शहराच्या पश्चिमेस उक्ताड भागात उघडा गणपतीचे मंदिर आहे. हा पूर्वाभिमुख गणपती नवसाला पावतो, असा अनुभव आहे. काळया पाषाणाची ही मूर्ती सुमारे ३०० वर्षे उघडयावरच होती. मूर्तीवर शेंदूराचा थर चढवलेला होता. या मूर्तीच्या सोंडेजवळ एक छोटासा गोल खड्डा आहे. ते मुर्तीचे मुख मानले जाते. पूर्वी काही भाविक या मुखात गुळाचा खडा नैवेद्य म्हणून ठेवत असत.
मंदिरासंबंधी आख्यायिका अशी आहे की, एका रात्रीत निगडीच्याच झाडांपासून मंदिर बांधण्याचा दृष्टांत काही भाविकांच्या स्वप्नांत दिला होता, साहजिकच असे मंदिर उभारणे अशक्यप्राय होते. कारण निगडीची झाडे इमारत बांधण्या इतकी मोठया आकाराची नसतात, त्यामुळे या विवंचनेत ही मूर्ती वर्षानुवर्षे उघडयावरच राहिली आणि म्हणूनच त्याचे नाव उघडा गणपती असे प्रसिध्द झाले. दिवसागणिक दर मंगळवारी, विनायकी, संकष्टी व अंगारकी चतुर्थीला भाविकांची गर्दी वाढू लागली. ऊन, पावसांत असलेला उघडा गणपती पाहून अनेकांना खंत वाटू लागली. त्यातूनच मंदिर बांधण्यासंबंधी दैव संकेतानुसार सर्वानुमते बैठकीत ठाम निर्णय झाला. १९८४ मध्ये आकर्षक मंदिर उभारले गेले. अशा प्रकारे उघडा गणपती मंदिराच्या सावलीत आला. या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना पूर्वीच्या पाषाण मूर्तींवरील शेंदुराचे थर काढून टाकण्यात आले. दैनंदिन पूजाअर्चेसाठी पुजार्याची नियुक्ती करण्यात आली. या गणपतीचा माघी महिन्यात गणेश जयंती उत्सव तीन दिवस मोठा शानदार उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो.
चिपळूण-गुहागर रस्त्यालगतच शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकापासून सुमारे ४ कि.मी. अंतरावर मंदिर असून वशिष्ठी नदी तीरावरील एका प्रशस्त मैदानावर वसलेले आहे.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply