माणसाचं राहणीमान हे त्याच्या पेहरावा बरोबरच पायात काय घातलंय याच्यावरुनही कळते. एखादा मजूर असेल तर साहजिकच त्याचे जोडे झिजलेले दिसतात. कोणी श्रीमंत असेल तर त्याच्या बुटाला धूळ देखील अभावानेच लागते. हा फरक झाला तो सर्वसाधारण नजरेतील!
मला सांगायचंय ते ‘पती पत्नीं’च्या जोड्यांविषयी. लग्नाच्या गाठी स्वर्गातच ठरतात, अशी एक समजूत आहे. प्रत्यक्षात पडलेल्या गाठी किती घट्ट बसलेल्या की ढिल्या हे ज्याचं त्यालाच माहीत असतं.
राजा गोसावी व शरद तळवलकर या जोडगोळीचा पंचावन्न वर्षांपूर्वीचा ‘ह्याला जीवन ऐसे नाव’ हा धमाल मराठी चित्रपट मी पाहिलेला आहे. त्यामध्ये एका नायिकेला नवनवीन पदार्थ करुन नवऱ्याला खाऊ घालायची इच्छा असते परंतु त्याला वाचनाचे वेड असते. दुसऱ्या नायिकेला वाचनाचे वेड असते तर त्या नवऱ्याला तिच्याकडून चांगल्या स्वयंपाकाची अपेक्षा असते. थोडक्यात, ज्याला जसंं पाहिजे तसं सहसा मिळत नाही.
मी आठवीत असताना इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात आर. के. नारायण या लेखकाचा मला ‘फोर रुपीज’ नावाचा धडा होता. त्यातील मजुरी करणारा पती हा बेरोजगार असतो. तो एका स्त्रीचा अरुंद विहीरीत पडलेला पाण्याचा हंडा मोठ्या प्रयत्नांनी काढून देतो. त्याबद्दल ती स्त्री त्याला चार रुपये देते. पती स्वतःच्या कामगिरीवर खूष होऊन ते चार रुपये पत्नीच्या हातात देतो आणि घडलेला प्रसंग तिला तपशीलवार सांगतो. त्यावर त्याची पत्नी विश्र्वास ठेवत नाही, उलट तू हे चार रुपये कुणाचे तरी चोरलेले असतील असा आरोप करते. याला ‘उसवलेला जोडा’ म्हणायचे नाही तर काय म्हणायचे?
किशोर कुमार हा अष्टपैलू कलाकार, हिंदी चित्रपट सृष्टीतील एकमेव हिरा होता. त्याने आयुष्यात चार लग्नं केली. पहिली पत्नी बंगाली होती. तिच्यापासून त्याला अमित कुमार लाभला. दुसऱ्या लग्नासाठी त्याला धर्म बदलावा लागला. सौंदर्यवती मधुबालाशी दहा वर्षे संसार करताना तो फक्त तिच्या आजारावरच खर्च करीत राहिला. त्याला सुख असं मिळालंच नाही. ती गेल्यावर गुटगुटीत योगिता बालीशी त्यानं तिसरं लग्न केले. ती फक्त दिखाऊ बाहुली होती, दोन वर्षातच तिने किशोरशी घटस्फोट घेऊन मिथुन चक्रवर्तीशी लग्न केले. लीना चंदावरकर एक गुणी अभिनेत्री. तिला लग्नानंतर वर्षातच वैधव्य आलं. उतारवयात किशोरने पुन्हा चौथ्यांदा लीनाशी लग्न केले. ही घोर शोकांतिका नव्हे तर काय म्हणायचे?
नवीन निश्चल हा हिंदी चित्रपट सृष्टीतील देखणा अभिनेता. पुण्यातील ‘एफटीआय’चा सुवर्ण पदक विजेता. चित्रपटात येण्याआधीच, त्याचं पहिलं लग्न झालेलं. तिच्यापासून दोन मुली झाल्या. पहिलीशी घटस्फोट झाल्यावर त्याने पन्नासाव्या वर्षी दुसरा विवाह केला. तिच्याशी न पटल्याने तिने आत्महत्या करताना चिठ्ठीत नवीनवर आरोप केले. परिणामी नवीनला जेलमध्ये जावे लागले. हा देखील दोनवेळा उसवलेला जोडाच नाही का?
दिप्ती नवल ही ‘चष्मेबद्दूर’ या सई परांजपे दिग्दर्शित चित्रपटातील मध्यमवर्गीय दिसणारी, लाघवी अभिनेत्री. फारूख शेख या अभिनेत्याबरोबरचे तिचे अनेक चित्रपट यशस्वी झालेले. चित्रपट सृष्टीतील ते अगदी ‘मेड फाॅर इचआदर’ वाटत होते. मात्र तसं घडलं नाही. तिचं लग्न झालं प्रकाश झा या नामवंत दिग्दर्शकाशी. परंतु काही कारणास्तव हे लग्न टिकले नाही. घटस्फोटानंतरच्या एकाकी जीवनात दिप्तीचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले. अशा समंजस, गुणी अभिनेत्रीच्या जीवनात असं घडायला नको होतं.
हिंदी चित्रपट सृष्टीतील गुलजार यांना कोण ओळखत नाही? गेली साठ वर्षे त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी दिलेलं योगदान अभूतपूर्व आहे. हा माणूस जे काही बोलतो, त्याची कविता होते! गुलजार यांनी सुंदर अभिनेत्री राखीशी लग्न केले. त्या दोघांच्या संसारवेलीवर बोस्की नावाचं सुंदर फूल उमलले. नंतर काही वर्षांतच दोघं वेगळे झाले. बोस्की ही गुलजारवर गेली आहे. तिला चित्रपट निर्मिती व दिग्दर्शनाची आवड आहे. या दोघांची परिस्थिती पाहता मला जाॅर्ज बर्नाड शाॅ यांचा एक विनोद आठवतो. एका मोठ्या समारंभात एक सुंदर स्त्री त्यांना विचारते, ‘सर, आपण इतके बुद्धीमान आहात आणि मी सौंदर्यवती आहे. आपण जर लग्न केले तर आपलं मूल हे माझ्यासारखं सुंदर व आपल्यासारखं बुद्धीमान होईल नाही का?’ यावर बर्नाड शाॅ यांनी तीनच शब्दांत उत्तर दिलं, ‘उलटं झालं तर?’
ओम पुरी हा कलात्मक हिंदी चित्रपटातून उदयास आलेला सशक्त अभिनेता. त्याचे सुरुवातीचे ‘मंथन’, ‘आक्रोश’, ‘अर्धसत्य’ सारखे चित्रपट हे अभिजात अभिनेत्याचे मानदंड आहेत. त्याचे पहिले लग्न झाले १९९० साली. दोन वर्षांतच ते विभक्त झाले. १९९३ ला त्याने दुसरे लग्न केले. ती पत्रकार असल्याने तिने ओम पुरीच्या कारकीर्दीवर पुस्तक लिहिले व त्याला न दाखवता प्रकाशित केले. त्यामध्ये त्याच्या अत्यंत खाजगी गोष्टी उघड केल्यामुळे दोघांमध्ये वितुष्ट आले. परिणामी ते वेगळे झाले आणि काही वर्षांतच ओम पुरीचा गूढ मृत्यू झाला.
हिंदी कलाकारांची उदाहरणं देण्याचा उद्देश असा की, सर्वसामान्य माणसाला असं वाटतं.. यांच्याकडे पैसा, प्रसिद्धी, मालमत्ता सर्व काही आहे. यांना कशाची कमतरता? प्रत्यक्षात तसं नसतं. ही माणसं त्यांच्या खऱ्या जीवनात दुःखी, कष्टीच असतात. जणूकाही ‘उसवलेले जोडे’….
— सुरेश नावडकर.
२९-६-२०.
Leave a Reply