आज “माझा “चा दिवाळी अंक वाचत होतो. आपापले गांव /माती सोडून मुंबईत स्थायिक झालेले चित्र-नाट्य कलावंत ऋषिकेश जोशी/ वैभव मांगले /संकर्षण कऱ्हाडे/वैभव तत्ववादी यांनी स्वतःमधल्या “माती” वर मनोज्ञ भाष्य केले आहे. ते मुळातूनच वाचायला हवे. सहज स्वतःमध्ये डोकावून बघितले- अरे, माझ्यातही खूप “भुसावळ “अजूनही आहे आणि निमीत्तमात्रे ते गांव माझ्यातून मिळेल त्या मार्गाने बाहेर पडतेय.
भुसावळ नंतर नऊ गावांच्या भ्रमंतीनंतर सध्याचे पुनश्च पुणे ! बापरे किती गावांच्या मातीची सरमिसळ माझ्यात झालीय. मात्र अजूनही मुळातील माती स्वत्व विसरायला तयार नाही. तोच टोकाचा, उताराला लागलेला चिडका स्वभाव, प्रत्येक गोष्टीला /घटनेला खोलवर भिडणे, लगेच व्यक्त होणे, अनुल्लेख सहन न होणे इत्यादी इत्यादी !
मातीचे रंग, रूप,गुणधर्म, सच्छिद्रता गावागणिक बदलत असतात. सोबतीला त्या गांवात एखादा जलाशय असेल तर विचारु नका. दमट /आल्हाददायक/ समशीतोष्ण असे पूरक वातावरण तेथे तयार असते. माती शेवटी आईच असते- सतत जवळ आणि वाटण्या झाल्यातरी भावंडांची सामाईक ! आकाशबापाचं तसं नसतं. दूरस्थ आकाश स्थितप्रज्ञ पणे आपलं आणि मातीचं नातं न्याहाळत असतं.
माती काळीभोर,राखाडी, लाल, बागायती,जिरायती, मुरमाड कितीही पर्यायांमध्ये उपलब्ध असते.
मुंबईच काय, महाराष्ट्रातील सर्वच महानगरे आता उपऱ्यांची वसतिस्थाने झालेली आहेत. मला मात्र अजूनही कोणी “पुणेरी किंवा पुणेकर” असं संबोधलं तर आवडत नाही. ताडकन माझा “खान्देशी बाणा ” उफाळून येतो. अनेक वर्षांपूर्वी वर्गमित्र शिरीष महाबळच्या घराच्या वास्तुशांतीचे निमंत्रण आले होते तेथे लक्ष वेधून घेणारा एक मजकूर होता-
वास्तुशांतीचे स्थान- ” राहते घर, तापी नदीच्या काठी !” छान आहे की नाही,असं गावाशी जोडलेलं राहणं आणि ते मिरवणं ! तेव्हापासून अगदी अलीकडच्या भुसावळ फेरीपर्यंत मी माझ्या आप्तस्वकीयांकडे माझी एक इच्छा कितव्यांदा तरी व्यक्त केली – ” भुसावळला माझ्यासाठी एखादा एक बीएचके फ्लॅट तापीकाठी शोध.”
म्हणजे ” माती असशी,मातीस मिळशी ” जेव्हा व्हायचे असेल तेव्हा ते आपल्या गावाच्या कुशीत व्हावे.
आमच्या स्थापत्य अभियांत्रिकी विद्याशाखेत माती तपासणीसाठी सॉईल टेस्टींग लॅब असते. मला वाटतं, प्रत्येकाने किमान एकदा तरी आपल्या मातीचा पोत तेथे तपासून घ्यावा.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply