मला नवीन उभारी देऊन गेल्या. ते ऋण मान्य करायलाच हवे !
जाताजाता नोकरीत स्थिरावल्यावर मी मारुती ८०० , ही गाडी घेतली . त्यानंतर जेव्हा मी गाडी घेऊन पहिल्यांदाच गोखले नाक्यावर गेलो तेव्हा ट्रॅफिकचा विचार न करता गाडी उभी केली . खाली उतरून रस्त्यावरची धूळ कपाळाला लावली . एव्हाना ट्रॅफिक हवालदार शिटी वाजवत माझ्याजवळ आला . गाडी का थांबवलीत म्हणून विचारू लागला . मी त्याला सांगितलं ,
” या गोखले नाक्यावर एकेकाळी मी पेपर ओरडून विकत असे , त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला मी थांबलो होतो .” त्याचा आ वासलेला चेहरा बघत मी गाडी सुरू केली .
उगवतीच्या कळा सुरुवातीला असह्य होत्या पण लेखक म्हणून जडणघडणीत त्या मोलाच्या होत्या , हे नक्की !
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६
Leave a Reply