बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली नसती तर मराठी माणसांचे आज अतोनात नुकसान झाले असते. शिवसेनेमुळेच महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती टिकून आहे ही वस्तुस्थिती आहे. ती कोणीही नाकारू शकत नाही, हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे.’
१३ ऑगस्ट १९६० साली ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले त्यावेळेस विशेषत: मुंबई परिसरातील कारखाने, सरकारी कार्यालयांमध्ये परप्रांतीयांची भरती सर्रास चालू होती आणि येथील मराठी तरुण हतबलतेने हे सर्व बघत बसला होता. ज्यांनी पंडित नेहरू आणि केंद्र सरकारबरोबर झगडून आपल्या रक्तामांसाच्या १०५ मराठी बांधवांची आहुती देऊन महाराष्ट्र मिळवला तो मराठी तरुण मुंबई, महाराष्ट्रात नोकरी-धंद्यासाठी वणवण भटकत होता. अशा वेळेस ‘मार्मिक’मध्ये प्रत्येक कारखान्यातील परप्रांतीयांच्या झालेल्या नोकरभरतीच्या याद्या एक व्यक्ती प्रसिद्ध करून मराठी तरुणांची मने या अन्यायाविरुद्ध पेटवीत होती. त्यांच्या न्याय्य हक्कांची त्यांना जाणीव करून देत होती. ती व्यक्ती म्हणजेच बाळासाहेब ठाकरे!
पुढे १९ जून १९६६ रोजी मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी, त्यांना नोकरी-धंदा मिळवून देणारी शिवसेना संघटना बाळासाहेबांनी स्थापन केली. मराठी माणसांना स्वाभिमानाने जगण्याची, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची शिकवण दिली. १९६९ मध्ये शिवसेनाप्रमुखांनी ‘बेळगाव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ म्हणून सीमा प्रश्नाची तड लावण्यासाठी प्रचंड आंदोलन उभारले आणि त्या आंदोलनामध्ये मुंबईत पोलीस गोळीबारात ६८ कोवळे मराठी तरुण शिवसैनिक हुतात्मा झाले. मुंबई धगधगत होती. काही केल्या मुंबई शांत होत नव्हती. त्यावेळेस मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी बाळासाहेबांची मनधरणी केल्यामुळे पुण्यातील येरवडा तुरुंगातून बाळासाहेबांनी आदेश दिल्याबरोबर शिवसैनिकांनी आंदोलन थांबविले आणि बाळासाहेबांच्या आदेशानुसार मुंबईतील सर्व रस्तेदेखील स्वच्छ केले.
एक व्यक्ती जशी एखादे आंदोलन पेटवू शकते तशीच आपल्या एका आदेशानुसार थांबवूही शकते, असा नेता त्या वेळेपासून आजच्या घडीपर्यंत फक्त बाळासाहेब ठाकरेच आहेत हे निर्विवाद सत्य शिवसेना विरोधकही खासगीत कबूल करतात. शिवसेनाप्रमुखांवर शिवसैनिकांची नितांत श्रद्धा आहे, प्रचंड विश्वास आहे. शब्दाखातर जिवाची बाजी लावणार्या शिवसैनिकांच्या त्या विश्वासाला बाळासाहेबांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. एक जुनी आठवण माझ्या अद्यापि स्मरणात आहे. मला अद्यापि स्मरते, साधारणत: १९६९-१९७० साली पनवेलमध्ये नगरपालिका मैदानावर बाळासाहेबांची झालेली सभा. त्यावेळेस महाराष्ट्रात बाळासाहेब आणि आचार्य अत्रे यांची जुगलबंदी चालू होती. ज्या ज्या ठिकाणी बाळासाहेब सभा घेत त्या त्या ठिकाणी नंतर आचार्य अत्रे सभा घेत असत. पनवेलच्या सभेत बाळासाहेबांनी म्हटले होते की, ‘मी ज्या गावात सभा घेतो, त्या त्या गावात आचार्य अत्रे सभा घेतात. अत्रे नावाचा डुक्कर आमची विष्ठा खाण्यासाठी आमच्या मागून येत आहे.’ हे वाक्य अद्यापि माझ्या स्मरणात आहे. इतकी जहाल टीका करणारा, रोखठोक बोलणारा नेता तेव्हापासून आतापर्यंत एकच ते म्हणजे बाळासाहेब.
