AICTE ने ही संकल्पना प्रथम सुचविली आणि आता ती हळूहळू अंमलात येतेय. तंत्रज्ञांमधील वर्तनविषयक सुधारणा, त्यांच्या आदिम प्रेरणा आणि शिक्षणानंतरच्या भावी काळात कार्यकर्तृत्व अधिक बहरावे या हेतूने तांत्रिक विषयांबरोबरच UHV चे रोपण त्यांच्या मनात व्हावे आणि अधिक मृदू पण तितक्याच ठाम प्रवृत्तीने त्यांनी सगळं स्वीकारावं हा सदर विचारसरणीचा मूळ गाभा !
शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्या स्वाती देशपांडे यांनी हे रोपटे त्यांच्या मुंबईच्या प्रांगणात लावावे असे ठरविले. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशनंतरच्या ” परिचय सत्रांमध्ये ” (Induction Program) या विषयांवर कृतींमधून (activity based) तोंड ओळख करून द्यावी, स्वायत्त संस्था असल्याने हा Non -Examination credit course असावा अशी त्यांची संकल्पना !
२९ मार्चला फोनवर आम्ही प्राथमिक बोललो. या जत्थ्यात आणखी काही तज्ञ मंडळी असावेत असे ठरले आणि बघता बघता बीज अंकुराया लागले. संस्थेतील उत्साही प्राध्यापकांनी खतपाणी घातले आणि वाढीवर निगराणी ठेवण्याचे काम स्वतः स्वाती देशपांडे यांनी हाती घेतले. जुलै महिन्यात दोन ऑनलाईन बैठका झाल्या आणि गाठोड्यात २३ मूल्ये ( व्यक्तिगत, सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावरची) जमली. दरम्यान व्हाट्सएप ग्रुप मधून खुरपणी, तण काढणे वगैरे पडद्यामागची कामे सुरु होती.
शेवटी ३ ऑगस्टला प्रत्यक्ष भेटून दिवसभर शेवटचा हात मारला. बघता-बघता या मूल्यांची गरज वाढत गेली आणि पदविका अभ्यासक्रमाच्या तीन स्तरांपर्यंत (सेमिस्टर्स) तो विचार विस्तारला. संस्थेतील विभागप्रमुख, मेंटॉर्स सर्वांबरोबर चर्चा झाली,त्यांची मते जाणून घेतली आणि त्यानुसार काही fine tuning करून हा प्रयोग अंमलबजावणीसाठी त्यांच्या हाती आता सोपवला जाणार आहे.
नवीन सत्र लवकरच सुरु होत आहे त्यामुळे या प्रयत्नांची चाचपणी करता येईल. आवश्यकता भासल्यास (पहिल्या सत्राच्या फीडबॅक वरून) काही फेरबदल करण्याची आणि त्यानुसार बैठका घेण्याची मानसिक तयारीही ठेवली आहे. महाराष्ट्रातील तंत्रनिकेतनमध्ये पहिल्यांदा ही संकल्पना रुजविण्याचा मान मुंबईच्या तंत्रनिकेतनला जात आहे आणि त्याबद्दल प्राचार्या आणि त्यांचे सहकारी कौतुकास पात्र आहेत. आणि आम्हांला मंडळींना या संकल्पनेत सहभागी होता आले,हेही तितकेच आनंददायी आहे. बघू या, विद्यार्थ्यांची पसंतीची टाळी मिळतेय कां ?
शुभास्ते पंथानः संतू !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply