आदल्या दिवशी झालेल्या सामन्यांचे फक्त निकाल व स्कोअर्स दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात छापून आणणारा “स्कोअरर” व ” जाणता क्रीडापत्रकार” यांमधील फरक विविकंनी ठळक अक्षरात दृग्गोचर केला. राजकीय माकडचेष्टांनी आणि खुज्या व स्वार्थी पुढाऱ्यांच्या कुरघोडीच्या कारस्थानांनी भरलेले वर्तमानपत्राचे पहिले पान वाचण्यापेक्षा शेवटचे क्रीडापान आधी वाचण्याची सवय त्यांनी सुजाण वाचकांना लावली. आम्ही आमच्या क्रीडाप्रेमाच्या गलबताचे सुकाणू त्यांच्या हाती सोपवून निर्धास्त झालो.आणि त्यांनीही त्या गलबताला डोळस दिशा दिली व ते भरकटणार नाही आणि ते योग्य त्या बंदराला लागेल याची दक्षता घेतली.
विजय आणि पराभव या दोघांबरोबरच क्रीडाक्षेत्रात पडद्याआड इतरही काही प्रियअप्रिय घटना घडत असतात आणि त्यांची दखल घेण्यासाठी व त्यांचे अंतरंग समजून घेण्यासाठी या क्षेत्राला तानसेनांइतकीच सजग कानसेनांचीही गरज आहे याची आम्हाला जाणीव करुन दिली.कोणत्याही खेळात विजयानंतर भारतीय संघाला डोक्यावर घेऊन नाचणारे आणि पराभवानंतर त्याच संघाला शिव्यांची लाखोली वाहणारे ‘आंधळे’ बघे न बनविता आमच्यातून ज्ञानी,जबाबदार व रसिक क्रीडाप्रेमी तयार केले.सदैव ‘जागल्या’ च्या भूमिकेतून खेळ व खेळाडू यांच्या हितरक्षणार्थ डोळ्यात तेल घालून गस्त दिली.
क्रीडाप्रेमाचे कातडे पांघरुन , राजकीय वरदहस्ताने शेफारलेल्या व क्रीडाक्षेत्रात , माजलेल्या उन्मत्त वळूप्रमाणे घुसलेल्या आणि खेळाच्या व खेळाडूंच्या विकासाचे लेबल लावून , स्वतःसाठी व आपल्या पित्त्यांसाठी ” इन्फ्रास्ट्रक्चर ” च्या नावाखाली नवनवीन चराऊ कुरणे तयार करणाऱ्या, खेळांचे व खेळाडूंच्या भल्याचे जराही सोयरेसुतक नसणाऱ्या सुरेश कलमाडींसारख्या बाहुबली राजकारण्याशी विविकंनी निव्वळ आपल्या लेखणीच्या जोरावर ,समस्त क्रीडाप्रेमींच्या वतीने दोन हात केले. प्रसंगी त्यासाठी भाडोत्री गुंडांकडून शारीरिक हल्लाही झेलला पण हातातल्या लेखणीवर फडकविलेले लाखो क्रीडारसिकांच्या विश्वासाचे,आशेचे व अपेक्षांचे निशाण आणि सत्याचा जरीपटका मातीत मिसळू दिला नाही आणि धनदांडग्या , कावेबाज व भ्रष्ट शत्रूला अस्मान दाखविले.
धन्यवाद विविक…….खूप खूप धन्यवाद !
गेल्या गुरुवारी रात्री स्वप्नात आलेल्या माझ्या आजीला मी म्हणालो …. जर स्वर्गात ( कठीणच आहे म्हणा ) भालचंद्र दिसले तर त्यांना जरुर सांग की ” माझ्या नातवाला पृथ्वीतलावर एक जादूगार भेटला व त्याने तुम्ही माझ्या नातवाला दिलेल्या शापाचे उःशापात रूपांतर केले.”
पण तुम्हाला म्हणून सांगतो, सोबतकार ग.वा. बेहेरे म्हणायचे तसे, सगळ्याच जादूगारांना काही कबुतरांची माणसे बनविता येत नाहीत, आणि तसेच, सगळ्याच क्रीडापत्रकारांना काही सामान्य वाचकांतून चोखंदळ क्रीडारसिक घडविता येत नाहीत.
शायर खुसरो मतीनची माफी मागून त्याच्या शब्दांत थोडा बदल करुन म्हणेन….
तमाम उम्र मेरे साथ चलता रहा,
अजीब जादूगर है , रुठा न हमकलाम हुआ ।
संदीप सामंत
९८२०५२४५१०
२/०४/२०२०.
Leave a Reply