या सर्व प्रकारच्या तयारीनंतर कार्यक्रम करण्यासाठी मी अगदी अधीर या झालो होतो. पण भाऊंनी एक वेगळीच कल्पना माझ्यासमोर मांडली. त्यांचे म्हणणे होते की माझा स्वतःचा कार्यक्रम आयोजित करण्याअगोदर मी वेगळ्या कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करावा आणि केवळ आयोजनाचा अनुभव घ्यावा. कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी किती मोठी असते, याची मला थोडी देखील कल्पना नव्हती. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्वतःच्या बॅनरचीही आवश्यकता होती. अनेक महिने परिश्रम करून १९८६ साली स्वर-मंच या कंपनीची स्थापना झाली. यात माझ्याबरोबर काम करण्यासाठी विवेक दातारसारखे अनेक मित्र मदतीला आले आणि माझे मित्र संगीतकार आणि सुप्रसिद्ध सतारवादक श्री. शशांक कट्टी (संगीतकार शांक-नीलपैकी एक) यांच्या सतारवादनाचा कार्यक्रम आम्ही गडकरी रंगायतनच्या भव्य सभागृहात आयोजित केला. कार्यक्रमाची तारीख, थिएटर मिळवण्यापासून, विविध सरकारी परवाने, पोलीस परवाने मिळवून तिकिटे छापण्यापासून ती विकण्यापर्यंत सगळी कामे करता करता एक गोष्ट लक्षात आली की कोणताही कार्यक्रम आयोजित करणे खूपच कठीण काम आहे. मला गायक म्हणून लोकांसमोर यायचे असेल तर सुरुवातीला मला नाव नसल्यामुळे कोणताही मोठा आयोजक माझा कार्यक्रम लावणार नाही आणि त्यात गैर काहीच नाही. म्हणजे आता मला दोन जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. एक म्हणजे माझा कार्यक्रम आयोजित करणे आणि दोन म्हणजे तो संपूर्ण कार्यक्रम कलाकार म्हणून स्टेजवर सादर करणे. एकूण कार्यक्रम या शब्दाची व्याप्ती मला नीट समजली आणि हे सगळे भाऊंनी मला कामातूनच समजावून दिले. भाऊंनी आणि आईने स्थापन केलेल्या ‘निशिगंध प्रकाशन’तर्फे त्यांनी पं. कुमार गंधर्व, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पद्मभूषण किशोरी आमोणकरांपासून माणिक वर्मांपर्यंत अनेक कलाकारांचे कार्यक्रम निशिगंध प्रकाशन संगीत महोत्सवात आयोजित केले होते. भाऊंची शिकविण्याची पद्धत अत्यंत कडक, पण अतिशय परिणामकारक होती. काहीही शिकविताना वडील म्हणून ते कोणतीही सवलत मला देत नसत. मुलगा म्हणून मला काही बाबतीत तरी सवलतीची अपेक्षा असे. कोणत्याही खर्चाच्या बाबतीत पैशांचा हिशोब शेवटच्या रुपयापर्यंत काटेकोरपणे द्यावा लागत असे. मग अनेक वेळा आमचे वादविवाद होत. शिस्तीच्या बाबतीत माझे दोन्ही गुरूही खूपच कडक होते. त्या तरुण वयात ही शिस्त मला त्रासदायक वाटत होती. पण मी शिकत राहिलो आणि त्या शिस्तीचा आणि शिकण्याचा प्रचंड फायदा मला आज होत आहे. या कडक शिस्तीबरोबरच माझे वडील आणि दोन्ही गुरु प्रेमळही होते. त्या वयात शिस्तीचा त्रास झाला, पण त्यांचे प्रेम आज मला जाणवते.
त्या काळात ऑल इंडिया रेडिओसाठी मी अनेक गाणी गायली होती. रेडिओच्या संगीत विभागाचे प्रमुख म्हणून संगीतकार यशवंत देव आणि संगीतकार प्रभाकर पंडित तेव्हा काम पहात होते. माझी गाणी ऐकून एक दिवस संगीतकार प्रभाकर पंडितांनी मला बोलावले आणि माझे माहेर पंढरी ह्या म्युझिकल फीचरमध्ये गाण्याची संधी दिली. ज्येष्ठ गायक वसंत आजगावकरही या फीचरमध्ये गायले. या फीचरमुळे संगीतकार प्रभाकर पंडितांशी चांगली ओळख झाली. त्यांचा मुलगा उत्कृष्ट तबलावादक आणि संगीतकार केदार पंडित याच्याशी मैत्री झाली. अनेक बाबतीत मला संगीतकार प्रभाकर पंडितांचे मार्गदर्शन लाभले. त्यावेळी म्युझिक कॅसेट व्यवसाय जोरात होता. मराठी भाषेतील अभंगांमध्ये यात सर्वाधिक लोकप्रिय नाव होते श्री. अजित कडकडे. त्यांच्या अनेक कॅसेटचे संगीतकार होते प्रभाकर पंडित. प्रभाकरजींनी रेडिओबरोबरच अनेक प्रायव्हेट कॅसेटसूसाठी गाण्याची संधी मला दिली. त्यामुळेच अजित कडकडे, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, रंजना पेठे-जोगळेकर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर माझी गाणी बाजारात आली.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply