उस्ताद झिया फरिदुद्दीन हे धृपदगायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या डागर घराण्याच्या १९ व्या पिढीचे गायक. त्यांचा जन्म १५ जून १९३२ रोजी उदयपूर येथे झाला. वडील उस्ताद झियाउद्दीन खान डागर आणि बंधू वीणावादक उस्ताद झिया मोहीनुद्दीन डागर यांच्याकडून त्यांना धृपद गायनाची तालीम मिळाली. त्यांच्या गायकीमध्ये स्वरभेद आणि गमक यांचे प्रभुत्व होते. देशात आणि परदेशामध्ये त्यांच्या गायनाच्या मैफली झाल्या आहेत.
सांगीतिक मैफली आणि कार्यशाळांद्वारे त्यांनी ओळख निर्माण केली. ऐंशीच्या दशकात ऑस्ट्रिया आणि फ्रान्स येथेही त्यांनी ध्रुपद गायकीचे शिक्षण दिले. भोपाळ येथील ध्रुपद केंद्रामध्ये त्यांनी तब्बल २५ वर्षे संगीताचे मार्गदर्शन केले. उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन सन्मान, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यासह पद्मश्री किताबाने गौरविण्यात आले आहे.
नॉर्थ अमेरिकन धृपद असोसिएशनतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. भोपाळ येथील धृपद केंद्राचे पहिले संचालक असलेल्या डागर यांनी १९८१ पासून तेथे संगीत अध्यापनाचे कार्य केले. आयआयटी मुंबई येथील धृपद संसार येथेही त्यांनी संगीत शिक्षणाचे काम केले. पनवेल येथील गुरुकुलमध्ये गेली काही वर्षे त्यांचे वास्तव्य होते. प्रसिद्ध धृपदगायक उमाकांत-रमाकांत गुंदेचा बंधू आणि उदय भवाळकर हे त्यांचे शिष्य होत. उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर यांचे ८ मे २०१३ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply