गुलजारने पटकथा लिहिलेल्या ,गीते लिहिलेल्या ,संवाद लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या १६ चित्रपटांवर मी गेले काही दिवस लिहिले. थोडक्यात “सबकुछ गुलजार “चित्रपट मी निवडले होते. अर्थातच मी हे सर्व चित्रपट गेली चाळीसहून अधिक वर्षे अनेकवेळा जगलेलो आहे. पूर्वी बहुतांशी वेळी चित्रपटगृहात ,नंतर टीव्ही वर आणि आजकाल यु ट्यूब वर मूड येईल तेव्हा ,वेळ असेल तेव्हा आणि संधी मिळाल्यावर एकटयाने अथवा कुटुंबियांसोबत /मित्रांसोबत हे चित्रपट पाहिलेले आहेत. त्यावर चर्चा /मतप्रदर्शन /खडाजंगी वगैरे वगैरे करून झाले आहे. लिखाण मात्र कधी केले नव्हते. ते या निमित्ताने झाले. सध्या सवड आहे /(भरपूर लेखनाचा ) संकल्प केलेला आहे म्हणून हे लेखन एका झपाटयात होउन गेले. सगळं विसरायच्या आत ही पण माझी अट होती. ” गुलजार आणि आपण ” हा विचार कोणत्यातरी क्षणी मनात डोकावून गेला त्या क्षणाचे हे मावंदे !
आता मस्त “रितं ” वाटतंय. इतका गुलजार आणि तोही इतक्या खोलवर “आतमध्ये” आहे याची खरंच कल्पना नव्हती. त्यामुळे काहीवेळा मीच आश्चर्यचकित झालो. हे लेखन कसे होते ?
रसग्रहणात्मक की आस्वादात्मक की परीक्षण की पृत्थकरणात्मक (analysis ) की भाष्यात्मक की आणखी काही ? बऱ्याचवेळी वाचकांच्या अभिप्रायांमधून /शेऱ्यांमधून (comment ला पर्याय वाची शब्द) असे उल्लेख /प्रश्न आले. काहीवेळा मी उत्तरलोही .
पण आज “आतमध्ये” विचारून बघितल्यावर कळलं – हे लेखन गुलजारचं “देणं “काही अंशी फेडण्याचा प्रयत्न होता. ज्या व्यक्तीने गेली चाळीसहून अधिक वर्षे मला सुसंस्कारीत केलं ,घडवलं ,विचारांवर प्रभाव टाकला, काव्याची गोडी लावली ,शब्दशः माझ्यावर गारुड केलं आणि दर्जेदार चित्रपट हा माझ्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य घटक केलं त्याला माझ्यातर्फे ही “return gift ! ”
देणी कधीतरी परत करायला हवीच आणि तीही लवकरात लवकर ! नाहीतर सगळं UNTOLD (हे माझ्या ब्लॉगचंही नांव आहे.) रहायचं !
हे लेखन खूप जणांना आवडलं .त्यांना “स्मृती रंजनात ” रमवून गेलं ! काहीजणांनी माझ्या लेखनावर भाष्य केलं, काहीजणांनी सूचना केल्या , काही जणांनी “अजीर्ण “झालं ,मध्ये थोडी “गॅप “घ्या अशा (प्रेमळ) सूचनाही केल्या. एकमात्र- “लेखन चालू ठेवा ‘असा सूर सर्वत्र होता. प्रकाशित करा असंही सुचविलं .
मात्र “स्वान्तसुखाय ” या प्रकारचं हे लेखन असल्याने “बघू या” असाच माझा प्रतिसाद होता. “माझा” गुलजार “त्यांचाही” तितकाच आहे हे यानिमित्ताने अधोरेखित झाले. एवढा आनंद सध्या पुरे !
हिंदी चित्रपटसृष्टी सर्वार्थाने विकसित आणि संपन्न करणाऱ्या, विविध विषयांना तितक्याच ताकतीने भिडणाऱ्या, आणि समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांना “उत्तरे”सुचवणाऱ्या समकालीन जागल्याचा विविधांगाने घेतलेला हा सलग धांडोळा !
इति !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply