बघतां बघतां
ऊन कधी कलतं झालं
तें मला समजलंच नाहीं,
उमगलंच नाहीं.
इवलं होतो मुक्त पाखरूं
वारा पिऊन बागडणारं
क्षणात रुसणारं-फुगणारं
क्षणामधें खुदकन् हंसणारं.
होतं हंसू निर्व्याज मोकळं
होतं सकाळचं ऊन कोवळं.
हळूंच सारं पसार झालं
किलबिलतांना कळलंच नाहीं.
अचानक येऊन यौवनानं
‘टक्-टक्’ करून केलं जागं
आणि उंबरठा ओलांडून
मस्तीत राहिलं पुढे उभं.
मी स्वार होतांक्षणीं
भरधाव सुटला वारू
सारं जग जिंकायची
तुफान दौड झाली सुरूं.
मनामधें जिद्द होती
मनगटात होता जोर
यशशिखर काबीज करायचं
उद्दिष्टही होतं समोर.
एकामागुन एक भराभर
हवं तें सारं मिळवत राहिलो
वरती-वरती पुढे-पुढे
स्वत:च स्वत:ला पळवत राहिलो.
पळत राहिलो, चढत राहिलो
थांबलो नाहीं फारसा
दरम्यान चौकट बदलत गेली,
बदलत गेला आरसा.
पण आरशावरचं मखमली आवरण
कधी मुळी मी काढलंच नाहीं.
खरं म्हणजे, सुचलंच नाहीं.
खरं तर,
मला बर्याच गोष्टी करायच्या होत्या
अनेक स्वप्नं होती
खूपशा इच्छा होत्या.
करायचं होतं शिवबांसारखं
कार्य महान, भव्य
करायचं होतं स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे
देशासाठी कांहीं दिव्य;
पुसायचे होते मला
पीडितांचे आंसू
पहायचं होतं दीनांच्या डोळ्यात
फुललेलं हंसू.
द्यायची होती
नृत्य-संगीताला
दिल खोलूऽन दाद
घ्यायचा होता कथा-कवितांचा
मनमोकळा आस्वाद.
ज्ञानोबा-तुकोबांसारखं
भक्तिरसात पोहायचं होतं
पंढरीच्या वारीत
नाचत-गाऽत जायचं होतं.
बरंऽच कांहीं करायचं होतं.
विणून ठेवलं होतं कधीचं
मी नाजुकसं जाळं,
पण कवटाळुन अर्धा क्षणही
घेतां नाहीं आलं;
बंद कप्पे धुंडाळायला
मला अजिबात जमलंऽच नाहीं.
ऊन कधी कलतं झालं
तें मला समजलंच नाहीं,
उमगलंच नाहीं.
– सुभाष स. नाईक
M : 9869002126.
Leave a Reply