आपल्यातील सगळेजणच Wish you best of luck, Happy Journy वगैरे म्हणत असतात. फुलांचे गुच्छ हातात देत असतात. एकटी आई मात्र एकच वाक्य उच्चारते, ‘गेल्यावर पत्र टाक रे बाबा! ” कसल्याही शुभेच्छा व्यक्त न केलेल्या त्या वाक्यामध्ये सगळ्या शुभेच्छांचा वर्षाव जाणवतो. औपचारिकतेची सगळी फुलं तेव्हा मलूल वाटायला लागतात.
भारतीय संस्कृतीमध्ये भावनांचं सुंदर प्रदर्शन – अभिप्रेत आहे; ‘प्रदर्शन नव्हे. इथे पती-पत्नी येता-जाता ‘डार्लिंग’, ‘डिअर’ म्हणत एकमेकांना प्रेमाची ग्वाही देत नाहीत. पण नवरा जेवल्याशिवाय न जेवता त्याची वाट पहात बसून पत्नी शब्दांविना सगळं सांगून जाते.
मुला-नातवंडांचे उठसूट पापे घेतले जात नाहीत. पण त्यांच्या आवडत्या वस्तूचा घास नकळत त्यांच्यासाठी बाजूला ठेवला जातो.
कुठल्याही भावनेच्या उच्छृंखल प्रदर्शनापेक्षा संयमाला या संस्कृतीत सन्मान आहे आणि तरीही इथलं भावजीवन समृद्ध आहे.
आता मात्र दिवसेंदिवस आपण भावजीवन हरवत चाललो आहोत. आतले जिव्हाळ्याचे उमाळे कोरडे पडत चालले आहेत. आणि म्हणूनच की काय, प्रत्येक भावनेचं प्रदर्शन वाढत चाललंय. कौटुंबिक जीवनात – सामाजिक जीवनातसुद्धा ! आणि मुख्य म्हणजे औपचारिकता आणि संस्कृती यातला फरक आपण विसरत चाललो आहोत.
‘संस्कृती’ प्रत्येक नातं, प्रत्येक भावना मनापासून जपायला शिकवत असते आणि हृदयाला अस्सल भावनांचा संयमित आविष्कार तिच्यातून होत असतो. औपचारिकतेत तुमचं मन कोरडं ठक्क असलं तरी चालतं. तोंडातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना इथे महत्त्व ! दिवसेंदिवस कोरड्या बनत चाललेल्या आपल्या जीवनाला आपण औपचारिकतेच्या कुबड्या घेत आहोत, आणि तीच आपली संस्कृती बनत चालली आहे.
भावा-बहिणीचं प्रेम पूर्वीपेक्षा जास्त वाढलंय असं नाही पण पूर्वी साध्याशा धाग्यात बहिणीचं प्रेमही व्यक्त व्हायचं आणि भावानं दिलेला बंदा रुपयाही ‘मानाचा ‘ म्हणून बहीण कौतुकानं जवळ ठेवायची. आता मात्र राख्यांचा आकार, त्यांचा झगमगाटही वाढलाय आणि प्रेझेंटस्च्या किंमतीही ! दिवा’ हे आयुष्याचं प्रतीक ! अजूनही मुलाला ‘वंशाचा दिवा’ म्हटलं जातं. आणि भारतीय संस्कृती ही प्रकाशाची, तेजाची पूजक. इथे सुखाच्या क्षणी दीप उजळले जातात. वाढदिवसाच्या दिवशी मुलांना औक्षण करून आईनं त्यांच्या जीवनात दिवे उजळायचे, ते तेवते ठेवायचे इथली ही परंपरा ! मुलानंही साय वडिलमाणसांना नमस्कार करायचा आणि त्यांनी ‘काल तर हा एवढासा होता केवढा दिसतो आत्ता !’ असं कौतुक भरल्या नजरेनं त्याच्याकडे पाहून आपलीच नजर लागू नये म्हणून झटकन् दृष्टी वळवायची.
आता वाढदिवसाच्या निमित्तानं मुलावरच्या वात्सल्याचंही आपल्याला प्रदर्शन करावंसं वाटतं. शेजार-पाजारचे, ऑफिसातले असे लोक त्या दिवशी ‘पार्टी’ला असतात की ज्यांना तुमच्या मुलाबद्दल काही प्रेम वगैरे नसतं. उजळलेली ज्योत आपण सहजतेने फुंकून टाकतो. तेव्हा आपल्या संस्कृतीच्या संकेताचं भान आपल्याला नसतं.
