मनोविकास प्रकाशन संस्थेने तामिळ लेखिका सलमा यांचे व सोनाली नवांगुळ यांनी अनुवाद केलेले पुस्तक ज्याला साहित्य अकादमीचा नुकताच पुरस्कार मिळाला हे पुस्तक प्रसिद्ध केलं आहे.
या कादंबरीला उत्कृष्ट अनुवादिसाठी साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविलेली आहे.
तसे प्रत्येकाचे तास ज्याचे त्याचेच असतात. जिथे प्रेम आहे तिथे काही तासावर दुसऱ्यांचीही हुकुमत असते. मध्यरात्रीनंतरचे तास आपल्या हातात नसतात, त्यांच्यावर आठवणींची, विचारांची,शरीराची, प्रेमाची, वासनेची हुकुमत असतें.लैंगिक घुसमट होणाऱ्यांची मध्यरात्रीनंतर अवस्था बेचैन करणारी असतें.
उंबरठयाच्याच्या आत असलेल्या बायकांचे जीवन. बायकांच्या जगात त्रास देणारे पुरुष तसेच स्त्रियांचे अभावग्रस्त जगणे यात चितारले आहे.नमाजाच्या मधल्या वेळातच जगणे व जीवन मृत्यू चे सोहळे तसेच घरासाठी राबणे यात लैंगिकतेचा विचार ही न करता येणे अशा अनेक स्त्रियांची घुसमट यात आहे.मासिक पाळीची सुरुवात चांगले की वाईट याचा सुद्धा गोंधळ अनेकांच्या मनात असतो, याबद्दलचा उच्चारही अजून कुटुंबात होत नाही.
तामिळनाडू मधील बायकांनी तोंड उघडणेच मान्य नसणाऱ्या रुढीप्रिय आणि बंदिस्त समाजात १९६८मध्ये सलमाचा जन्म झाला
तिचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला तेव्हा हा परंपरावादी समाज हादरला. सलमा व आणखी तीन कवयित्रीवर अश्लील व बीभत्स लेखनाचा आरोप झाला,त्यांना धमक्या दिल्या गेल्या. तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली या जिल्ह्याच्या तिरूवनकुरिची ग्रामपंचायतची सरपंच म्हणून सलमाने काम केलं. राज्याच्या समाज कल्याण मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची ही संधीही तिला मिळाली. राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवलेल्या लेखिकेची ही पहिलीच कादंबरी तिला आंतरराष्ट्रीय ख्याती देऊन गेली.
या कादंबरीतील रबिया, रहीमा जोहरा अमीना,खदीजा,फिरदौस, फरिदा, नुराम्मा आणि अशा आणखी कितीतरी स्त्रिया त्यांच्या खासगी पुरुषसत्ताक जगात छोटी-छोटी विद्रोहाची निशाणी फडकवतात. नाना तडजोडी करतात… मैत्री जुळते, भंगते, घरं एकत्र येतात, दुभंगतात पण या सगळ्यांच्या नकळत धिमेपणाने बदल घडत राहतात… बायकांची आयुष्य बदलून जातात.
सलमानची काव्यात्म, सरळ साधी भाषा मुस्लिम स्त्रियांच्या कौटुंबिक जगण्यातील व्यस्तता, जटिलता आणि घुसमट परिणामकारकपणे मांडते.
जगण्याच्या घुसमटीतून आपल्या पावलांपुरता प्रकाश आणि स्वातंत्र्य शोधणार्या सर्वांना.. हे पुस्तक सोनालीने अर्पण केले आहे.
कविता महाजन यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
उंबरठ्या आतील घरातील सगळी जागा स्त्रियांसाठी खुली नव्हतीच आजही अनेक कुटुंबात बैठकीच्या खोलीत बायका येऊन बसत नाहीत खिडकीशी उभ्या राहात नाहीत.
आणि निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा येथेच पूर्ण होतात तसेच लैंगिक सुख वंशविस्तार व नैसर्गिक प्रेरणा व्यक्त करण्याची पूर्णत्वास नेण्याची जागा ही प्रामुख्याने हीच जागा असतें.
