आज ‘वसुबारस’. पारंपारीक दिवाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाली..वसुबारस म्हणजे गाय-वासराच्या पुजेचा दिवस..ज्या गो-धनाच्या मदतीने शेतीतून धान्य पिकवले गेले, त्या गोधनाची कृतज्ञता म्हणून, तीची तीच्या वासरासहीत पुजा करण्याचा आज दिवस..गाय हिन्दू धर्मात अत्यंत पूजनीय आहे, त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे तीच्यापासून उत्पन्न झालेल्या बैलांशिवाय शेती अशक्य..! तीच्याप्रती कृतज्ञता म्हणूनच कृषीसंस्कृतीतील दिवाळी या सर्वात महत्वाच्या सणाची सुरूवात गो-पूजनाने केली जाते..गोठ्यातील गायी, म्हशी आणि बैल, शेळ्या-मेंढ्या हीच शेतकऱ्याची खरी धनदौलत..या गोधनाची कृतज्ञता पूजा म्हणजे वसूबारस..
‘वसू’ या शब्दाचा एक अर्थ ‘धन’ किंवा ‘संपत्ती’ असा होतो, वसुधा म्हणजे पृथ्वी म्हणजे जमीन..आता पन्नास-पंचावन्न वयात असलेल्याना आठवत असेल, की त्यांच्या लहाणपणातली गाय हटकून ‘वसुधा’ नांवाची असायची..मला तर ‘वसुधा’ हा शब्द गायीला समानार्थी शब्द वाटायचा अजुनही वाटतो..गाय आणि जमिन यांना एकच शब्द देण्यामागे, या दोघांचं प्राचीन जीवनातील महत्व आणि अलम मानववंशाला त्यांच्याशिवाय इथपर्यंत पोहोचवल्याचा सन्मान हीच भावना असावी..
‘दिन दिन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी..’ या गाण्यातील शेवटची ओळ ‘वाघाच्या पाठीत घालीन काठी..!’ अशी आहे..गाई-बैलाच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष वाघाच्या पाठीत काठी घालण्याची तयारी दाखवली आहे ती गोधनाच्या प्रेमापोटीच..! यातही आपल्या प्राचीन कृषीसंस्कृतीचा मोठेपणा पहा.. वाघाच्या पाठीत फक्त काठीच मारायची भाषा आहे, वाघाला जीवे मारायची नाही..! आपल्या निसर्गपूजक पूर्वजांना वाघाचं निर्सगातील महत्वाचं स्थान माहीत होतं व त्याचा आदरही ते करत होते असा ठाम अर्थ यातून काढता येतो..
कोकणातील माझ्या गांवाकडे या दिवशी ह्या दिवशी गावाकडे गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतात..गोठ्यात शेणाच्या गवळणी व श्रीकृष्णाच्या मूर्ती बनवल्या जातात..त्यांची पूजा केली जाते..विशेष म्हणजे ह्या दिवशी घरातल्या स्त्रियाना गोठ्यातलं कोणतही काम करू देत नाहीत…ही आपल्या ‘कृषीसंस्कृती’ने आपल्याच मूळ ‘मातृप्रधान संस्कृती’ला दिलेली मानवंदना आहे..शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, भूमी, गाय व स्त्री या तीघींमधे असलेल्या प्रसवक्षमतेचा, इतरांच निरपेक्ष भावनेने पालन-पोषण करण्याच्या त्यांच्या भावनांचा, क्षमाशीलतेचा केलेला हा आदर आहे..
*नितीन साळुंखे
पूर्व प्रसिद्धी-साप्ताहिक लोकप्रभा दि २८.१०.२०१६
Leave a Reply