आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक मनोज महाजन यांचा लेख
माणसाच्या भाग्यात जसे चढ-उतार असतात ,भरती-ओहोटी असते तसे गाव आणि शहराचेही असावे.नालासोपारा या गावाच्या बाबतीत हे दिसून येते.मुंबई महानगर प्रदेशाच्या सीमेवर पश्चिम रेल्वेच हे एक लोकल स्टेशन. एकेकाळी म्हणजे यादवांच्या वगैरे काळात हे महत्त्वाचे व्यापारी बंदर. आताही याचा ‘यादव कुळा’शी संबंध आहेच,पण हे यादव बिहारचे. मराठी मुलखातल एके काळच हे बंदर आता हिंदी भाषेतलं ‘बंदर’ बनून राहिलेल आहे. एका लोकप्रिय हिंदी कॉमेडी शोमध्येही याचा वारंवार उल्लेख होतो. झोपडपट्टी,चाळवजा घरांनी आणि आताशा काही इमारतींनी गजबजलेलं हे पूर्वी गाव असलेले शहर. गमतीचा भाग म्हणजे नालासोपारा स्टेशन वरून तुम्ही रिक्षा करून समुद्राच्या दिशेने काही किलोमीटर गेलात, की नारळ-पोफळीच्या बागा आणि टुमदार घर दिसू लागतात. तिकडे कळंब वगैरेसारखी छोटी गाव आपापले बीच संभाळून असतात.ही गावं इतकी आकर्षक कि,येऊन राहावं असं वाटावं. ही छोटी गावं तुम्ही जुन्या हिन्दी सिनेमात पूर्वी पाहिलेलीही असतील. ही गावं ते नालासोपारा स्टेशन म्हणजे एखाद्या सुखद स्वप्नातून दु:खद स्वप्नाकडे यावं तसं.
आता या घडीला आपल्याला या गावांकडे जाता येणार नाही कारण आपला कथानायक राहतो तो नालासोपाऱ्यात एका चाळवजा इमारती असलेल्या वस्तीत. त्याच्या मालकीच्या चांगल्या दोन ‘रूम’ आहेत. पुढेमागे डेवलपमेंट ला जाऊन टू बीएचके चे स्वप्न धरुन असलेला आपला कथानायक आणि त्याची त्याच स्वप्नाच्या पदराला धरून आलेली किंवा आणलेली त्याची बायको, इथेच राहतात. लोक आपल्या कथानायकाला पिझ्झावालाच म्हणतात आणि ओळखतात, कारण तो पिझ्झाच्या मल्टिनॅशनल दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला आहे. पूर्वी हा गॅस एजन्सीमध्ये गॅसच्या टाक्या पुरवण्याचं काम करायचा, तेव्हा त्याला गॅसवाला म्हणायचे. आपणही आता त्याला पिझ्झेवाला म्हणायला काही हरकत नाही.
आपला हा कथानायक -पिझ्झेवाला ‘मिसब्रँडेड’ म्हणजे ब्रॅन्डेड कपड्याची नक्कल केलेले स्वस्त कपडे, वापरतोआणि त्याच्या मनाने ग्रहण केलेल्या सर्व व्हाईटकॉलर आदब-आदबींचे यथाशक्ती पालन करतो. एवढ्यावरून आपल्या कथा नायकाची उर्फ पिझ्झेवाल्याची वृत्ती-प्रवृत्ती, प्रकृती लक्षात यावी. म्हणजे अधिक वर्णनाची गरज नाही. सकाळी सात चाळीसची दादर गाडी पकडून दहा किंवा त्याच्या आधीच बांद्र्याला आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्याचा शिरस्ता सहसा कधी पिझ्झेवाल्याकडून चुकला नाही.
****
आज पिझ्झेवाल्याचा बहुधा पणवतीचा दिवस असावा. सकाळपासून काही ना काही आडवं येऊन निघायला उशीर होत होता. त्यामुळे त्याची सारखी चिडचिड होत होती.पण सांत्वनाला एक विचार होता. पिझ्झेवाल्याच्या ब्रांचमध्ये नुकतेच दोन सतरा-अठरा वर्षाचे मुलं भरती झाले होते.पिझ्झेल्याच पद ‘ डिलिव्हरी बॉय’ असच असलं तरी सिनिऑरिटीच्या नात्याने, ही दोन पोरे त्याच्या हाताखाली आली होती. सकाळीच किचनमध्ये मटेरियल लावायचं काम हि पोरं करू शकत होती. हि पोरं आहेत हा विचार त्याची चिडचिड आवाक्यात आणायला पुरेसा होता.
पिझ्झेवाल्याला पोचायला उशीर झालातरी अजून ऑर्डरी सुरू झाल्या नव्हत्या. दोन्ही पोरं किचन मधलं मटेरियल लावून ऑर्डरची वाट पहात बसले होते.पिझ्झेवाल्यानआल्या-आल्या त्यांची औपचारिक चौकशी केली. अजून मॅनेजर आला नव्हता. तेवढ्यात एक कॉल आलाच. पिझ्झेवाल्याने एका पोराला पिटाळलं. कुणाला तरी हुकूम सोडण्याच भाग्य नुकतच त्याच्या वाटेला आलं होतं. तो किंचित सुखावला होता. आता एक पोरगा इथं आहे तोपर्यंत आपण समोरच्या वडापावच्या गाड्यावर शिरस्त्याप्रमाणे नाश्ता करावा असा विचार तो करतच होता, तोच मॅनेजर आला. मॅनेजर आल्याआल्या आपण बाहेर निघणं बरं नाही म्हणून त्यान नाश्त्याचा विचार पुढे ढकलला.
