अर्जुन डांगळे यांचा जन्म १५ जून १९४५ रोजी झाला. त्यांचे वडील उमाजी डांगळे हे रिपब्लिकन पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते होते. माटुंग्या-तल्या लेबर कॅंपमधल्या झोपडीवजा घरातच अर्जुन डांगळे यांचे बालपण गेले.
आचार्य अत्रे, आण्णा भाऊ साठे, बाबुराव बागुल यांच्यासह अनेक नेते त्यांच्या घरात येत असत. बालपणीच त्यांच्यावर आंबेडकरी आणि विद्रोही विचारांचे संस्कार झाले. पुढे अर्जुन डांगळे दलित पॅंथरच्या चळवळीतही उतरले. विद्रोही साहित्यिकांच्या चळवळीतही ते आघाडीवर होते. दलित वर्गाला सोसाव्या लागणाऱ्या यातना, दु:खे, अवहेलना या साऱ्यांचे जळजळीत दर्शन त्यांच्या कवितातून घडायला लागले.
नामदेव ढसाळ, राजा ढाले आणि डांगळे यांच्या कविता त्या काळात प्रचंड गाजल्या. मराठी साहित्यालाही दलित कवितांची दखल घ्यावी लागली. “छावणी हालते आहे’, या त्यांच्या कविता संग्रहाने क्रांतीचे तत्वज्ञान मांडण्याला नवी दिशा मिळाली. त्यांच्या या कविता संग्रहाने मराठी साहित्य क्षेत्र हादरून गेले. कोणताही आडपडदा न ठेवता, प्रस्थापितावर थेट हल्ले चढवणारी आणि सामाजिक न्यायासाठी हाक घालणारी त्यांची कविता लोकप्रिय ठरली. दलित पॅंथरच्या चळवळीतही डांगळे आघाडीचे शिलेदार होते. रस्त्यावर उतरून त्यांनी जनजागरण आणि प्रस्थापिताविरुध्द आंदोलनेही केली. या चळवळीने काही काळ महाराष्ट्रातल्या राजकीय चळवळीला हादरेही दिले होते.
“पॉयझंड ब्रेड’ या त्यांनी संपादित केलेल्या दलित साहित्यविषयक ग्रंथाचा जागतिक साहित्य क्षेत्रातही नावलौकिक झाला. दक्षिण आफ्रिकेचे तेव्हाचे अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी, १९९८ मध्ये अर्जुन डांगळे दक्षिण आफ्रिकेत गेले तेव्हा आपल्या आत्मचरित्राची प्रत सही करून दिली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचे स्वार्थांध राजकारणी नेत्यामुळे तुकडे तुकडे झाले. हा पक्ष नामधारी झाला. तेव्हा महाराष्ट्रातल्या सर्व दलित संघटनांची भारिप-बहुजन महा-संघाच्या झेंड्याखाली एकजूट उभारण्यातही डांगळे आघाडीवर होते.
छावणी हलते आहे, ही बांधावरची माणसं, नवा अजेंडा : आंबेडकरी चळवळीचा, झिलकरी चळवळीचे, दलित विद्रोह, मैदानातील माणसे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
— संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply