प्रारंभी जहाल क्रांतिकारक बनलेले परंतु नंतर अनेकांचे आध्यात्मिक गुरु झालेले अरविंद घोष यांचे व्यक्तिमत्त्व विलक्षण होते. डॉक्टर असलेले त्यांचे वडील डॉ. कृष्णधन घोष हे इंग्लंडला जाऊन शिकून आले होते. त्यामुळे त्यांच्या राहणीवर तसेच विचारसरणीवर पाश्चात्यांचा फार प्रभाव होता. आपल्याही मुलांनी संपूर्णपणे इंग्लिश लोकांसारखे राहिले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. इंग्रजी आमदानीत वाढलेले डॉ. कृष्णधन घोष नास्तिक होते. आपल्या मुलांना भारतीय संस्कृतीचे वारे लागू नये म्हणून त्यांनी बंगाली राष्ट्रीय शाळेत न पाठविता दार्जिलिंग येथे खास इंग्रजांच्या मुलांसाठी असलेल्या शाळेत शिकण्यासाठी ठेवले. परंतु अरविंद घोष यांची भारतीय संस्कृतीशी असलेली नाळ इतकी घट्ट होती, की पुढे ते इंग्लंडला शिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांनी भारतीय संस्कृती व अध्यात्मावरील सर्व पुस्तके वाचून काढली.
एकाग्रचित होऊन वाचन करणे ही अरविंद घोष यांची सवयच होती. त्यामुळे ते एकपाठीही होते. त्यांच्या या वाचनाच्या सवयीबद्दल त्यांचे एक सहकारी मित्र चारुचंद्र दत्त यांनी सांगितलेली हकिकत अशी, की अरविंद घोष याना वाचनाची खूपच आवड होती. महाविद्यालयातून घरी आल्यावर आधी ते खोलीत समोर दिसेल ते पुस्तक वाचायला सुरुवात करीत. आम्ही त्यांचे मित्र खोलीत गडबड, गोंधळ करीत असू मात्र त्याकडे अरविंद घोष यांचे मुळीच लक्ष नसायचे. वाचताना त्यांच्यासमोर चहाचा कप नेऊन ठेवला, तरी वाचन पूर्ण झाल्यानंतरच तो चहा ते घेत असत.
एकदा आम्ही मित्रांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले. महिनाभरापूर्वी त्यांनी वाचलेल्या एका पुस्तकाचे मधलेच एक पान उघडून मी ते वाचायला सुरुवात केली व थांबून त्यानंतर पुढे काय? असे अरविंदांना विचारले, त्यावेळी त्यांनी लगेच त्या पानावरचा सगळा मजकूर धडाधड म्हणून दाखविला आणि आम्हाला आश्चर्यचकित केले.
एकदा अरविंदांच्या नावाने एका प्रचंड मोठे पार्सल आले. आम्ही ते उत्सुकतेने फोडून पाहिले तर आतमध्ये सर्व पुस्तकेच होती.
अरविंद घोष यांचे वाचनवेड असे अफाट होते.
Leave a Reply