त्याकाळी ‘मार्मिक’मधील रविवारची जत्रामध्ये कम्युनिस्ट पक्षांचे नेते कॉ. ई. एन.एस. नंबुद्रीपाद, कॉ. भाई डांगे, मुस्लिम लीगचे जी. ए. बनातवाला, मोरारजी देसाई, इंदिरा गांधी इत्यादींची साप, अजगर, बेडूक, बांडगुळे अशा प्रकारची व्यंगचित्रे त्याकाळी फारच वस्तुस्थिती निदर्शक असत.शिवसेनेच्या स्थापनेपासून भांडवलशाही वृत्तपत्रांनी चोहोबाजूने बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर संकुचित, जातीयवादी, फॅसिस्ट वगैरे म्हणून टीका केली. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी बाळासाहेबांजवळ एकच माध्यम होते ते म्हणजे ‘मार्मिक’ साप्ताहिक. रोज होणार्या टीकेला बाळासाहेब आठवड्यातून एकदा ‘मार्मिक’मधून जहाल आग ओतणार्या अग्रलेखाद्वारे, व्यंगचित्रांद्वारे उत्तरे देत असत. त्यांच्यावर होत असलेल्या टीकेतील निराधार मुद्दे खोडून काढत असत.
शिवसेनाप्रमुखांनी आपल्या सहकार्यांचा अभ्यासूपणा अचूक हेरून कामगार क्षेत्राची माहिती असणार्या दत्ताजी साळवींना भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष केले. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष सुधीरभाऊ जोशींना केले. भारतीय विद्यार्थी सेना, शिवसेना शाखा इत्यादी स्थापन करून आपल्या सहकार्यांवर जबाबदारी सोपवून सर्वच क्षेत्रांत शिवसेनेचा विस्तार केला. ‘मार्मिक’ साप्ताहिक अपुरे पडू लागले म्हणून शिवसेना संघटना स्थापन केली. पुढे शिवसेनेमुळे ‘सामना’ दैनिक सुरू झाले आणि ‘सामना’मुळे तसेच बाळासाहेबांच्या अथक परिश्रमातून त्यांच्यावर असलेल्या जनतेच्या प्रचंड विश्वासामुळे महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार आले. तसे पाहिले तर शिवसेनेच्या सामाजिक कार्यामुळे याअगोदर केव्हाच महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता यावयास हवी होती. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, आसाममध्ये प्रादेशिक पक्ष सत्तारूढ झाले. परंतु महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येण्यास तब्बल २९ वर्षे लागली.
बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली नसती तर मराठी माणसांचे आज अतोनात नुकसान झाले असते. शिवसेनेमुळेच महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती टिकून आहे ही वस्तुस्थिती आहे. ती कोणीही नाकारू शकत नाही, हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे.शिवसेनाप्रमुखांचा दरारा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात होता. त्यांना कुणी हिटलर म्हणतो, कुणी हुकूमशहा, परंतु बाळासाहेब हे आपल्या खासगी जीवनात फारच हळव्या मनाचे आहेत. सुरक्षा व्यवस्थेमुळे सर्वच शिवसैनिकांना त्यांची भेट मिळू शकली नाही. परंतु पूर्वी मातोश्रीवर येणार्या शिवसैनिकांचीदेखील ते आस्थेने विचारपूस करीत असत.
मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेना संघटना स्थापन केली. बाळासाहेबांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे धोरण ठरविले. तद्नंतर १९६८ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली. त्यावेळेस मुंबईतील मराठी माणसांनी शिवसेनेला उत्स्फूर्तपणे साथ दिली आणि शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्षाबरोबर युती करून मुंबईचे महापौरपद मिळविले. डॉ. हेमचंद्र गुप्ते हे शिवसेनेचे पहिले महापौर झाले. त्याचवेळेस ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतदेखील ठाणेकरांनी शिवसेनेला चांगल्या प्रकारे साथ दिली आणि शिवसेनेचा ठाण्याचा नगराध्यक्ष झाला.
१९६९ मध्ये मुंबईतील परळ येथील कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. कृष्णा देसाईंच्या निधनामुळे परळ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक हे निवडून आले. ते शिवसेनेचे पहिले आमदार. १९७४ मध्ये गिरगाव विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रमोद नवलकर विजयी झाले. मुंबई महापालिकेतून मनोहर जोशी विधान परिषदेत निवडून आले. अशाप्रकारे शिवसेनेचा हळूहळू राजकारणात प्रवेश होत होता. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून येऊ लागले आणि सामान्य माणसांचे प्रश्न शिवसेनेचे नगरसेवक, आमदार, शाखाप्रमुख शिवसेना शाखेत बसून सोडवू लागले. मराठी माणसांना न्याय मिळवून देऊ लागले. त्यांना नोकरी-धंदा मिळवून देऊ लागले. गिरगावचे माजी नगरसेवक कै. गजानन (भाई) वर्तक यांनी शिवसेनेची पहिली रुग्णवाहिका सुरू केली आणि गरीबांसाठी मोफत औषधपेढी सुरू केली. आज महाराष्ट्रात शिवसेनेच्या असंख्य रुग्णवाहिका रस्त्यावर धावताना दिसतात. जगाच्या पाठीवर कोणत्याच पक्षाच्या, संघटनेच्या नसतील इतक्या शिवसेनेच्या रुग्णवाहिका गरजूंना मदत करताना दिसतात.
