नवीन लेखन...

उगवतीच्या कळा : २

खोलीत गेल्यावर समोर मोठा पलंग . पलंगाशेजारी एक टेबल . त्यावर पिण्याच्या पाण्याचा ,तांब्याचा तांब्या आणि भांडे .
जवळच एका मोठ्या काडीला टोचून ठेवलेले पंधरावीस विडे . एक पितळी पिकदाणी आणि दोन नॅपकिन . काही वर्तमानपत्रे आणि काही पुस्तके .

” आजपासून हा श्रीकृष्ण येणारेय तुला पुस्तकं वाचून दाखवायला .”

ताईआजी म्हणाल्या.

– माझं लक्ष पलंगावर झोपलेल्या वृद्ध आजोबांकडे गेलं. कृश झालेलं शरीर. त्या तुलनेत चेहरा थोडा मोठा. शरीराची एक बाजू अर्धांगवायुमुळं लुळी पडलेली. तोंडात पान. चेहरा हसरा. ” हे बाबीराव गोडबोले आणि मी त्यांची बहीण . मला सगळे ताई म्हणतात , तू सुद्धा ताईच म्हण .”

मी दोघांना वाकून नमस्कार केला.

” हा पहिला आणि शेवटचा नमस्कार . आता तू रोज येणारेस तर रोज नमस्कार नको . आणि हो , ही तुझी खुर्ची . पंखा हवा असेल तर लावलास तरी चालेल , पण पश्चिमेचा वारा ह्या खिडकीतून चांगला येतो .”

ताईंनी सगळं समजावून दिलं आणि त्या निघून गेल्या .

मी एक क्षणभर बाबीराव सरांकडे पाहिलं आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे टाइम्स ऑफ इंडिया हाती घेतला …

– ही संधी माझ्या काकुमुळं मला मिळाली होती. गोडबोले सरांना पुस्तकं वाचून दाखवायला कुणीतरी हवा होता आणि काकूने माझे नाव त्यांना सांगितले. रोज दुपारी दोन तास त्यांना वर्तमानपत्र आणि पुस्तकं वाचून दाखवायची होती .सर दुपारी झोपत नसत . त्यांना वाचनाची आवड होती . पण अर्धांगवायू झाल्यानंतर त्यांना स्वतःला वाचन करता येत नव्हतं .

गुरुवर्य गोडबोले सर हे शिक्षण क्षेत्रातील विख्यात व्यक्तिमत्व . विद्यार्थीप्रिय आणि लोकप्रिय सुद्धा . संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे विद्यार्थी पसरले होते. रत्नागिरीत मारुतीमंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर त्यांचं घर होतं. आता तेथे मोठं हॉस्पिटल आहे . पण त्यावेळी छान , मंगलोरी कौलांचं देखणं , अगदी कोकणी शैलीतील घर होतं .

माझ्या दृष्टीनं ते साधं घर नव्हतं. खजिनाच होता तो. साधासुधा खजिना नाही . अपरंपार भांडार खुलं झालं होतं त्यादिवसापासून.

तिथे गेल्यानंतर सुरुवातीला वीस पंचवीस मिनिटे टाइम्स ऑफ इंडिया , लोकसत्ता मधील ठळक बातम्या , एखादं आर्टिकल वाचून दाखवायचं. नंतर सुरू व्हायचं वाचन. ताईंनी आणलेल्या पुस्तकांपैकी एक पुस्तक वाचायला घ्यायचं . कमी पृष्ठसंख्येचं असेल तर संपवून मगच घरी जायचं . आणि जास्त पृष्ठसंख्या असेल तर दोन तीन दिवसात संपवायचं .

एक तास झाला की ताई आम्हा दोघांना चहा , बिस्किटं आणून द्यायच्या आणि घरी जाण्यापूर्वी मला वाटीतून रव्याचा वा बेसनाचा लाडू द्यायच्या . मी संकोचून नाही म्हणायला लागलो की त्या बहीण भावंडांचा संवाद सुरू व्हायचा . अर्थात ताईच बोलायच्या . सरांना बोलता येत नसल्यानं ते चमत्कारिक आवाज काढीत मला ओरडायचे .

सुरुवातीला मला सगळं चमत्कारिक वाटायचं पण मग नाही म्हणणं सोडून दिलं . त्यामुळं सर हसू लागले की ताईंना बरं वाटायचं आणि हो महिना अखेरीला मला चक्क पन्नास रुपये मिळायचे. असं जवळपास दीड वर्ष मी त्यांचा वाचक झालो .

या काळात मी अनेक लेखक वाचले. नाथमाधव , ह . ना. आपटे , साने गुरुजी , गो.नी.दांडेकर , बाबासाहेब पुरंदरे , शशी भागवत, स्वातंत्र्यवीर सावरकर , पु . भा. भावे , आचार्य अत्रे , गुर्जर , अरविंद गोखले , माडगूळकर , गाडगीळ , ना.सी.फडके कितीतरी लेखक वाचले . कथा , कादंबरी , वैचारिक , विनोदी , चरित्र , आत्मचरित्र असे अनेक साहित्यप्रकार वाचले. शब्दांचं , कथानकांचं विचारांचं भांडार उघडलं गेलं माझ्यासमोर .मला त्यासाठी दुसऱ्या वाचनालयात जावं लागलं नाही. भविष्यातील लेखकाची आपोआप जडणघडण होत होती जणू. कथाकथन , अभिवाचन यांची तालीम मिळत होती. कसं वाचावं हे मला ठरवावं लागत होतं. कारण दुःखद प्रसंग वाचताना सरांच्या डोळ्यातून पाणी यायचं. विनोदी प्रसंगाच्या वेळी ते चमत्कारिक आवाजात का होईना हसायचे.

मला पूर्वीच्या कादंबऱ्यातील पाल्हाळ आवडत नसे , मग मी हळूच दहा बारा पानं एकदम उलटून पुढे वाचायला लागत असे , पण सरांची स्मरणशक्ती आणि एकतानता इतकी होती की मी काही गडबड केली की त्यांच्या लक्षात यायची . मग ते खुणेनं पाठी जायला लावायचे आणि जिथून मी उडी मारलेली असे तिथून पुन्हा वाचायला लावायचे . पण नंतर मी तो प्रकार सोडून दिला आणि त्यांना आवडतं तसं वाचायला लागलो .

लेखक म्हणून मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा कथानकं , मांडणी , शैली , पात्रं , प्रसंग , संवाद यांचं महत्व काय आणि कसं असतं , त्यात शब्दांचा वापर किती जपून करावा लागतो हे अर्थातच आपोआप मनावर ठसलं गेलं होतं .

वादविवाद स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा आणि परीक्षेच्या काळातही गुरुवर्य बाबीराव गोडबोले सरांच्या घरातील ज्ञानभांडाराचा मला खूप उपयोग झाला

– उगवतीच्या काळातील ह्या कळा विसरता येत नाहीत .

— डॉ .श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.
९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 118 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..