दोन दिवस तीन गावांमध्ये काळाला स्थगिती देत आणि टाइम मशीनला १९७५ मध्ये सेट करीत आम्ही हिंडून आलो “तिच्या “वारीसाठी !
मग पडक्या इमारती पूर्ववत देखण्या झाल्या, ओबड -धोबड रस्ते मऊ-मखमली झाले. वयं आक्रसली आणि नजरेतील जुने विस्मय परतून आले. एव्हाना सोडून गेलेले गणगोत नव्याने त्याच चौकटीत विराजमान झाले. एक गांव आकुंचित झालेले,दुसरे जुन्या स्मृतींमधील सत्व हरवून बसलेले ! थोडं थोडं ओळखीच्या खुणा बाळगणारं बाळपण पायात घोटाळत होतं. एका धरणाची दारे सताड उघडलेली आणि दुसऱ्या आठवणींच्या विहिरीवरील झाकणे अधे-मधे किलकिली होणारी !
काळ पाहत होता-थबकत होता.हाताची घडी घालून सगळं दाखवत होता. परिक्रमेबरोबर चालत होता- आतल्या आणि बाहेरच्या ! काळाचे पांढरे हात केसांवर फिरलेले चेहेरे,गल्ल्या,बाजारपेठा सगळं म्हटलं तर तसंच गजबजलेलं पण अंधुक आठवणारं !
गप्पपणे आपापले हिशेब करीत पावले नव्या दमाने भूतकाळाचे आढावे, हिशेब मांडत होते. स्मृतींचे फोटो निघत होते. काहीसं ताजतवानं/किंचित ओलावणारं वास्तव. हातात जमेल तितकं धरण्याची धडपड ! आता केव्हाही कानांवर दुपारी बाराचा आणि रात्री आठचा भोंगा पडेल, चंदुलाल रसवंतीच्या दुकानावर बेहिशेबी
” लेकर हम दिवाना दिल,
फिरते हैं मंजिल मंजिल ”
ची धून वाजेल अशी स्वप्नं दिवसा-ढवळ्या पडत होती.
“तिच्या “समाधीपाशी पोहोचलो- पायांवर पुस्तक आणि डोके ठेवले. माउलींच्या स्मृतीत दंगलेला वैष्णवांचा मेळा पारायण करीत होता. थोडं त्यांच्या आवाजात स्वतःला भिजवलं.
तिने विचारलं- ” काय आहे अजून तुझ्या मनात?”
” ते शांतीपूर्ण क्षमा समजत नाहीए.” माझा प्रामाणिक कबुलीजबाब !
गाभाऱ्यातील मूर्तीच्या चेहेऱ्यावरील शांतता क्षणभर डहुळली. खोल स्वर माझ्या एकट्याच्या कानात घुमला-
” बाळा, त्यासाठी युगे अठ्ठावीस वारी करावी लागते किंवा एकतरी ओवी अनुभवावी लागते. ”
आज “तिच्या” समाधीस्थळावर आणि आमच्या मनात ७२५ वा अंतर्धान सोहोळा पार पडतोय.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply