नवीन लेखन...

वध आणि खून : गांधीजी आणि अन्य – भाग १

दिनांक १३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राच्या पान २ वरील, एका बहुचर्चित विषयाशी संबंधित ठळक बातमी वाचून त्याबद्दल स्पष्टीकरण मांडावे असे वाटले, म्हणून हा प्रपंच.

बातमीचे शीर्षक व उपशीर्षक असे आहे : ‘गांधींचा वध नव्हे, तर खूनच ! : कुलगुरूंचे भाषण मधेच थांबवत शरद पवार यांची सूचना …’ .

गेली अनेक वर्षें या विषयावर चर्विचर्वण झालेले आहे, पण कोणीही अजून त्याचा सुयोग्य उलगडा केलेला माझ्यातरी पाहण्यात आलेला नाहीं. श्री. शरद पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त करूनही, असे खेदाने म्हणावे लागते की, या विषयावर मतप्रदर्शन करणार्‍या लहानथोर व्यक्तींनी भाषा, शब्दार्थ, सांस्कृतिक ग्रंथ, इतिहास, इत्यादी बाबी विचारात घेतलेल्या नाहींत; आणि म्हणून ते लोक विशिष्ट शब्दप्रयोगाबद्दल भावनिक मत नोंदवतात; पण ते कितपत योग्य व विचारणीय आहे, हे पाहिले जात नाही. याचे मुख्य कारण असे आहे की, ‘वध’ हा (केवळ) दुष्टांचा होतो, गुन्हा करणार्‍यांचा होतो, व ‘खून’ हा (फक्त) सज्जनांचा, सत्शीलांचा, महात्म्यांचा होतो ; असा एक मोठा अपसमज लोकांमध्ये पसरलेला दिसतो.

गैरसमज टाळण्यासाठी, पुढे जाण्यापूर्वी मला हे स्पष्ट करणे आवश्यक वाटते की, आर्, एस्. एस्., हिंदुमहासभा, विहिंप, सनातन संस्था, या व अशा प्रकारच्या कुठल्याही संस्थेशी, त्याचप्रमाणे कुठल्याही उजव्या-डाव्या-मध्यममार्गी राजकीय पक्षाशी, माझा सुतराम् संबंध नाहीं. तसेंच, गांधीजी यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे, व नथुराम गोडसेकृत गांधीजींच्या हत्येचे मी समर्थनही करत नाहीं.

थोडक्यात काय , तर, कुठलाही bias ठेवून मी माझे विचार मांडत नाहीये. माझे हे विवेचन कुठलाही ‘राजकीय’ हेतू मनात ठेवून केलेले नाही. ते केवळ, माहिती, विचार व लॉजिक, यांवरच आधारलेले आहे ; आणि ते निष्पक्ष असावे याचा मी, या प्रश्नाचा ऊहापोह करतांचा, शक्यतो प्रयत्न केलेला आहे.

पैलू पहिला : भाषा व शब्दार्थ :

सर्वप्रथम , आपल्याला ‘वध’ तसेच ‘खून’ या शब्दांमध्ये शिरायला पाहिजे, कारण तेच तर या झगड्याचे मूळ आहेत. म्हणून, आधी आपण विविध शब्दकोशांचा आधार घेऊन हें कोडे उकलण्याचा प्रयत्न करू या.

१) वध : हा मूळ संस्कृत शब्द आहे, हे सांगायला नकोच.

१.१) सर्वप्रथम आपण, व्ही. एस्. आपटे यांची ‘Sanskrit-English Dictionary’ काय सांगते, ते पाहू या.
* वध् – (क्रियापद) – To slay, to kill
* वध: – (नाम ) – Killing, Murder, slaughter, destruction

* अशाच काही संबंधित शब्दांचे अर्थही याच शब्दकोशावरून पाहू या :

#मनुष्यवध : Homicide ; #वधदंड : Corporal punishment ; #वधस्तंभ : gallows ;
#वधस्थान, वधभूमि, वधस्थली : a place of execution, slaughter-house;
#वधअंगक : a poison ; #वधउद्यत : murderous, an assassin ;
वधअर्ह : deserving capital punishment ; वधजीविन् : a hunter ;
#वधक : an executioner, a hangman, a murderer, an assassin ;
#वधउपाय : a means of killing .

यावरून हे स्पष्ट होते की, ‘वध’ हा शब्द केवळ, ‘मारणे’ ता कृतीशी संबंधित आहे.

१.२) # अमरकोश हा १००० ते १५०० वर्षे जुना संस्कृत ‘थिसॉरस’ आहे. तो काय म्हणतो, ते पाहू या. आधार आहे, अनंतशास्त्री तळेकर यांचा ‘अमरकोशाचा शब्दकोश’.

