एखाद्याचे नशीब आयुष्यात कीती वेगवेगळी वळणे घेईल ते सांगता येत नाही.
उमादेवीचा जन्म उत्तर प्रदेश मधील आमरोहा जिल्ह्यातील अलिपुर गावी खत्री घरात ११/७/१९२३ रोजी झाला. घराचे व्यवस्थित चालू होते. पण ती अडीच वर्षांची असताना प्रॉपर्टी वरुन तिच्या आई वडिलांचा खून करण्यात आला. त्यावेळी ती व तिचा नऊ वर्षांचा भाऊ हरी जीवंत राहिले. तिला फक्त त्याचाच आधार होता. उमा पाच वर्षांची असताना तिच्या भावाचाही खून करण्यात आला. उमा अनाथ झाली.
ती आता काकाकडे वाढू लागली. पण तिला मोलकरणी सारखे वागवले जाऊ लागले. त्यावेळी तिचा एकच आधार होता, तो म्हणजे रेडियो. तो सुद्धा शेजाऱ्यांकडील. पण तिला सगळी गाणी पाठ होऊ लागली. पुढे ती पळून दिल्लीला गेली. तिथे तिची ओळख अख्तर काझीशी झाली. तो रेव्हेन्यू विभागात कामाला होता. पण फाळणीच्या वेळी तो पाकिस्तानात लाहोरला गेला.
तिच्या एका मैत्रिणीने तिची ओळख असिस्टंट डायरेक्टर हुसेनशी झाली. त्यांच्या बरोबर ती मुंबईला आली व त्याच्या कडे राहू लागली. हुसेनने तिची ओळख अरुण आहुजा व निर्मालादेवी यांच्याशी ( गोविंदाचे आईवडील ) करून दिली. त्यानी तिला वेगवेगळ्या प्रोड्यूसर,डायरेक्टरशी ओळख करून दिली.
एक दिवशी तिला कळले की प्रसिद्ध निर्माते ए. आर. कारदार दर्द चित्रपट बनवत आहेत.ती तडक कारदार कडे गेली व म्हणाली “मला तुमच्या चित्रपटात गायचे आहे”. तिचा आगाऊपणा त्यांना आवडला नाही तरी त्यानी तिला नौशादचे सहायक गुलाम मोहम्मद ( पाकीजाचे संगीतकार ) कडे पाठवले. तिने त्यांना नुरजहाचे गाणे म्हणून दाखवले. त्याना समजले की हिने गायकीचे शिक्षण घेतले नाही. पण आवाज चांगला आहे.
तिथून ती नौशादकडे गेली व म्हणाली “मला गायला घ्या नाहीतर मी तुमच्या घरासमोरील समुद्रात जीव देईन”. नौशाद तिच्या आगाऊपणाकडे बघतच राहिले, पण तिला ५०० रुपये महिना पगारावर कारदार प्रोडक्शन मध्ये कामाला ठेवले. तिने दर्द सिनेमात गाणी गायली ,आज मची ह्ए धूम, बेताब हए दिल,( सुरया बरोबर ) अफसाना लिख रही हू दिले बेकारारका (मूनवर सुलताना चित्रित). पण सुरयाला वाटले की हे गाणे माझ्यावर चित्री झाले असते तर किती बरे झाले असते. लाहोरला काझीना उमादेवी शिवाय रहावंत नव्हते. ते भारतात परतले व उमादेविशी लग्न केले.
१९४८ साली तिने अनोखी अदा मध्ये २, चंद्रलेखात ७ गाणी गाईली. १९४९ महल चित्रपट आला. त्यामधील आयेगा आनेवाला आयेगा (होय तेच सुप्रसिद्ध गाणे, गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम ) या गाण्यासाठी खेमचंद प्रकाश यांनी उमादेविला विचारले पण तिचा कारदार पिक्चर्स साठी करार झाल्यामुळे तिला आयेगा आनेवाला गाता आले नाही. तिने एकूण ४५ गाणी गायली.पण लग्नानंतर मुलांची देखरेख करण्यासाठी गायन सोडावे लागले. दरम्यान ती खूप जाडी झाली होती.
पुढे काही वर्षांनी ती पुन्हा नौशाद कडे गेली,तेव्हा ते म्हणाले “ आता काळ बदलला आहे, गायनाचे शिक्षण घेतलेल्या गायिका लता, आशा, गीता दत्त आल्या आहेत व त्यानी इंडस्ट्री मध्ये आपला जम बसवला आहे. तू अभिनयात प्रयत्न का करत नाहीस ?” तिने थोडा विचार केला. व नौशादना म्हणाली “ मी पहिले काम करीन तर ते दिलीपकुमार बरोबरच “ नौशाद सुद्धा तिच्याकडे बघत राहिले. पण लवकरच तो योग आला.
१९५० च्या बाबूल मध्ये तिला दिलीपकुमार बरोबर काम करण्याचा योग आला. त्या मध्ये एक सीन होता उमादेवी सुंभाच्या कॉटवर बसते. पण तो सीन करताना तिच्या वजनाने ती कॉटमध्ये पडते . तेव्हा दिलीपकुमार हसला व म्हणाला “ अरे इस टूणटूण को कोई उठाओ” तिला ते नाव आवडले व तिने आपले नामकरण टूणटूण केले.आपल्या शारीरिक व्यंगांवर विनोद करून घेणे सोपी गोष्ट नाही.
५० व ६० च्या दशकात ती दर वर्षी १२ ते १३ चित्रपट करीत असे. समोरचे कलाकार बदलत होते. आगा,जॉनी वॉकर, महमुद, मुकरी, ओ पी रल्हन, पण ती मात्र तशीच होती १९९२ नंतर तिने काम करणे थांबवले.
वयाच्या ७५ व्या वर्षी तिची मुलाखत टॉम ऑलटर ने घेतली तेव्हा सुद्धा तिची विनोद बुद्धी शाबूत होती. त्याने विचारले “ तुम्हाला लग्न करायला आवडेल का ?”ती म्हणाली “ अजून तर मी सोळा वर्षाची आहे माझे लग्नाचे वय तर होऊ दे. तसे मला दिलीपकुमारने लग्नासाठी विचारले होते. पण मीच नाही सांगितले माझे वय तर होउ दे.”
तिने १९६ चित्रपटात काम केले. पण तिला दुर्दैवाने तिला कोणतेही अवॉर्ड मिळाले नाही.
२३ ११ २००३ मध्ये तिचे निधन झाले.
– रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply