उत्तम ते सर्वगुण, टाळावे ना विनाकारण
परंतु न स्वीकारावे रजोगुण, सुखी जगण्यासाठी!!
सुखं मिळते रजोगुणात, परी सक्त रहावे ते जगण्यात
आपुल्या इच्छा पूर्तीसाठी, न कोणास वापरावे!!
अर्थ–
चांगले जेवण मिळू लागले आणि पहिली धोक्याची घंटा वाजली श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनात. जर हेच असे चांगले जेवण रोज मिळू लागले तर ज्या कार्यासाठी श्री प्रभू रामचंद्रांनी माझी निवड केली आहे ते कार्य पूर्ण कसे होणार? मला जे साध्य करायचे आहे ते कसे करू शकणार मी, या भावनेनेच श्री समर्थांनी रोज एकदाच भिक्षा मागावी, मिळालेल्या भिक्षेला कापडाच्या पुरचुंडीत बांधावी, ती पुरचुंडी गोदावरीच्या पात्रात ठेऊन द्यावी जेणेकरून त्या अन्नातले सगळे रस पाण्यात मिसळून निघून जातील. शेवटी उरलेले जे काही अन्न असेल ज्यात चव, प्रेम, भावना, उदारपणा, उपकारांची माया जे काही असेल त्यांचा लवलेशही उरलेला नसेल असे ते अन्न पाण्यातून काढावे आणि त्याचे तीन भाग करावेत. पहिला भाग हा प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करावा, दुसरा भाग गोदावरीतल्या माशांना अर्पण करावा आणि तिसरा उरलेला भाग स्वतः ग्रहण करावा. यातून काय घडले? तर सारे काही मलाच हवे ही लहानपणी मुलांच्यात येणारी भावना पहिले नष्ट झाली. आपल्याला मिळालेलं आयुष्य हे केवळ आपले नसून सर्वांचे आहे तसेच प्रत्येक गोष्ट समान रित्या वाटण्याची फार महत्वाची सवय लागली. आणि त्याचा फायदा आज अजूनही आपल्याला होतोय तो त्यांनी लिहिलेल्या ग्रंथ, साहित्य या मधून. जर ते लोकांना दाखवलंच नसतं तर समाजप्रबोधन, स्वत्वाची जाणीव ही निर्माण झालीच नसती.
म्हणूनच समर्थांनी सांगितलेल्या तीन।गुणांपैकी रजोगुण हा मर्यादित ठेवावा. कारण जर रजोगुणाने आपल्या मनावर कब्जा केला तर सत्व गुणाला सुरुंग लागून तम आणि रज गुणांची पार्टनरशिप होते आणि।ती समाधानी, सुखी आयुष्याच्या वाटेला चकवा लावल्या शिवाय रहात नाही.
रजोगुण कमीत कमी असावा त्याने आसक्ती, आशा, इच्छा एका विशिष्ठ पातळी पर्यंत टिकून रहातात. जे त्यांनी पातळी ओलांडली तर भविष्याला आणि वर्तमानाला लोभाच्या भयंकर पुरात स्वतःला वाचवणे कठीण होऊन बसते.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply