नवीन लेखन...

उर्मिला एक व्यक्तिचित्र

दहिसर पश्चिमेला आमचा मासळीबाजार. दहिसर पूर्वेकडून सबवे मधल्या चिंचोळ्या उंचवट्यावरून तिरपं चालत पश्चिमेला गेलं की लगेच मासळीबाजार लागतो. त्याला समांतर पंचवीस तीस पावलं चालल्यावर, दोन तीन फुलंवाल्या फुलांचे वाटे घेऊन बसतात. प्रत्येकीच्या डाव्या उजव्या बाजुला, घाऊक बाजारातून आणलेल्या फुलांची बोचकी असतात, आणि त्यातल्या फुलांचे वाटे समोर मांडलेले असतात. केशरी गोंडा, पिवळा गोंडा, लालसर लहान गोंडा, जास्वंद, पिवळी पांढरी नाव माहीत नसलेली फुलं, घमघमणारा मोगरा, गुलाबी, लालचुटुक कोरांटीची इवली फुलं, लालभडक बिनवासाचे गुलाब, दुर्वा, बेल, तुळस आणि यांच्यासोबत बाजूला तीळ तेलाच्या बाटल्या, चिंचेचे गोळेही मांडलेले असतात.

या फुलंवाल्या स्त्रियांमध्ये एक साठी ओलांडलेली उर्मिला फुलंवाली आपल्या चंबुगबाळयासहित बसलेली असते. तिच्या चेहऱ्यावर जगांचं खरं रूप अगदी जवळून पाहिल्याचा आणि गरिबीचे अनंत चटके सोसल्याचा भाव असतो. तिच्या समोरआल्यावर मान हलवत किंचित हसून ओळख दाखवण्याची तिची लकब आहे. इतर दोघी मात्र मराठी भाषिक नसलेल्या. मी नाही जात त्यांच्याकडे फुलं घ्यायला…..म्हणजे त्या मराठी नाहीत, म्हणून जात नाही, असा गैरसमज नको व्हायला म्हणून सांगतो, त्यांची रहाणी अत्यंत अस्वच्छ असते, तोंडात सतत घाणेरडी भाषा त्यामुळे नाही जावसं वाटत. एखाद दिवशी उर्मिला तिच्या जागेवर दिसली नाही तर मी तसाच परततो आपला.

यातल्या दोघी फुलंवाल्या एकमेकींना खेटूनच बसलेल्या असतात, आणि तिसरी जरा अंतरावर बसते. यामध्ये उर्मिलाकडे गर्दी अंमळ जास्तच असते. तोंडाने जास्त न बोलता ती खुणेनेच बोलत असते. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला कोणती फुलं लागतात, कोणाला बेल तुळस दुर्वा अधिक हव्या असतात, कोणाला नुसती फुलं हवी असतात हे सगळं तिला पाठ असतं. आमची पिशवी भरताना मूठभर फुलं जास्तच पडतात. माझ्या पत्नीवर तिचं प्रेम आहे. ती गेली, की अगदी भरपूर फुलं भरून देते तिला. मधल्या कोरोना काळात उर्मिलाचे फार हाल झाले. अर्थात रोजगारावर, किंवा रस्त्यावर छोट्या मोठ्या गोष्टी विकून पोट भरणाऱ्या अनेकांवर फार वाईट दिवस आले. कोरोनापूर्वी तिच्या आयुष्यात आणखी एक अत्यंत वाईट गोष्ट घडली. उर्मिला गावाला गेली असताना, तिचं घर फोडून चोरांनी तिच्या घरातलं सगळं किडुकमिडूक लांबवलं. पोटाला चिमटा काढून कमावलेलं एका क्षणात चोरीला गेलं. वर्षानुवर्ष दिवसभर मेहनत करून, थोडसं गाठीला बांधलेलं असं का हिरावलं जावं ? अशावेळी देवावरची श्रद्धा ढळू लागते. काळा पैसा जमवून, अनेकांना ठकवून धनदांडगे देशाबाहेर पसार होतात,.आणि सुखात रहातात. त्यांचं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही. उर्मिलाने डोळे कोरडे करून, दुःख गिळून पोलिसव्यवस्थेची, ओळखीपाळखीच्या समाजातल्या प्रतिष्ठित लोकांची, लोकप्रतिनिधींची दारं आशेने ठोठावली. कोण दाद घेणार? तिच्या तक्रारींकडे पाहायला वेळ आणि आस्था कुणालाच नव्हती. त्यातून दाद मागणारा तळागाळातला, त्याच्या तक्रारीला किंमत कसली. अनेकांच्या हातापाया पडली. आश्वासनं आणि तिलाच विचारले जाणारे उलटसुलट प्रश्न याव्यतिरिक्त हाती काहीही पडलं नाही. अखेर थकून, निराश होऊन तिच्या जागेवर दिसू लागली. त्यातच पुढे महामारी उद्भवली. हा कोरोना काळ तिने कसा काढला असेल हे परमेश्वरच जाणे.

दोन वर्षांचा कोरोना काळ जरा ओसरला, कायदे जरासे शिथिल झाले तशी उर्मिला आपल्या नित्याच्या जागी बसू लागली. कोरोना काळात आम्हीही फुलं आणत नव्हतो. आजही उर्मिला त्याच जोमाने आणि तशाच लकबीसहित तिच्या जागी फुलं घेऊन बसलेली असते. तिच्या बाजूला त्या दोघीही दिसतात. थोडी थकलेली उर्मिला तिच्याकडे गेल्यावर, आधीसारखच बारीकसं हसत आणि मान हलवत पिशवी भरून फुलं हातात ठेवते.

प्रासादिक म्हणे

–प्रसाद कुळकर्णी 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..