१९७३ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील शिवसेनेला चांगले यश मिळाले. त्यावेळेस मुंबईचे सर्वात तरुण महापौर म्हणून सुधीरभाऊ जोशी यांची मुंबई महापालिकेच्या इतिहासात नोंद झाली. तद्नंतर मनोहर जोशी, वामनराव महाडिक महापौर झाले.
महाराष्ट्र, कर्नाटक सीमा प्रश्नाची तड लावण्यासाठी २ मार्च १९७१ रोजी बाळासाहेबांनी महाराष्ट्र बंद केला होता. बाळासाहेबांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेने पुकारलेले बंद यशस्वी होत ही अभिमानास्पद बाद आहे.
१९७४ मध्ये महाराष्ट्रात थेट नगराध्यक्षांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये ठाण्याचे नगराध्यक्ष म्हणून सतीश प्रधान निवडून आले आणि शिवसेनेच्या समाजकारणाप्रमाणे त्यांनी ठाणे शहराचा कायापालट केला. ठाण्यात दादोजी कोंडदेव मैदान, गडकरी रंगायतन, तरण तलाव इत्यादी ठाणेकरांच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी नजरेत भरण्यायोग्य सुधारणा केल्या. ठाणे शहरात खर्या अर्थाने सतीश प्रधानांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आणि शिवसेनेला मानाचे स्थान प्राप्त झाले. ठाणे जिल्ह्यात डहाणू, तलासरी, जव्हार, पालघर भागांत कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. त्यावेळेस तेथे इतकी दहशत होती की, तेथे शिवसेनेला कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते शिरकाव करून देत नव्हते.
आनंद दिघे साहेब आणि सतीश प्रधानांनी कम्युनिस्टांच्या दहशतीचा मोठ्या धैर्याने मुकाबला करून गावोगावी शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या. गणेश नाईकांनी बेलापूर पट्टीतील कॉंग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आणून शिवसेना वाढविली. साबीर शेख यांनीदेखील शिवसेना संघटना वाढीचे काम केले. अशाप्रकारे शिवसेनेची वाढ होत गेली. शिवसेनेची घोडदौड झपाट्याने होत होती.
१९७४ मध्ये बंडू शिंगरे बंड करून शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी प्रतिशिवसेना स्थापन केली. परंतु त्याचा शिवसेनेवर काहीही परिणाम झाला नाही.
१९७४-७५ मध्ये महाराष्ट्रात सरकारी कर्मचार्यांनी संप पुकारला होता. संप दोन्ही बाजूंनी फारच ताणला गेला होता. त्यावेळेस बाळासाहेबांनी सरकारी कर्मचार्यांना आवाहन केले होते की, सरकारी कर्मचार्यांनो, सन्मानाने मंत्रालयाच्या पायर्या चढा; परंतु त्यावेळेस बाळासाहेबांवर सरकारी कर्मचार्याच्या नेत्यांकडून आणि विरोधकांकडून फारच टीका झाली होती की, बाळासाहेब सरकारधार्जिणे आहेत; परंतु नंतर सरकारी कर्मचार्यांनी आपला संप मागे घेतला. त्यांना त्यांची चूक नंतर उमगली तसेच डॉ. दत्ता सामंतांनी गिरणी कामगारांचा संप आपल्या हट्टापायी फारच ताणला. त्यावेळेसदेखील बाळासाहेबांनी डॉ. दत्ता सामंतांना आपला हट्टीपणा सोडून या संपामध्ये तडजोड करण्याचे आवाहन केले. आपल्या हेकेखोरपणामुळे गिरणी कामगारांचे नुकसान होईल; परंतु डॉ. दत्ता सामंतांनी ऐकले नाही आणि नंतर लाखो गिरणी कामगारांचे संसार उद्ध्वस्त झाले हे सर्वांना ठाऊक आहे.
२५ जून १९७५ रोजी माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली. त्यावेळेस विरोधी पक्षांच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना तुरुंगात डांबले. त्यावेळेस बाळासाहेबांनी आणीबाणीला पाठिंबा दिला. परंतु त्यावेळेस स्वत:ला मुंबईचे सम्राट समजणारे मुंबई विभागीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कै. बॅ. रजनी पटेल यांनी इंदिरा गांधींवर दबाव आणून शिवसेनेवर बंदी घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात कॉंग्रेसचे पानिपत झाले आणि विरोधी पक्षांचे म्हणजेच जनता पक्षाचे सरकार केंद्रात स्थापन झाले. शिवसेनेने देशाच्या राजकीय वाटचालीत आपला एक ठसा उमटविला आणि त्यामागे होती बाळासाहेबांची कल्पकता…!
स्पष्ट पारदर्शक भूमिका घेणारे ते नेते होते. मंडल अहवालाबाबतीत आपली रोखठोक भूमिका मांडली होती. जातीपातींवर आधारित सवलती आम्हाला मान्य नाही. जो कुणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल, मग तो कुठल्याही जातीचा असला तरी त्याला आर्थिक व इतर सवलती मिळाल्या पाहिजेत. जातीपातींवर आधारित जातीजातींमध्ये भेद निर्माण करून देण्यात येणार्या सवलतींना माझा विरोध आहे. किती सुस्पष्ट भूमिका बाळासाहेबांची मंडल अहवालाच्या बाबतीत.
बाळासाहेब हे मुस्लिम, दलितविरोधी म्हणून सर्वजण त्यांच्या विरुद्ध टीकेचे रान उडवून देतात. परंतु बाळासाहेब हे जात्यंध, राष्ट्रद्रोही मुस्लिमांविरोधी होते. तसेच ते दलितांविरुद्ध तर मुळीच नव्हते. त्यांच्या मनात दलितांबद्दल आकस मुळीच नाही. दलित समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे हे ते वेळोवेळी सांगत व पटवून देत, परंतु स्वार्थी राजकारणी मात्र विनाकारण त्यांना टीकेचे लक्ष्य बनवीत.
बाळासाहेबांना सर्वांना मोठा आघात सहन करावा लागला असेल तर माँसाहेबांचे अचानक झालेले दु:खद निधन आणि बिंदुमाधवचे अकाली निधन. तरीही बाळासाहेबांनी स्वत:ची दु:खं गिळून समाजसेवेचं व्रत अखंडपणे चालू ठेवले. वास्तविक बाळासाहेबांना ना सत्तेची हाव होती ना कशाची. १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली. राज्यात मराठा लॉबी, शुगर लॉबीचे वर्चस्व असूनदेखील बाळासाहेबांनी मनोहर जोशी या ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपदी बसविले. हे धाडस केवळ बाळासाहेबच करू शकले. या काळात मुंबईत ५५ उड्डाणपूल, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे इत्यादी अनेक लोकोपयोगी कामे बाळासाहेबांनी करून दाखविली.
१९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा पराभव झाला. ज्या नारायण राणेंना सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री केले, नंतर १९९९ मध्ये विरोधी पक्षनेता केले त्या नारायण राणेंनी शिवसेना सोडली. काही महिन्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन करून २००९च्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आणले.हे दोन मोठे धक्के बाळासाहेबांना बसले. तरीही बाळासाहेबांनी मोठ्या जिद्दीने मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली इत्यादी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला यश मिळवून दिले. वयोमानापरत्वे बाळासाहेबांची प्रकृती बिघडू लागली.
एकच नेता, एकच झेंडा, एकच मैदान यानुसार ४६ वर्षे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेतला.
त्याच शिवतीर्थावर २० लाखांच्या जनसमुद्राच्या साक्षीने रविवार, १८ नोव्हेंबर २०१२ रोजी सूर्यास्ताच्या प्रसंगी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मंत्राग्नी दिला गेला. याप्रसंगी लाखो शिवसैनिक, बाळासाहेबप्रेमी अक्षरश: धाय मोकलून रडताना सर्व जगाने पाहिले.
कुणी म्हणतात महाराष्ट्रात पोकळी निर्माण झाली.., कुणी म्हणतात सूर्यास्त झाला… परंतु सूर्य जेव्हा अस्ताला जातो तो रात्रभर विसावा घेऊन पुन्हा पहाटे नव्या जोमाने, नव्या तेजाने जगाला प्रकाश देण्यासाठी, दिशा देण्यासाठी उदयास येतच असतो… या निसर्ग नियमाप्रमाणे परमेश्वरदेखील बाळासाहेबांना पुन्हा आपल्यामध्ये नक्कीच पाठवेल हीच वेड्या शिवसैनिकांची वेडी आशा…!
— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग
Leave a Reply