वाददिवस म्हणजे वयात एक वर्षाची वाढ. खरे पाहिले तर बालकाच्या मेंदुची वाढ आठव्या वर्षापर्यंत पूर्ण होते. शाररिक वाढ (उंची) वयाच्या पंचविशीपर्यंत पूर्ण होते. वयाच्या चाळीशीनंतर दृष्टी अधु होउ लागते, केस गळु लागतात . पुरुषांना टक्कल पडते. काहींना चाळीशी लागते. पन्नाशीत दांत हलणे सुरू झालेले असते. साठीत काहींना कानांनी कमी येणे सुरु होते, सत्तरीत चालताना काठी लागते. ही सर्व वस्तुस्थिती असली तरी माणसे चाळीशीनंतर सुध्दा वाढदिवस साजरा करणे सोडत नाही. कोणतेही विशेष कर्तुत्व न दाखवलेली व्यक्ती आपली साठी, ७५ वी व सहस्त्रचंद्र दिवस एखाद्या समारंभासारखा, अगदी केसाला कलप लावून, साजरा करतात.
वाढदिवस म्हटला म्हणजे बाजारातून केक आणणे, त्यावर लावलेल्या मेणबत्या पेटवणे . सर्वांच्या साक्षीने फुंकर मारून विझवणे,इतरांनी ठरविक हॅपी बर्थडे टु यु म्हणत टाळ्या वाजवणे हे सर्व आलेच. एरवी पेटलेला दिवा वा-याने जरी विझला तरी अशुभ मानणारे या दिवशी फुंकर मारून विझवणे शुभ मानले जातात.
इंग्रज गेले पण कांही भंपक पध्दती सोडून गेले. कोशल्येने रामाचा वाढदिवस साजरा केल्याची कथा ना वाल्मिकींना सुचली ना गदिमांना सुचली. कॉंव्हेंटमधल्या मुलांना रामनवमी म्हणजे लॉर्ड रामाचा हॅपी बर्थडे येवढेच शिकवले जाते.
राजकिय नेत्याचा वाढदिवस म्हणजे एक महोत्सव असतो , वर्मानपत्रात चार पानी पुरवणी छापली जाते. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत कार्यकर्त्यांसाठी सहस्त्रभोजनाचा कार्यक्रम होतो. काही नेत्यांची धान्यतुला होते, रात्री खास लोकांची पार्टी होते. मनोरंजनासाठी खास डांस पार्टी बोलावली जाते. असा हा नेता किती लोकप्रिय आहे ह्याची कल्पना दुस-या दिवशी कचरा पेटीत किती हार व पुष्पगुच्छ दिसतात, विदेशी दारूच्या किती रिकाम्या वाटल्या दिसतात, त्यावरून येते.
कांही नेत्यांची जयंती दरवर्षी साजरी होते. चौकातले विद्रुप झालेले पुतळे त्यानिमित्ताने स्वछ केले जातात. त्यांना हार घातले जातत. नागपुरसारख्या शहरात याच कामासाठी राष्ट्र पित्यापासून ते गल्लीतल्या नगरसेवकांचे पुतळे उभारलेले आहेत.
बहुतेक लोक “वृध्दत्वी निज शैशवास जपणे “ या उक्ती प्रमाणे नातवंडात रमतात. फळांनी बहरलेले झाड वाकते पण कांहींचा ताठरपणा वयानूसार वाढतच जातो, घरातले सर्व व्यवहार मला विचारूनच झाले पाहिते असा त्यांचा आग्रह असतो. अशांसाठी समर्थ रामदास रामाला साकडे घालतात “ कोमल वाचा दे रे राम” . हिंदी भाषेत वृध्द व्यकीसाठी बुढा व बुजुर्ग असे शब्द सर्रास वापरले जातात . पण प्रत्येक वृध्द (बुढा) अनुभवाने शाहणा (बुजुर्ग ) असतोच असे नाही.
एका हिंदी कवीने वृध्दपणाचे वास्तव या शब्दात सांगितले की “ जो जाके वापस नही आती ऐसी जवानी देखी और जो आके वापस नही जाता ऐसा बुढापा देखा.”
पण मिर्झा गालिबने आपले वेतन दरमहा ठरविक दिवशी मिळाले म्हणून काव्यमय अर्ज बहादूरशहा जफरला लिहिला. शेवटी बादशहाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्या दोन ओळीत दिल्या त्या अजरामर झाल्या आहेत.”तुम जीओ हजारो साल और हर साल के दिन हो पचास हजार”.
— डॉ. अशोक नेने
आषाढ कृष्ण पंचमी शके १९४२ शुक्रवार १० जुलै २०२०
Leave a Reply