कुटुंबजीवनातल्या भावनासारखंच समाजजीवनातही भावनांचं प्रदर्शन वाढतंय. समाज एकाएकी भक्तिमार्गाला लागलाय असं नाही. पण गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे सण फार मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत. यातून मूळ ‘समाजप्रबोधनाचा हेतू’ तो तर नष्ट होतोय. उरला आहे तो नुसता ‘उत्सव ! ‘ पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी यासारख्या राष्ट्रीय सणांचीही हीच कथा ! अर्थात जुनं ते सारंच सोनं अशा टोकाच्या विचाराला आपल्याला जायचं नाही. भावनांचं हे ‘प्रदर्शन’, उत्सवीकरण’ ही आमच्या मनाची गरज होत चालली आहे. रोजचं आयुष्य घड्याळी, यांत्रिक होतंय. छोट्या छोट्या भावना जपत बसायला इथे वेळ नाही. त्या मनात नसतात असं नाही पण त्यासाठी वेळ देण्याची ‘चैन’ परवडत नाही. मग अशा उत्सवाच्या रूपात त्या भावना व्यक्त होतात, तेव्हाही मनाला समाधान मिळतं. मनाला नकळत आलेली निराशा, रोजच्या त्याच त्या जीवनानं आलेली मरगळ हे सारं उत्सवानं जाऊ शकतं. त्या निमित्तानं समाजात काही हालचाल होते. कल्पना, संयोजनकौशल्य, विचार यांना चालना मिळते आणि मुख्य म्हणजे माणसाच्या उत्सवप्रियतेची तहान भागते. म्हणून साऱ्याच भावनांच्या अभिव्यक्तींना ‘प्रदर्शन’ म्हणून हिणवण्यात अर्थ नाही. कधी कधी तीही मनाची गरज असते. अपरिहार्य म्हणून आपण विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारली. जुन्या वाड्यांची परंपरा जाऊन बंद दारांची-फ्लॅटसूची संस्कृती आली. याचे काही फायदेही झाले.
भरपूर माणसांचं ‘खटलं ‘ चालवताना स्त्रियांचा वेळ ‘रांधावाढा- उष्टी काढा’ यातच जात होता. तो कमी झाला. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या आवडीनिवडींना वाव मिळाला आणि सगळ्यांनाच थोडा मोकळा श्वास घेता येऊ लागला. वाड्यांमध्ये कुठलीच गोष्ट खासगी न राहता तिचं ‘सार्वजनिकीकरण’ होत होतं, ते कमी झालं. पण कधीतरी वाटतं, हे व्यक्तिस्वातंत्र्य भारतीय मनाला पुरेसं पेललं नाही त्याच्या मनाला समूहाची गरज आहे. ‘मी’ या शब्दापेक्षा ‘आम्ही’ हा शब्द पणाची त्याला जास्त महत्त्वाचा वाटतो. सार्वजनिक उत्सवांमध्ये ‘आम्ही भावना जोपासली जाते. या ‘आम्ही ‘ ची दुसरी अटळ बाजू म्हणजे ‘तुम्ही !’ दोन गटांमधली, दोन मंडळांमधली स्पर्धा ‘ आम्ही तुम्ही ‘ ही भावना जाऊन ‘आपण’ अशी एकतेची भावना निर्माण होते. उत्सव ‘ संघकार्य’ शिकवतात. स्वतः चे बरे-वाईट कंगोरे विसरून समूहामध्ये तडजोडी करून काम करायला शिकवतात.
व्यक्तिगत पातळीवर विचार करायचा तर पूर्वी कधी नव्हतं इतकं माणसाचं आयुष्य आज क्षणभंगूर, असुरक्षित झालंय. या क्षणभंगूरतेची अदृश्य भीती माणसाच्या मनाला वेढून राहिली आहे. ती विसरण्याकरता आपण स्वतःला प्रत्येक भावनेच्या ‘उत्सवी प्रदर्शनात ‘ गुंतवत नसू ना? कुणास ठाऊक. कदाचित भावना व्यक्त करण्याची ही चकमकती, झगमगती पद्धत आता सवयही बनून जाईल. परस्परांच्या मनाशी संवाद साधण्यापेक्षा भावनांचा देखावा आपल्याला जास्त सोपा वाटेल. फक्त कोणतीही भावना ‘सेलिब्रेट’ करताना तिचा गाभा, पाया नष्ट होऊन नुसती कोरडी औपचारिकताच उरत नाहीये ना? तो कोरडेपणाच उत्सवाचे रंग मारून, पाणी मारून ताज्या ठेवलेल्या फुलांसारखा आपण फुलवत नाही आहोत ना? याचा विचार व्हायला हवा.
Leave a Reply