माझा जायचा यायचा रस्ता पूर्व पश्चिम असा आहे. डोंगरातून जाणारा रस्ता असल्यामुळे, काही ठिकाणी रस्ता छोट्या छोट्या खिंडींमधून जातो. त्यामुळे खिंडीची एक भिंत उत्तराभिमुख असते तर दुसरी दक्षिणाभिमुख. हे ठिकाण बरेच उत्तरेला असल्यामुळे हिवाळ्यामधे सूर्य नेहमी दक्षिण दिशेलाच दिसत असतो. त्यामुळे बरेचदा सूर्यप्रकाश पडला, की दक्षिणाभिमुख भिंतीवरचे बर्फ वितळून जाते, तर उत्तराभिमुख भिंतीवर सूर्यकिरणे न पडल्यामुळे, तिथले बर्फ तसेच साचलेले रहाते. त्यामुळे रस्त्यावरून जाताना, खिंडीची एक बाजू बर्फाच्छादित तर दुसरी बाजू उन्हात झळकणार्या काळ्या कातळांची, असं मोठं मजेशीर दृश्य दिसतं.
बर्फाची रूपं देखील वेगवेगळी. सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारं डोंगरमाथ्यावरचं सोनेरी बर्फ बघितलं, की अमेरिकेत असल्याचा विसर पडतो. हिमालयाशी तुलना करणाचा प्रश्नच नाही, पण कधी काळी भल्या पहाटे उठून बघितलेला हिमालयातला सूर्योदय आठवत रहातो. कैलास पर्वतावर खरोखरच शंकराचं जागृत स्थान असेल की नाही कोणास ठाऊक, पण सकाळच्या किरणांत चमकणारी बर्फाच्छादित शिखरं बघितली की, दैवी सौंदर्याचा साक्षात्कार मात्र होतो – मग ती हिमालयातील असोत की अमेरिकेतली! सकाळच्या कोवळ्या उन्हातली बर्फावरची नारिंगी छटा वेगळी आणि संध्याकाळच्या सरत्या उन्हातली बर्फावरची गुलाबी, किरमिजी छटा वेगळी! लख्ख उजेडातला, उन्हात चमकणारा आणि डोळे दिपवून टाकणारा दिवसाचा बर्फ वेगळा आणि रात्री, चंद्राच्या मंद प्रकाशात, रुपेरी वाळूच्या अथांग किनार्यावर उभं असल्याचा भास करणारा बर्फ निराळा !
हिवाळ्यात ओढे, डबकी, नद्यांची रूपं बदलतात. ओढ्या, नद्यांचं पाणी आपला खळाळता प्रवाह विसरून संथ वहायला लागतं. थंडीच्या वाढत्या कडाक्याबरोबर साचलेल्या तलावांत, रस्त्याकडेच्या डबक्यांतील पाणी थिजून जातं. वहात्या पाण्यात मधे मधे थिजलेल्या पाण्याची बेटं तयार व्हायला लागतात. सस्कुहाना नदीच्या पात्रातून छोटे छोटे हिमनग वहात जाताना दिसतात. तापमान फारच खाली गेलं की नद्या, ओढ्यांची पात्र पूर्णपणे बर्फाच्छादित होऊन जातात. पुढे मग जेंव्हा पाणी पुन्हा वहातं व्हायला लागतं, तेंव्हा पात्राच्या मधला पाण्याचा पट्टा प्रथम वहाता होतो. पाण्यावर साठलेलं बर्फ वहात्या पाण्याच्या प्रवाहामुळे, नदीच्या काठांकडे लोटलं जातं. नदीचं पात्र दोहोकडून अशा बर्फाच्या पांढर्या शुभ्र किनारीवाल्या साडी सारखं दिसायला लागतं.
माझ्या जायच्या यायच्या रस्त्यावर टेकड्यांच्या उतारावर आणि नदीच्या काठाकाठाने अस एक मोठं गॉल्फ कोर्स आहे. हिवाळ्यात ते पूर्णपणे बंद असतं. त्याच्या प्रशस्त उतारावर साचून राहिलेला शुभ्र बर्फ, महिनेन महिने तसाच पडून राहिलेला असतो. ना त्यावर कुणाच्या पाऊलखुणा उमटतात ना कुणी तो इतस्तत: सरकवायचा प्रयत्न करतं. त्या गॉल्फ कोर्सवर अधे मधे लावलेल्या सूचिपर्णी वृक्षांच्या लांबच लांब काळ्या सावल्या तेवढ्या त्या अनाघ्रात बर्फाला साथ देत उभ्या असतात.
रानावनाला पडलेला बर्फाचा वेढा ३-४ महिने तरी कायम असतो. झाडांच्या मोडून पडलेल्या फांद्या, सुकलेल्या काटक्या, वाळलेली पानं, पिवळं पडलेलं गवत, या सर्वांवर बर्फाने आपली रुपेरी मोहर बसवलेली असते. झाडांच्या फांद्यांवरचं बर्फ अर्धवट वितळून, फांद्यांचा वरचा भाग पांढरा तर खालचा भाग काळसर झालेला असतो. शेतांत, मळ्यांत, सुकलेल्या गवताची आणि मक्याच्या कापलेल्या खुंटांची टोकं बर्फाच्या आवरणाखालून डोकावत असतात. त्यात कधी कधी टर्कीचा थवा किडे वेचताना दिसतो.
मार्चच्या सुरवातीपासूनच येणार्या बदलाची चाहूल लागायला लागते. नद्या ओढ्यांचं पाणी पूर्ववत खळाळतं व्हायला लागतं. अचानक त्या पाण्यात बदकं अवतरतात. हिवाळ्यात कुठे दडून बसलेली असतात कुणास ठाऊक! पण रस्त्याकाठच्या ओढ्यांमधे बदकिणी आणि त्यांची पिल्लं, पाणी वहातं व्हायला लागल्याची जाणीव करून देतात.
असंच एखाद्या दिवशी आकाशातून दूरवरून ओळखीचा असा गीज (geese) चा आवाज येतो. वर बघावं तर खूप उंचावरून गीज चा थवा आपल्या ठरावीक इंग्रजी ‘V’ अक्षरासारख्या आकारात उडत असतो. स्थलांतर करून हे पक्षी आता आपल्या उत्तरेच्या प्रवासाला लागलेले असतात. पुढचा महिनाभर, दिवसा रात्री, आपल्या आवाजाने लक्ष वेधत आणि निसर्गाचा अचंबित करून टाकणारा एक चमत्कार दाखवत, हे पक्षी ऋतुचक्राचे एक आवर्तन पूर्ण करत असतात.
Leave a Reply