अमीर खॉं यांचा महाराष्ट्रात जन्म झाला असला तरी त्यांचे बालपण मध्यप्रदेशात, इंदोरमधेच गेले. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१२ रोजी अकोला येथे झाला. आपल्या साठ वर्षाच्या आयुष्यातील चाळीस वर्षे त्यांनी शास्त्रीय संगीतात घालवली आणि एका गायकीला जन्म दिला. त्या घराण्याचे नाव झाले “इंदोर घराणे“.
अमीर अली यांचे पूर्वज हरियानातील कालनौर नावाच्या गावचे. ते तेथून इंदोरला येऊन स्थायिक झाले होते. साहजिकच अमीरअलीचे वडील लहानग्या अमीरला घेऊन अकोल्याहून इंदोरला गेले. इंदोरला त्याकाळी कलाकारांना राजाश्रय होता आणि शहा अमीर हे चांगले बीन व सारंगी वाजवायचे. अमीर अली नऊ वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली आणि शामीरखाँना त्यांच्या दोन्ही मुलांची आई ही व्हायला लागले. अर्थात तीही जबाबदारी त्यांनी चांगली पेलली. त्या काळच्या कलाकारांच्या घरी जसे वातावरण असायचे तसे यांच्याही घरी होते.
शामीरखाँ यांनी अमीर अली आणि त्यांचा भाऊ बशीर या दोघांनाही संगीताचे धडे द्यायला सुरवात केली होती. तसेच त्यांच्या बिरादरीतील इतर श्रेष्ठ कलाकारांकडेही ते त्यांना नियमितपणे गाणे ऐकायला घेऊन जात होते. असेच एकदा ते त्यांच्या एका नातेवाईकाकडे गेले असता एक प्रसंग घडला. लहानग्या अमीरला आणि बशीरला घेऊन ते त्या घरापाशी आले तेव्हा घरातून संगीताचे स्वर ऐकू येते होते. “आत्ता तालीम चालू असणार” ते मनाशी म्हणाले आणि त्यांनी त्या घरात प्रवेश केला. त्याच क्षणी तेथे एकदम शांतता पसरली आणि सगळ्या शिष्यांनी ताबडतोब आपापल्या वह्या मिटल्या. शामीरसाहेबांनी बळेबळेच एका वहीचे पान उघडले त्यात मेरूखंड गायकीची बरीच नोटेशन्स लिहिलेली त्यांना दिसली. तेवढ्यात एका नातेवाईकाने त्यांच्या हातातील ती वही हिसकावून घेतली.
“हे सारंगियांसाठी नाही. मग वाचून काय उपयोग ?”
हे ऐकून अपमानित होऊन शामीरखाँ त्या घराबाहेर पडले ते ठरवूनच की मी माझ्या एका मुलाला मेरूखंड गायकीत तयार करेन. हे बोलण्याइतके सोपे नव्हते कारण ही गायकी फार म्हणजे फार अवघड आहे. काय आहे ही गायकी आणि ती एवढी अवघड का आहे ?. लहानपणीच चीजा व गाणी गाऊन ते ऐकणा-यांना चकित करीत असत. कल्पक बुद्धिमत्तेचे कलावंत असल्याने उस्ताद अमीर खॉं यांनी डोळसपणे सखोल अभ्यास व रियाज़ करून स्वत:ची स्वतंत्र गायनशैली निर्माण केली.
उस्ताद अब्दुल वहिद खॉं यांच्या विलंबित लयीतील गायनाचा प्रभाव त्यांच्या गायनात होता, तसेच, इंदौर घराण्याचे रजाब अलि खॉं यांची तान गायकी आणि अमान अलि खॉं यांचे मेरुखंड पद्धतीचे रागविस्तार यांच्या प्रभावामुळे अमीर खॉं यांनी स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण गायकी विकसित केली होती. अमान अलि खॉं यांचे शिष्यत्व पत्करून ते चांगले तयारीचे गायक झाले. अभिजात शास्त्रीय संगीतातील ख्यालगायकीतच त्यांनी विशेष मेहनतीने सौंदर्यप्रधान अशी शैली अमीर खॉं यांनी विकसित केली. अधिकतर गंभीर प्रकृतीच्या रागगायनात ते स्वत: अंतर्मुख होऊन रसिकांनाही अंतर्मुख करीत असत.
अमीर खॉं यांची गायकी म्हणजे स्वरप्रधान व आलापप्रधान. ‘झूमरा’ किंवा ‘एकताला’च्या अतिविलंबित लयीतील ख्यालासाठी ठेका अगदी साधा असे. ख्यालाची बढ़त, मेरुखंड पद्धतीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग, बोलआलाप, आलंकारिक सरगमयुक्त ताना आणि क्लिष्ट व अवघड ताना सहजतेने गाण्याची क्षमता यांनी त्यांच्या गायनाला सौंदर्यपूर्णता आणि सूक्ष्मता लाभली होती. क्वचित मुर्की व कणस्वराचा वापर करून ते गाण्यात सौंदर्य आणत असत. मंद्र व मध्य सप्तकांतील रागविस्तारात न्यास स्वरांनी गायनाला उठाव आणून ते रसिकांना मंत्रमुग्ध करीत. कधी कधी ते अंतरा घेतही नसत.
त्यांच्या मते, ख्यालरचनेत शब्द महत्त्वाचे; तर स्वरांच्या रंगांना विशेष अर्थ त्यांनी दिला. त्यांनी स्वत:च्या अनेक रचना लोकप्रिय केल्या. अनेक रुबाईदार तराणे, ख्यालनुमा आणि बंदिशी अमीर खॉं यांनी रचल्या. “हृदयातून निर्माण झालेले, आणि आत्म्याला स्पर्श करणारे ते खरे संगीत” असे ते नेहमी म्हणत. अमीर खॉ यांनी चित्रपटांसाठीसुध्दा काही गाणी म्हटली. पहिला सिनेमा होता क्षुधित पाषाण. हा एक बंगाली सिनेमा होता. बैजू बावरामधील शेवटच्या जुगलबंदीसाठी तानसेनसाठी अमीर खॉं यांचा आवाज तर ठरला पण बैजूसाठी कोणाचा हे काही ठरेना. कोणी म्हणाले पं. ओंकारनाथ ठाकूरांचा आवाज घ्या. पण अमीरखॉसाहेबांनी डि. व्हि. पलूसकरांचा आवाज त्या आवाजाच्या निर्मळतेमुळे सुचवला आणि ते अजरामर गाणे
’आज गावत मन मेरो झुमके” निर्माण झाले. या चित्रपटाचे टायटल सॉंग पण अमीर खॉ यांनीच म्हटले होते. अजून दोन चित्रपटातील गाणी अमीर खॉं यांनी गायली. एक म्हणजे झनक झनक पायल बाजे आणि दुसरा गुंज उठी शहनाई. ग़ालिबच्या माहितीपटासाठी त्यांनी ग़ज़लही गायली. अमीरखॉसाहेब हे एक कलकत्यातील बडे प्रस्थ होते. एक काळ असा होता की त्या शहरातील एकही मेहफिल त्यांच्याशिवाय व्हायची नाही. एवढेच काय त्यांना भारत सरकारने पद्मभूषण, राष्ट्रपती पारितोषिक, स्वरविलास असे अनेक मानसन्मान मिळाले पण या अत्यंत साध्या माणसाचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. कोणीही कधीही त्यांच्याकडे जाऊ शकत असे. खऱ्या अर्थाने ते सुशिक्षित व सुफी संत होते. त्यांनी अमेरीकेत न्युयॉर्क विद्यापिठातही काही काळ संगीत शिकवले.
सरोदवादक अमज़द अली खॉ यांनी त्यांची एक आठवण सांगितली आहे ती त्याच्याच शब्दात.
ते साल होते १९७१. कलकत्यात तानसेन समारोह नावाचा एक संगीत समारोह भरायचा. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या समारोहात मला आमंत्रण होते. एक बुजुर्ग गायक श्री. शैलेनबाबू याचे आयोजन करायचे. हा समारोह संध्याकाळी चालू होऊन रात्रभर चालायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संपायचा, परंपरेने बुजुर्ग कलाकराच्या गायनाने याचा समारोप व्हायचा. त्या दिवशी माझी फ्लाईट उशिरा पोहोचली आणि मी त्या हॉलमधे पोहोचेपर्यंत उस्ताद अमीरखॉसाहेबांचे गाणे सुरू झाले होते.
शैलेनबाबू या प्रकाराने अतिशय अस्वस्थ झाले होते. मी जेव्हा त्यांना सांगितले की मी खॉसाहेबांनंतर गाऊ शकणार नाही तेव्हा ते थोडेसे चिडलेच. बरोबर आहे. प्रेक्षकांनी तिकिटे अगोदरच काढलेली होती. त्यांनी माझी बरीच समजूत काढायचा प्रयत्न केला, पण मी ठामपणे नकारच दिल्यामुळे त्यांचे काही चालेना. हे सगळे चालले असतानाच खॉसाहेबांचे गायन संपले आणि ते निघाले होते. शैलेनबाबूंनी त्यांना गाठले आणि त्यांना माझ्या नकाराबद्दल सांगितले. ते ऐकल्यावर त्यांनी माझ्याकडे बघून मला जवळ जवळ आज्ञाच केली. म्हणाले “ माझ्यानंतर तू नाही वाजवणार तर कोण वाजवणार? जा. वाजव !”
पहाटेचे पाच वाजले होते. मी तसाच स्टेजवर गेलो आणि सुरवात करणार तर काय पुढच्याच रांगेत खॉसाहेब बसले होते. मी नम्रपणे त्यांना म्हटले “ खॉसाहेब आपण गायल्यानंतर आता मला काय वाजवायचे हेच सुचत नाही आहे. कृपया आपण शांतपणे घरी जा आणि आराम करा.”
त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि मला सुरवात करायला सांगितले. मला अजून आठवतंय मी कोमल रिषभ असावरीने ती पहाटेची मेहफिल चालू केली. परमेश्वराच्या कृपेने ती माझ्या अनेक मेहफिलीत सगळ्यात अविस्मरणीय ठरली. त्या पहाटे मला खॉसाहेबांनी जगातील सगळ्यात मोठे बक्षीस दिले होते.”
पं. हृदयनाथ मंगेशकर, कंकणा बॅनर्जी, कमल बोस, अमरजीत कौर, ए. कानन, भीमसेन शर्मा हे सर्व उस्ताद अमीर खॉं यांचे शिष्य आहेत. अमीर खॉं यांना ‘संगीत नाटक अॅकॅडमी अॅवॉर्ड’, ‘पद्मभूषण’, ‘राष्ट्रपति अॅवॉर्ड’, सूरसिंगार, ‘स्वरविलास’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. अमीरखाँसाहेबांचे आपल्या वडिलांवर इतके आदरयुक्त प्रेम होते की त्यांनी पुढील आयुष्यात मुंबईला एक इमारत बांधली आणि त्याला नाव दिले होते “शामीर मंझील”. उस्ताद अमीर खॉं यांचे १३ फेब्रुवारी १९७४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply