कुडाळ जवळील वालावल हे देखील निसर्गाने गर्द हिरव्या झाडीने झाकलेले असेच एक छान गाव ! येथील लक्ष्मीनारायणाचे देऊळ म्हणजे डोंगर, माड , तलाव , कलात्मक दीपमाळा अशा सर्व संपत्तीने सजलेले प्रशस्त देवस्थान आहे ! बहामनी सत्तेने आत्यंतिक धार्मिक छळ सुरु केल्यावर, गोव्यातील हरमळ येथून ही मूर्ती वालावल येथे आणण्यात आली, असेही म्हटले जाते. लक्ष्मीनारायणाची मूर्ती म्हटले तरी कोकणात बहुतेक ठिकाणी विष्णूच्या उजव्या व डाव्या बाजूला लक्ष्मी आणि भूदेवी / श्रीदेवी यांच्या मूर्ती असतात. येथील मूर्तीही तशीच आहे. अगदी देवळात शिरतानाच दोन्ही बाजूंना ३ /३ दिवे लावण्यासाठी बसविलेल्या महिरपयुक्त पट्टया खास आहेत. छताला बसविलेल्या त्रिकोनयुक्त रिपा वेगळ्या आणि भक्कमपणा वाढविणाऱ्या आहेत. रिंगयुक्त घंटा पोर्तुगीज घंटांची आठवण करून देणारी आहे. पूर्वी प्रत्येक गावकरी दिवसातून एकदा तरी देवळात येत असे. त्यामुळे गावातील पत्रे टाकण्याची पोस्टाची पेटी, देवळातच बसविलेली असे. तशीच ती या देवळातही आहे. आता टपालव्यवस्थाच बंद पडत चालली आहे. त्यामुळे टांगायच्या या जुन्या टपालपेटीचे दर्शनही आनंददायी आहे.
— मकरंद करंदीकर.
Leave a Reply