गृह सजावटीसाठी उपयुक्तता आणि सौंदर्य यांची सांगड घालून संरचना करणं आवश्यक असतं. आपल्या घराचं अंतरंग सजवण्यासाठी सर्व प्रथम आपल्या अंतर्मनातील सौदर्याचा अभ्यासपूर्वक विचार केलेला असणं जरुरीचं असतं. गृहसजावटीच्या कामात निवडल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूंचा उपयुक्तता आणि सौंदर्य या दोन्हीही दृष्टिकोनातून विचार केला जाण्याची आवश्यकता असते. एकाच घरात, एकाच कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आवडी निवडी निरनिराळ्या असतात. स्वाभाविकच त्यांच्या गृहसजावटीच्या संकल्पना देखील भिन्न असतात. अशावेळी अंतर्गत रचनाकारांच्या कुंचल्यातून तयार होणारी कलाकृती आपल्या घराला घरपण प्राप्त करून देत असते आणि तेही प्रत्येकाच्या अपेक्षांची आणि आवडी-निवडींची दखल घेऊन.
प्रत्येक व्यक्ती कमी अधिक प्रमाणात सौदर्याची उपभोक्ता असते. सौंदर्याची अनुभूती आणि अभिव्यक्ती ही गृह सजावटीसाठी वापरलेल्या वैविध्यपूर्ण वस्तूंवरून ठरत असते. गृहसजावटीच्या कामात अनेकविध लहान मोठ्या वस्तूंची निवड करावी लागत असते. ह्या वस्तूंचा रंग, आकार, स्वरूप, आकारमान, उपयुक्तता, गरज, सौदर्ययुक्त संरचना, सजावट अशा अनेक बाबींचा संबंध वस्तू निवडण्यात परस्परांशी जोडला जावा लागतो. अंतर्गत सजावट करण्याअगोदर घराची अंतर्गत संरचना करणं अधिक महत्वाचं असतं. घराची अंतर्गत सजावट ही एक कला आहे तर संरचना हे शास्त्र आहे. हे शास्त्र समजून घेणं अधिक आवश्यक असतं. गृहसजावटीच्या कामात आपल्याला अनुभवायला येणारं सौदर्य हे केवळ केलेल्या सजावटीमुळे नसून ते संरचनेमुळे असतं आणि घराचा घरोबा घराच्या सौदर्यात असतो हे आपण जाणून घ्यायला हवं.
गृहसजावटीच्या कामात आपल्या आवडीनुसार आपण प्रत्येक वस्तूची निवड करत असतो. ही निवड अर्थातच काहीवेळा एखाद्या वस्तूची गरज म्हणून, नाहीतर ती केवळ मनात भरली म्हणून केली जाते. खरं तर गरजेपेक्षा आपल्या मनानं तिला पसंती दिली म्हणूनच ती वस्तू घेण्याकडे आपला कल असतो. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी घराची जरूरी असते. त्यामुळेच आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण या घराचं घरपण मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी अंतर्गत संरचना आणि सजावट करण्याची जरुरी असते. त्या घराला आपलं म्हणण्यासाठी ते सजवावं लागतं. त्याचं घरपण मिळवण्यासाठी ते खुलवावं लागतं.
विद्यावाचस्पती विद्यानंद
ईमेल : vidyavachaspati.vidyanand@gmail.com
Leave a Reply