आज एक चविष्ट विषयाला हात घातलाय. आता याचं काही विशेष वाटत नाही म्हणा, पण माझ्या लहानपणी म्हणजे १९६५-६६ मध्ये उपहारगृहात जाणं तसं विशेषच होतं. एक तर जेवायला, म्हणजे आजच्या भाषेत lunch अथवा dinner घ्यायला सर्वसामान्य घरातलं कुणी जात नव्हतं. महिन्या दोन महिन्यातून एकदा जाणं व्हायचं, ते ही अल्पोपहारासाठी. मला मात्र आमचे तात्या अधून मधून घेऊन जायचे उपहारगृहात. दादरमध्ये माझ्या आवडीची दोन उपहारगृह होती. त्यातलं एक उडीपी होतं. दादर कोहिनूर चित्रपटगृहाकडून थोडं पुढे येऊन रस्ता ओलांडला की डाव्या हाताला होतं ते. नाव मात्र अजिबात आठवत नाहीय आज. आणि दुसरं दादरमधलं पणशीकर उपहारगृह. पहिल्या उडिपी उपहारगृहात माझी आवडती डिश असायची साधा डोसा. कुरकुरीत, क्रिस्पी डीशबाहेर येणारा डोसा आणि चविष्ट सांबार. सोबत नारळाची कडीपत्ता मोहोरीचा तडका दिलेली चटणी. डिश समोर येताच डोळे चमकायचे माझे. आणि मग मात्र, मी आणि तो … तो म्हणजे, डोसा इतकंच उरायचं. पणाशिकरकडे गेल्यावर बटाटावडा, दुधी हलवा आणि पियूष. अस्सल मराठी चवीचा बटाटावडा लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्यानी डवरलेला आणि बेसनाच्या पातळ आवरणात खरपूस तळलेला असायचा. आत शिरताच त्याच्या खमंग स्वादाने भूक खवळायची. सोबत लसणाची चटणी. समोर येताच चमचे वगैरे काढून बाजूला ठेवायचे, आणि वड्याला हातात घेऊन मस्त चव घेत रीचवायचा. वडापाव नावाची युती तोपर्यंत अस्तित्वात आलेली नव्हती. वडा रीचवला की दुधीहलवा. ही पणाशिकरांची खासियत होती. फक्त साखर, खवा, चारोळी आणि वेलचीपूड यांसह बनणारा हा पदार्थ समोर आला आणि त्याचा पहिला घास मुखात गेला की जो आनंद मिळायचा तो शब्दात काय सांगावा ? लवकर संपेल म्हणून लहान घास घेत मी त्याला गट्टम् करायचो. आजकाल काजू, बदाम, पिस्ते यांच्या थराखाली झाकोळून गेलेला दुधी हलवा म्हणून जो पदार्थ मिळतो त्याबद्दल न बोललेलंच बरं. तर दुधी हलव्यानंतर पोटात जागा असेल तर पियूष. त्या उडिपी उपहारगृहाच्याच कोपऱ्यावर एक कांदा बटाटा भजी मिळण्याचं दुकान होतं. संध्याकाळी त्या दुकानाकडे दुर्लक्ष करून पुढे जाणं खरंच अशक्य व्हायचं. तात्या कधीतरी ऑफिसमधून येताना मिक्स भज्यांचा पुडा आणायचे. खमंग वासाने रसना उद्दिपित व्हायची . कांदाभजी तर अप्रतिम असायची. आज मुलं मित्रांसोबत जाऊन त्यांना हवं ते खातात. तशी मोकळीक आमच्या लहानपणी नव्हती आणि खीसेही मोकळेच असायचे.
पुढे आम्ही ठाण्याला राहायला गेलो. माझं शालेय शिक्षण संपून कॉलेजमध्ये दाखल झालो. कॉलेज ठाण्यातच असल्याने गाडी घोडा करून कुठे जायचं नसायचं. खिशात २०-२५ रुपये म्हणजे चंगळ वाटायची (महिन्यासाठी). त्यावेळी स्टेशन जवळच छाया स्विटस् नावाचं मिठाईचं एक दुकान होतं. त्याच्या अर्ध्या भागात उपहारगृह होतं. तिथे मिसळ फारच चविष्ट मिळायची. झणझणीत नसायची फारशी पण चमचमीत मात्र असायची.
कॉलेज शिक्षण संपून मी एका विदेशी बँकेत नोकरीला लागलो. आम्ही मित्रमंडळी संध्याकाळी तलाव पाळीच्या जवळच असलेल्या ताठे उपहारगृह या लहानशा हॉटेलमध्ये भेटायचो. कटिंग चहा किंवा अधूनमधून कटिंग सोबत कांदाभजी. ती सुद्धा जेव्हढे मेंबर असतील त्याच्या निम्मी प्लेट ऑर्डर केली जायची. शाळेपासूनचा माझा एक मित्र होता. त्याच्याकडे अगदी शाळेत असतानाही खिशात पैसे असायचे. आणि बहुधा आमच्या दोघांचं बिल तोच भरायचा. आमचं दोघांचं एक ठरलेलं उपहारगृह होतं, वसंत नावाचं. तिथे टोमॅटोवडा नावाची डिश मिळायची. आम्हा दोघांचीही ती फेवरेट डिश होती. आम्ही मित्रमंडळी रात्रीच्या चित्रपट शो पहायला गेलो की चित्रपट संपल्यावर सरळ घरी न येता, हायवेला लागून एक भुर्जीपावची गाडी लागायची थेट तिथे धडकायचो. बहुतेकांकडे स्कूटर होत्या. त्या गाडीवर एक तरुण मुलगा कामाला होता. तो भुर्जी अशी मस्त बनवायचा की बोलायची सोय नाही. अल्युमिनियमच्या लहानशा थाळीत भुर्जी आणि सोबत तव्यावर गरम केलेले दोन पाव. पहिला घास तोंडात जाताच जीभ खवळायची. अहाहा ! स्वच्छता, मिनरल पाणी हे सगळे सोपस्कार गुंडाळून ठेवायचे.
ठाण्याला तलावपाळीच्या सभोवती रात्र झाली की पावभाजीच्या गाड्या लागायच्या. त्यावेळी हा पदार्थ हॉटेलमध्ये उपलब्ध झालेला नव्हता. आमचा एक ठरलेला पावभाजीवाला होता. त्यावेळी भाजी चहाच्या बशीमध्ये दिली जायची, आणि सोबत छोट्या ताटलीत मस्क्यात भाजलेले दोन पाव आणि टोमॅटो कांदा कचुंबर. पण तेव्हा पाव मस्क्यामध्ये लिबलिबीत होईपर्यंत भाजले जात नव्हते. आज मस्का चीज याच्या अती वापरामुळे पदार्थांची मूळ चवच मारली जाते.
ठाण्यात तांबे आहार भवन नावाचं उपहारगृह होतं. तिथे साबुदाणा वडा, थालीपीठ, बटाटा पुरी, उपासाची मिसळ, असे पदार्थ मिळायचे. ऑफिसमधून परतताना कधीतरी आम्ही दोघं ठाणेकर मित्र एकेक डिश रिचवून मगच घरची वाट धरायचो.
ठाण्यातली मामलेदार मिसळ ही तर सुप्रसिद्धच. परंतु ती फारच तिखट असते हे कळल्यामुळे मी तिच्याकडे वाळण्याचं धारिष्ट्य केलं नव्हतं. एकदा मात्र माझा मित्र मला ओढून घेऊनच गेला. मी जरा टेन्शनमध्येच होतो. त्याने मिडीयम तिखट मिसळ मागवली. जळजळीत तिखट खाताना अनेक लोकं दिसत होती. काही तर त्या मिसळसोबत मिरच्याही खात होते. माझं टेन्शन वाढत होतं, कारण त्या मिसळीचा रंग रक्तासारखा लालभडक होता. ते पाहून आमची कमी तिखट मिसळ कशी असेल? आणि ती आपल्याला झेपेल का ? या विचारात मी होतो. मित्राने मात्र अनुभवी गिऱ्हाईकाप्रमाणे ऑर्डर दिली,
“दोन मिडीयम मिसळ, बिगरबटाटा.”
हा काय प्रकार ते मला कळेना. मग कळलं की, मिसळीत अर्धा उकडलेला बटाटा घातलेला असतो. त्याच्या जागा अडवण्यामुळे मिसळ कमी होते. म्हणून बिगरबटाटा असं सांगायचं. पण समोर आलेली मिसळ मात्र चटकदार होती.
माझ्या आईला हॉटेलमध्ये जाऊन जेवण्याची विशेष आवड नव्हती. कधीही हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा बेत ठरला की ती विशेष उत्सुक नसायची. याउलट आमचे तात्या अगदी आवडीने तयार असायचे. त्यांना नवनवीन डिश टेस्ट करायला मनापासून आवडायचं.
पूर्वी ठाणे स्थानकाच्या पश्चिमेला कळव्याच्या दिशेने बाहेर पडल्यावर स्थानकाच्या अगदी समोर गोखले उपहारगृह होतं. अगदी प्रशस्त जागेत ते उभं होतं. संध्याकाळी गरमागरम बटाटा भजी इतकी मस्त मिळायची तिथे, आणि वेलची जायफळ घातलेली कॉफी. काय वर्णावा तो आनंद.