हे जग समृद्ध करण्यासाठी इतर बहुतांश सर्वसामान्य पुरुष उंबरठ्याबाहेर जाऊन काम धाम करतात, अर्थार्जन करतात कितीही दूर गेलें असले तरी प्रत्येकाला परतायला घर हवं असतं आणि तेही कुटुंबासहितच घर, बायका, मुलें, वृद्ध, अपंग माणसं, घरकाम, स्वयंपाक घरातली कला कौशल्य या सर्वच गोष्टी कडे जरा बाहेर पडून पुन्हा घरी परतणारे पुरुष इतके तुच्छतेने कां पाहतात, बायकी काहीतरी असं म्हणत ते बायकांचे लेखन हे सारं त्यांना क्षुल्लक कां वाटतं तर यामागे सत्तेचे राजकारण आहे ,हें सर्वज्ञात आहे या सर्व पार्श्वभूमीवर सलमा या तामिळ लेखिकेच्या कविता आणि तिची ही पहिलीच कादंबरी लक्ष वेधून घेते.
उंबरठ्या बाहेरची जगं लेखिका सहसा रंगवत नाहीत.रबिया या वयात येऊ घातलेल्या लहान मुलीची ही गोष्ट मुलींनी, स्त्रियांनी सिनेमा बघायचा नाही हा फतवा निघाल्यावर एक दार बंद होऊन जातं, तरी घरातल्या टीव्हीवर पोर्न कॅसेट बघण्याचा व व्हिडिओ वर गाणी ऐकण्याचा पर्याय बायकाकडें आहे. घरातले कमावते पुरुष अर्थार्जनासाठी त्यांचं दुसऱ्या देशात जाणं, परत येणं व काहींच परत न येणं,तिथेच मृत्यू पावणं, तिथून पत्र व भेटवस्तू पाठवणं, तिथं त्यांनी दुसऱ्या बायकोशी घरोबा करणं हे सारं त्या देशांमधल्या सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती वर अवलंबून राहतं, त्याचे चांगले वाईट परिणाम गावातल्या बायकांच्या उंबरठ्याच्या या आतल्या जगावर होत राहतात. या परिणामाचे सविस्तर चित्रण ही कादंबरी प्रभावीपणे करते.
लहान वयात होणारें विवाह, पुनर्विवाह, एकट्या बायकांचे पुरुषाशिवाय जगणं ,त्यांची लैंगिक भूक दर्शवणारी मोकळी चर्चा, विधवा आणि घटस्फोटित बायकांचा दबलेला हुंकार या कादंबरीत आपल्याला दिसतो.
तरीही त्यात धाग्यांची गुंतागुंत अजिबात नाही. मोठ्या धाग्यावर अनेक धाग्यांनी केलेलं हे सहज गाठी नसलेलं सरळ धाग्याचं विणकाम लेखिकेने केलं आहे.
मुस्लिम समाजाचं, त्यांच्या दैनंदिन जगण्यात वागण्याचे, रुढी-परंपरांचें सहज चित्रण या कादंबरीत आढळतं. हे सर्व वाचताना मनाला विषण्णता येत नाही. धर्माविषयीचे कुतूहल, वर्ग भेदाचं कुतूहल, स्त्री-पुरुष भेदाचं कुतूहल, अशा अनेकविध कुतूहलाच्या पातळीवर हे लेखन वाचकाला गुंतवून ठेवतं.
स्त्रियांच्या व्यथा-वेदना यांचे उत्कट चित्रण लेखिकेनं चितारलं आहे.
सोनाली यांनी भाषांतर करताना सुद्धा सलमाच्या काव्यातील शब्दांची धिटाई ,स्पष्टवक्तेपणा, हा जाणवतो.
रूढी, परंपरेमुळे व लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे शिक्षणाचा व सुसंस्कृतपणाचा अभाव असल्यामुळे लैंगिकता विकृतीचा कधी हात धरतें ते कळत नाही.ज्या कुटुंबात सुसवाद नाही, शिस्तीच्य नावाखाली व्यक्तिमत्त्वाची गळचेपी होते, घुसमट होते, तिथें मध्यरात्रीनंतर चे तास बेचैन करणारेच असतात. या बाहेर पडणाऱ्या घुसमटीवर उपाय शोधल्यानेच मध्यरात्रीनंतरचे तास सुसह्य होणार आहेत.
मध्यरात्री नंतरचे तास : लेखिका सलमा
अनुवाद: सोनाली नवांगुळ
मनोविकास प्रकाशन. पृष्टे:५६० किंमत:५००रू.
— डॉ. अनिल कुलकर्णी
9403805153
Leave a Reply