* वध : घात, मारणे
* हत : नष्ट, मारलेला

(टीप : ‘हत’ हा शब्द ‘हन्’ या धातुवरून – म्हणजे, क्रियापदावरून – आलेला आहे.
हन् म्हणजे, ”मारणे’. )
# हत्या : ( पुन्हा संदर्भ, व्ही. एस्. आपटे यांचा शब्दकोश) : Killing, slaying, murder, particularly criminal slaying.
( टीप : गोपाळ गोडसे यांनी त्यांच्या पुस्तकात ‘गांधीहत्या’ असा शब्द वापरला आहे).

१.३) आतां, ज़रा मराठी कोश पाहू.

* अब्दुस्-सलाम चाऊस यांची ‘मराठी-इंग्रजी डिक्शनरी’ सांगते –
‘वध’ : Kiling, slaughter ; ‘वध करणे’ : To slay, to kill.

* वि. शं. ठाकार यांचा ‘Modern Marathi-Marathi-English Thesaurus’ सांगतो की –
‘वध’ : ठार करणें, हत्या .

* हाच शब्दकोश ‘हत्या’ या शब्दाचे असे अर्थ देतो :
खून, वध, हनन, ठार करणे / ठार मारणे…. ; murder, assassination, manslaughter, homicide, ….

* आतां, याच कोशातील ‘ठार करणें / ठार मारणें’ याचा अर्थही बघू –
वध, खून करणे, मारून टाकणे, जीव घेणें … : Kill, murder, assassinate, shoot,.. .

१.३) हिंदी ही मराठीची सहोदर संस्कृतोद्भव भाषा आहे . तसेंच ती देशातील राष्ट्रभाषा / संपर्कभाषा देखील आहे. त्याचप्रमाणे, हा, वध-खून या शब्दांविषयीचा वाद हिंदीमध्येही होतो.
म्हणून, आपण ज़रा हिंदी शब्दकोशातही डोकावू या.
आचार्य रामचंद्र वर्मा व डॉ. बदरीनाथ कपूर यांचा, ‘लोकभारती बृहत् प्रामाणिक हिन्दी कोश’ काय म्हणतो ते पहा –
‘वध’ : किसी मनुष्य या पशु को जानबूझकर किसी उद्देश्य से मार डालना, हत्या.

२) खून :

हा शब्द फारसीतून मराठीत आलेला आहे, हे सांगायला नकोच. ( मूळ शब्द :ख़ून् ).

२.१) डॉ. माधवराव पटवर्धन (माधव ज्यूलियन) यांचा ‘फार्शी-मराठी कोश’ सांगतो –
खून : हत्या, नरहत्या.

२.२) डॉ. यू. म पठाण यांचा ‘फार्सी-मराठी व्युत्पत्तिकोश’ काय म्हणतो –
खून : मनुष्यहत्या.

२.३) फारसीतून उर्दूमध्ये अनेक शब्द आलेले आहेत. म्हणून, उर्दूची दखल घेणेही योग्य ठरेल.

* श्रीपाद जोशी व निजामुद्दीन एस्. गोरेकर यांचा ‘उर्दू-मराठी शब्दकोश :
ख़ून : रक्त, हत्या.

* मुहम्मद मुस्तफ़ा ख़ाँ ‘मद्दाह’ यांचा उर्दू-हिंदी शब्दकोश :
ख़ून : रक्त, वध, हत्या, क़त्ल .

३) आपण संस्कृत व मराठी शब्दांचे इंग्रजीतील प्रतिशब्द पाहिले. म्हणून, आता, इंग्रजी-मराठी शब्दकोश काय सांगतो ते पाहणेही अगत्याचे ठरेल.

रमेश वा. चिंधडे यांनी सिद्ध केलेली ‘Oxford English-Marathi Dictionary’ काय सांगते –
Murder’ : हत्या करणें, खून करणें.

४) या सर्वाचा सरळ अर्थ असा की, ‘वध’, हत्या’, ‘खून’ , हे बहुतांशी समानार्थी शब्द आहेत.

याउप्परही, कोणी असे म्हणू शकतो की, ‘हे शब्द समानार्थी असतीही, पण त्यांचा वापर रेफरन्स्-टू-कॉन्टेक्स्ट वेगवेगळा असू शकतो’. तें एका अर्थी योग्यही आहे. म्हणून, संस्कृती, पुरातन वाङ्मय, इतिहास वगैरेंच्या आधारने आपण याची चर्चा करू या.

— सुभाष स. नाईक .
दूरध्वनी : (०२२)-२६१०५३६५. भ्रमणध्वनी : ९८६९००२१२६.
ईमेल : vistainfin@yahoo.co.in.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..