कवी मायदेव म्हटले की, कवितांची आवड असणाऱ्या जु्न्या पिढीतील वाचकांना हटकून आठवणार ती त्यांची ‘गाइ घरा आल्या’ ही सुंदर कविता. त्यांचा जन्म २६ जुलै १८९४ रोजी झाला. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या तरी गाई राखायला गेलेला ‘वनमाळी’ मात्र काही घरी आलेला नसतो.
कातरवेळ उलटते, रात्रही होते, तरी वनमाळी न आल्यामुळे आईच्या जिवाची जी उलघाल होते, तिचे वर्णन मायदेव यांनी या कवितेत अतिशय साध्या-सोप्या शब्दांत केले आहे. ही कविता हीच मायदेव यांची ओळख होती. १९२९ साली त्यांनी ती लिहिली.
१९१५ ते १९२९ या कालखंडात त्यांच्या हातून ज्या कविता लिहून झाल्या, त्या सर्व कविता ‘भावतरंग’ या संग्रहात वाचायला मिळतात. ‘गाइ घरा आल्या’ ही कविता याच संग्रहात आहे.
कवी मायदेव रविकिरण मंडळातील कवींचे म्हणजे, माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन, यशवंत, गिरीश, श्री. बा. रानडे आदींचे समकालीन कवी. गंभीर विचारवृत्तीच्या; तसेच बालांसाठीच्या विपुल कविता मायदेव यांनी लिहिल्या. त्या काळी लहान मुलांमध्ये मायदेव यांच्या बालकविता विशेष आवडीच्या असत. कवी वनमाळी या टोपणनावानेही ते साहित्यक्षेत्रात परिचित होते.
‘काव्यमकरंद’, ‘भावतरंग’, ‘भावनिर्झर’, ‘सुधा’, ‘भावविहार’ हे त्यांचे काव्यसंग्रह; तर ‘बालविहार’, ‘किलबिल’, ‘शिशुगीत’, ‘क्रीडागीत’ हे बालगीत संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भा. रा. तांबे यांच्या कवितांचेही संपादन मा.मायदेव यांनी केले होते. मा.मायदेव यांचे ३० मार्च १९६९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मायदेव यांची गाइ घरा आल्या कविता
………………………..
गाइ घरा आल्या
………………………..
गाइ घरा आल्या । घणघण घंटानाद
कुणीकडे घालू साद । गोविंदा रे? ।। १ ।।
गाइ घरा आल्या । धूळ झाली चहूंकडे
घनश्याम कोणीकडे । माझा गेला? ।। २।।
गाइ घरा आल्या । वासरे हंबरती ।।
कुणीकडे बालमूर्ती । कृष्ण माझा? ।।३।।
गाइ घरा आल्या । ब्रह्मानंद वासरांना
काय करू माझा कान्हा । चुकला का? ।।४।।
गाइ घरा आल्या । घोटाळती पाडसांशी
हाय! नाही हृषीकेशी । माझ्यापाशी ।।५।।
गाइ घरा आल्या । पाडसास हुंगीतात
माझा मात्र यदुनाथ । दुरावला! ।।६।।
गाइ घरा आल्या । आंवरेना मुळी पान्हा
राहणार भुका तान्हा । वासुदेव ।।७।।
गाइ घरा आल्या । दूध वाहे झुरूझुरू
माझ्या जीवा हुरूहूरू । मुकुंदाची ।।८।।
गाइ घरा आल्या । दूधवाट राहियेली
कुणी माझा वनमाळी । गुंतवीला ।।९।।
गाइ घरा आल्या । झाली बाई कातरवेळ
आजुनी का घननीळ । ये ना घरा? ।।१०।।
गाइ घरा आल्या । लावियेली सांजवात
बाळा दामोदरा रात । झाली न का? ।।११।।
गाइ घरा आल्या । पाल चूकचूक करी ।
राख अंबे माझा हरी । असे तेथे ।।१२।।
Leave a Reply