हे असेच मी बनावे..
नी असेच मी घडावे..
शब्दांनी ही रे माझ्या,
माणसासाठीच लढावे.
विष प्यावे अन शंकर व्हावे,
शब्द माझे पैगंबर व्हावे..
फकिरा लिहावी इथे साठे नी
शब्दांनीच आंबेडकर व्हावे..
आगरकर सुधारक हे दिवाने यावे,
खरा धर्म सांगण्या गुरुजी साने यावे..
जोतिबा होऊन समाजाचे सृजन करावे,
कवितेत मिराने प्रेमाचे भजन करावे..
पाजावे नाथाने गाढवास काशीचे पाणी,
माणसाला माणुसकीचे दर्शन व्हावे ..
गावे तुकाने जे का रंजले गांजले
ज्ञानदेवांनी जगासाठी पसायदान घ्यावे ..
देश भक्तीची मदिरा घ्यावी,
आणि नशेत असे झिंग व्हावे.
पेटावे असे मग रक्ताने माझ्या,
क्रांतिकारक भगतसिंग व्हावे.
मातीसाठी कधीही अव्वल,
शर्थ माझ्या जिवाची व्हावी..
बघावे मी परस्त्रीस जेंव्हा
नजर माझी शिवाजी व्हावी ,,
अहिंसक गांधी यावा इथे ,
विचारांनी माझ्या शुद्ध व्हावे
षड्रिपूंशी व्हावी सुटका,
मन हे माझे बुद्ध व्हावे..
सोडून सारे द्वेष मनीचे,
सारेच प्रेमात अधीर व्हावे,..
कालिदास व्हावे शब्द काही,
काही शब्दांनी कबीर व्हावे..
एक उत्सव माझ्या कवितेचा,
मला असा भरवायचा आहे.
मलाच माझ्यामध्ये एक,
माणूस असा घडवायचा आहे…
— लतीफ शेख सारोळकर
लातूर
8975071158
https://www.facebook.com/shaikh.latif.988
( “आम्ही साहित्यिक” फेसबुक ग्रुपवरुन )
Leave a Reply