उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे
कळवळली भारत माता तुझ्या नावाने रडते आहे.।।1।।
हाती तुझ्या जोर पोलादाचा
रक्तात उसळणारा तुफान आहे
आज जागा झाला नाहीस
तर तुझ्या घरी उद्या स्मशान आहे.
उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे.।।2।।
रोजचेचं व्हाटस अप फेसबुकचे जगणे
आता तुला शोभणार नाही
काळजी असेल ना भारत मातेची
तर घे हाती बंदुक आणि हो सीमेवरचा शिपाई
किती दिवस तुला मिंदेगिरीचे जगणे जमणार आहे
उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे.।।3।।
मार चपराक भ्रष्टांच्या कानाखाली
कारण तूच आहेस उद्याच्या भारताचा वाली..
घरासाठी लढतोस रोज आता देशासाठी लढ
झोपचे सोंग घेणा-या आता तरी डोळे उघड
आज जागा झाला नाहीस तर जीवन संपणार आहे.
उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे.।।4।।
मी ओरडून काय सांगू, तुला ही तुझे दुख कळते आहे
भारतमातेच्या आक्रोशाने तुझे ही ऊर जळते आहे.
तु रडशील आज, पण तुझ्या अश्रूंना किंमत राहणार नाही.
रक्त सांड पुन्हा स्वातंत्र्यासाठी
मग भारत माता ही देईल तुझ्या बलिदानाची ग्वाही
हेच माझे तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे
उठ तरुणा जागा हो रणांगण पेटते आहे.।।5।।
— अमोल उंबरकर
Leave a Reply