काही वेळ असाच गेल्यानंतर दुसरी ऑर्डर आली आणि दुसरा पोरगा गाडीला किक मारून पळाला. आता ऑर्डर आली की आपणच पळायचं हे गृहीत धरून पिझ्झेवाला व्हाट्सअप तपासत बसला. काही वेळाने मॅनेजरच बोलावण आलं पिझ्झे वाला मॅनेजरच्या टेबलला गेला. मॅनेजरन त्याच्याकडे पाहिल्या न पाहिल्यासारखं केलं. आधीच मोजून रबर लावून ठेवलेली नोटांची चिमूटभर जाडीची गड्डी त्यानं पिझ्झेवाल्या पुढे टाकली. एक छापील कागद पुढे सरकावत मॅनेजर म्हणाला,”इथे सही कर!”
पिझ्झेवाला गांगरला. गोंधळून त्यांना विचारलं,” हे काये?”
” तुझा हिशोब!”, .. मॅनेजर कोरडेपणा दाखवत म्हणाला.
“ऑऽ?”.. पीझ्झेवाला भयंकर आश्चर्याने उद्गारला.
तोच कोरडेपणा टिकवत मॅनेजर पुढे म्हणाला,”.. आज पासून तू कामावर नाहीस!.. वरून ऑर्डर आहे!”
“.. आओ पन मी चुकलो कुठ ?”..कसाबसा आवंढा गिळत पिझ्झेवाला म्हणाला.
काही क्षण मॅनेजर गप्प राहिला. त्यालाही काही सुचत नसावे. काही वेळ इतर कामे करत तो सावकाश म्हणाला,…
..” हे बघ तुझं काही चुकलं नाही. वीस मिनिटात पोहोचवायची ऑर्डर तू दहा मिनिटातही पोचवलेली आहे. वाकड्यातिकड्या कटा मारून प्रसंगी सिग्नल तोडून का होईना पण तू ऑर्डर कधीच चुकू द्यायचा नाहीस, हे मलाही माहित आहे!.. पण आता तूच म्हणतो ना दोन पोरं आणि बायकोचा भार आहे तुझ्यावर?.. आता पूर्वीसारखं कटामारून जाणे जमणार नाही म्हणून..? ”
” अवो ते मी सहज म्हणालो, अजूनही मी दहा मिनिटात…”
पिझ्झेवाल्यान युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला पण त्याला थांबवीत मॅनेजर म्हणाला,
“.. अरे बाबा मी काय तुझा दुश्मन आहे का?.. कंपनीच्या बिझनेस पोलिसिज असतात राजाऽऽ!.. तुला नाही कळायचं!.. जाऊदे स्पष्टच सांगतो – हे बघ तुला एकट्याला जेवढा पगार दिला जातो त्याच्यात हजार दोन हजार घालून कंपनीला दोन तरुण पोरं मिळाले , कंपनी तुला कशाला ठेवील?..’ गरज सरो’ चा व्यवहार आहे , बाबा!.. आय ॲम् सॉरी! ”
एखाद्या व्हाॅईटकॉलरवाल्यानी शेवटी ‘आय एम सॉरी’असं म्हटलं की संवाद संपला असं समजायचं असतं, एवढं शहाणपण पिझ्झेवाल्याला एव्हाना आलं होतं. सही करून पिझ्झेवाल्याने पैसे न मोजताच हातात घेतले आणि तो जड पावलांनी निघाला.
****
वडापाववाल्याच्या गाडीच्या काउंटरवर दोन्ही कोपरे टेकवून समोरच्या आरशात पहात पिझ्झेवाला आपले पिंजारलेले केस अधिकच पिंजारत होता. वडापाव समोर आला तरी खायची इच्छा होईना. सवयीने त्यांना एक घास घेतला. समोरच्या आरशात हलणार्या स्वतःच्या जबड्याकडे पहात असताना त्याच्या लक्षात आलं की बारीक दाढीच्या खुरटात काही चंदेरी खुरटंही आलेली आहेत. घास चघगळत त्याच्या मनात विचार सुरु झाले,
“.. आपलं चुकलच जरा !.. आपण चांगले दहावी पास. कम्प्युटरवर दोन हात मारायला शिकलो असतो तर आज बिलींगला बसलो असतो!.. ते नाही तर आपण किमान किचन मधलं काम तरी शिकून घ्यायला पाहिजे होतं. गॅस एजन्सी मधून इथ आलो तेव्हा आपल्याला सायकल सुटल्याचाच जास्त आनंद झाला होता. कटा मारत आडवी-तिडवी गाडी चालवण्यात फुशारकी वाटत होती. पुढे आपल लग्न होईल ,पोरं बाळं होतील आणि कटा मारत गाडी चालवायच आपल्याला भ्या वाटल ,असं कुणाला वाटलं होतं?.. आपल्या हाताखाली दोन पोरं आली ह्या भूषणातच आपण होतो. या दोन पोरांनीच आपली मारली !…..त्यांचा बी काय दोष म्हना!..”
वडापाववाल्यांन काऊंटरवर हात आपटून आवाज केला तसा तो भानावर आला. कसाबसा वडापाव संपवून तो पूर्वीच्या गॅस एजन्सी कडे निघाला. तो गॅस एजन्सीकडे निघाला होता खरा पण एक शंका त्याच्या मनात सारखी घिरट्या घालत होती,..
“.. आता आपल्याला पयल्यासारख्या गॅसच्या टाक्या उचेलता येतील का?”
****
………..
………..
……….
अरे?.. थांबा,थांबा!… तुम्हाला मी आत्ता पिझ्झेवाल्याची गोष्ट सांगितली का?..
..च्!.. मला आयटीवाल्याची गोष्ट सांगायची होती!.. बरं आता असू देत!
– मनोज महाजन
Leave a Reply