राजस्थानचा खडा स्वर, मोहनवीणेचा झंकार; कमायचा, खडताल, तबल्याचे “फ्युजन’ आणि हरिहरन यांचे गझलगायन… नादब्रह्माचा असा अविस्मरणीय आविष्कार शुक्रवारी पुण्यात वसंतोत्सवात रसिकांनी अनुभवला.
या उत्सवास आजपासून प्रारंभ झाला. जगप्रसिद्ध मोहनवीणावादक विश्वमोहन भट, वसंतराव देशपांडे यांचे चिरंजीव अजित देशपांडे, नातू राहुल देशपांडे यांच्या हस्ते या उत्सवाचे उद्घाटन झाले. पहिल्या सत्रात रंग भरला विश्वमोहन भट, राजस्थानी लोकसंगीत सादर करणारे गायक अन्वर खान, बरकतखान, खडतालवादक गाजी खान, कमायचावादक दरेखॉं मांगणीयार आणि तबलावादक विजय घाटे यांनी!
या कलाकारांनी शास्त्रीय संगीत आणि राजस्थानी लोकसंगीताच्या “फ्युजन’ची अनोखी पर्वणी संगीतरसिकांना दिली. मोहनवीणा-खडताल, तबला-ढोलक, कमायचा-मोहनवीणेची जुगलबंदी. त्याला प्रेक्षकांची भरभरून दाद… यातून वसंतोत्सवाचे पहिले पुष्प बहरत गेले. अन्वर खान यांनी सुरवातीला विश्वमोहन भट यांच्या साथीने राजस्थानी मांड-केसरिया बालम पेश केला. नंतर तिलककामोद रागावर आधारित केरव्यातील “झिरमिर बरसे मेघ’ आणि किरवाणीतील “हिचकी’ सादर केली. “हे लो मारे सुनोजी रामा’ या भजनाने त्यांनी पहिल्या सत्राचा समारोप केला. रात्री हरिहरन यांचे बहारदार गझलगायन झाले. गालिबची “दायम पडा हुआ’, तसेच “वो दिल नवाज है’, “पत्ता पत्ता बुता बुता’ आदी गझल त्यांनी सादर केल्या.
— स्नेहा जैन
Leave a Reply