पुढे जसजंसं पंजाबी पदार्थांचं आक्रमण वाढलं तसतंसं उडिपी उपहारगृहात सुद्धा पंजाबी पदार्थ मिळू लागले. ठाण्याला एक नॅशनल पंजाब नावाचं हॉटेल होतं. पंजाबी डिशमध्ये सुरवातीला माझी आवडती डिश होती आलूमटर आणि पदर असलेला पराठा, किंवा बटर चिकन मसाला. मासे मी विशेष खातच नसे. हळुहळु महाराष्ट्रीयन मराठी पदार्थ मिळणारी उपहारगृह लयाला जाऊ लागली, आणि त्यांची जागा उडिपी उपहारगृह आणि इडली, मेदुवडा, डोसा, उतप्पा शिवाय आपला मराठी बटाटावडा, मिसळ, साबुदाणावडा जे अजिबात आपल्या चवीचे नसायचे ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने मिळू लागले . दुधाची तहान ताकावर भागवत आपण ते खाऊ लागलो.
१९८९ मध्ये मी पश्चिम उपनगरातील दहिसर इथे रहायला आलो. एव्हाना हॉटेल व्यवसाय उडिपी, पंजाबी व्यावसायिकांनी तर भेळपुरी शेवपुरी सारख्या पदार्थांचा व्यवसाय उत्तर प्रदेशीयांनी व्यापून टाकला होता. मराठी पदार्थांची उपहारगृह बिचारी मान टाकत अधे मधे दिसत होती. त्यातूनही काही मराठी व्यावसायिक जिद्दीने या व्यवसायात उभे होते. दहिसरला माझ्या मुलांच्या शाळेच्या उपहारगृहात बटाटावडा अप्रतिम चवीचा मिळायचा आणि आजही मिळतो. शाळेकडून जाताना त्याचा गंध आला की पुढे पाऊल उचलत नसे. पुढे कोकणच्या पदार्थांची म्हणजे मासे आणि माशांचे पदार्थ मिळणारी उपहारगृह उदयाला आली. तशी पूर्वी गिरगावात गोमंतक नावाने उपहारगृह सामिष अन्न खवैय्याना उपलब्ध करून देत होती. पण नंतर दादरला सचिन, सिंधुदुर्ग, पार्ल्यात गजाली, बांद्र्याला सायबा, हायवे गोमांतक, गोरेगावचं सत्कार, बोरिवलीचं पंगत, कोकणप्रांत अशा उपहारगृहातून खवैय्याना मासे आणि तत्सम पदार्थांची चव मिळू लागली.
आमच्या घरापासून ऑटोने पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंगत नावाचं सामिष पदार्थ मिळणारं उपहारगृहआहे. ठराविक वारी खवैयांची प्रचंड गर्दी असते तिथे. आम्हीही जातो अधूनमधून. मी काय, फक्त नावाला अशा उपहारगृहात जातो . कारण मी काही सामिष आहारप्रिय नाही आणि आता तर अजिबातच खात नाही. टेबल मिळाल्यावर इतर मांसाहारी पदर्थांसोबत आम्ही एक व्हेज थाळी ऑर्डर करतो. वेटरला कळतं की या उपहारगृहात येऊन शाकाहारी थाळी खाणारा थोर पुरुष कोण आहे ते. त्यामुळे तो ही माझ्याकडे कशाशाच नजरेने पहात जातो. आलेले सगळे खवैये मनसोक्त मासे खात असतात. माझी बायको, लेक सुद्धा रंगून मत्स्यावताराचा आनंद घेत असतात. बांगडा फ्राय, सुरमईची आमटी, तिसऱ्या अशा सामुद्री अन्नाचा फडशा पाडत असतात. मी समोर आलेल्या शाकाहारी थाळीतील काळया वाटण्याची मसाल्याची आमटी, एक भाजी, डाळ, भातुकलीच्या आकाराची श्रीखंड वाटी, पोळ्या किंवा वडे आणि क्वचित अळूवडी असा मेन्यू खालमानेने जेवत असतो. पण ठीक आहे, हिला एक दिवस आराम मिळतो स्वयंपाकापासून इतकंच. बोरिवली पश्चिमेला गिरगाव कट्टा नावाचं मराठी पदार्थ मिळणारं एक उपहारगृह आहे. तिथे नाचणीची किंवा तांदळाची भाकरी, खमंग लसणाचा स्वाद येणारं पिठलं , झुणका, सोबत मिरचीचा ठेचा, दही असा 😋मस्त मेन्यू मिळतो. तिकडे गेल्यावर पंगत मध्ये होणारा माझा अपमान मी यथेच्छ फेडून घेतो , आणि वर पियुषच्या भैरवीसह जेवण संपवतो.
आपापल्या चवीने लक्षात राहिलेली ही उपहारगृह आणि टपऱ्या. कसं विसरायचं त्यांना आणि तिथल्या पदार्थांना तुम्हीच सांगा ???
प्रासादिक म्हणे,
प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply