अगदी वेदमंत्रासारखी ऋचा वाटतेय ना? अर्थात शब्दांना अद्याप मंत्रांचे सामर्थ्य प्राप्त झालेले नाही,याची जाणीव आहे. पण गेल्या १०-१२ दिवसांच्या कुंद सकाळच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी उजेड दिसला (रविवार सकाळ म्हणून की काय?)
मग हातात “धूप आने दो ” अशी प्रार्थना करणारा गुलज़ार नामक ऋषी पुन्हा घेतला. मंद,संयत शब्द (मुळातल्या व्यक्तिमत्वाचे प्रतीक की मराठीत भाषांतर झाल्यामुळे मलूल झालेले?) अगदी वयाला साजेशे ! आतमध्ये कायम निसर्ग आणि मानव असं कॉम्बो वस्तीला असलेला हा माणूस ! त्यामानाने अमृता प्रीतम नामक वाघीण अंगावर धावून येणारी ! इथे उर्जावान,सात्विक, माणसाळलेले शब्द अधिक- ” समय ” नामक नातवाने कोवळीक/ऋजू केलेले ! ही लवलव अधिक मृदू करणारी!
नातवंड नांवाचे मार्दव आयुष्यात यासाठीच निर्माण केले जात असावे.
एकेकाळी पती-पत्नी अशी दोनच झुडपे कालक्रमण करीत असलेल्या घराबद्दल उगाच अनुकंपा वाटायची. कालांतराने तेथे “जिवती “सारखे भरलेले घर म्हणजे उद्यान वाटायचे. आता तिथे नातवंड नांवाची बहारदार फुले जीवनाला इतिकर्तव्याचे फील देतात येथपर्यंत जाणिवांचा /अनुभूतींचा प्रवास झालाय.
प्रकाशाची फुले घरात घेऊन आलेलं नातवंड गुलज़ारला पुन्हा शब्दप्रवण करते. आता व्यक्त होणं अधिक ऊबदार -आजीच्या गोधडीसारखे! जुने क्रांतिबिंतीचे आविर्भाव हातातील मशाली खाली टाकून या सोज्वळ प्रकाशाच्या स्वागताला हजर!
अधून-मधून फाळणी, नकाशांनी विखुरलेले बाल्य डोकावतच असते पण अंती मिटलेल्या ओठांवर प्रार्थना एकच – “उजेडाची पहाट येवो!”
माझ्या पिढीच्या साक्षीने झालेला डोळस प्रवास- मानव्याकडून ऋषीपणाकडे!
सगळी सकाळच नव्हे तर जीवन “धूप “ने भरून टाकणारा !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply