नवीन लेखन...

वाघीण भाग 2

किसन्या आता हळू हळू शुद्धीवर यायला लागला होता, त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या समोर सुगंधा उभी होती. तिच्या कडेवर सुऱ्या होता,  त्यांच्या शेजारी संत्या आणि त्याची बायको उभी होती. किसन्याने सुगंधा कडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून आपोआप धारा वाहायला लागल्या. तिला शांत करत तो म्हणाला,” आरं.. वा .. रं… माझी वाघीण..,!  मला एवढ्या मरणाच्या दारातून वाचीवलस.  आणि आता रडतीयास व्हय गं… तुझा नवरा अजून जित्ता हाय बघ तुझ्या म्होरं”… अस म्हणत तो  उठण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला काही उठता आलं नाही, तो एकदम कावरा बावरा झाला.  त्याला काही समजत नव्हतं की त्याची पायातली शक्ती अशी अचानक कशी गेली, म्हणून त्याने अंगावर ओढलेली चादर काढली आणि त्याला एक झटकाच बसला. त्याचा डावा पाय आता गुढग्यापासून खाली नाहीसा झाला होता, अन त्या सरशी त्याच्या तोंडातून जोराचा टाहो फुटला, “आरं देवा…,  हे काय झालं माझं..”

सुगंधालाही आता तिचे अश्रू आवरण कठीण झालं,  बिचाऱ्या सुऱ्याला ह्यातलं काहीच कळत नव्हतं, तो दोघांकडे एकटक पहात उभा होता. किसन्याने त्याला जवळ ओढलं, त्याला कवटाळलं,  त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. आणि आपोआप त्याच्या  डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

हे दृश्य संत्याला बघवत नव्हतं, “आरं, असं कसं करतोय लेका..,  तू बी रडाय लागला, तर बायको पोरासनी काय करावं.”  संत्या किसन्याला शांत करत म्हणाला. तसं किसन्या हळू हळू रडायचं थांबला, पण वारंवार तो सुऱ्याला जवळ करत त्याच्या डोक्यावरून हात फिरवत  होता, त्याला कवटाळत होता.

“संत्या, आर आता मी कसं ह्यांच पोट भरू, यांना काय खायला घालू”.  किसन्या जड अंतःकरणाने सांगत होता. कसं  तरी संत्याने त्याला शांत केलं.

आज तीन दिवस झाले होते, सुगंधा किसन्या जवळच रुग्णालयात होती,तिने त्याची काळजी करण्यात कसलीच कसूर सोडली नव्हती. गेल्या 3 रात्री तिने जागत त्याच्या खाटेजवळ बसतच घालवले होते. सुऱ्या त्या दिवसापासून संत्याकडेच राहत होता.

5 व्या दिवशी किसन्याला रुग्णालयातून सुट्टी मिळाली. पण दर 3 दिवसांनी मलमपट्टी करण्यासाठी त्याला यावं लागणार होतं. घरी आल्यावर सुगंधा ने खाट आडवी केली , त्यावर गोधडी अंथरली आणि किसन्याला  झोपवलं. किसन्या आकाशाकडे डोळे लावत एकटक बघत होता, त्याच्या पाया  शेजारी सुगंधा सुऱ्याला मांडीवर घेऊन बसली होती,  त्याला थोपटत झोपवण्याचा प्रयत्न करत होती.  सगळीकडे भयाण शांतता पसरली होती. पण दोघांच्याही डोक्यात  भविष्या बद्दलचे विचार घोळत होते.

आता घर कसं चालवायचं, हाच मोठा प्रश्न होता. घरचा मुख्य स्तंभच आता आडवा पडला होता. दोघांनाही काहीच सुचत नव्हते, तेवढ्यात संत्या आणि त्याची बायको भाजी आणि भाकरी घेऊन आले .  भाजी भाकरी हातात घेत  झालेली शांतता भंग करत संत्या म्हणाला, “ चला आता, जेवाय पाहिजे, जेवणाची येळ झालीय, पोरालाबी भूक लागली असेल”, अस म्हणत त्याने ती भाकरीची पिशवी सुगंधा कडे दिली, तिने पण खाली मान घालत गुपचूप  पिशवीतून भाकरीचे तुकडे काढले. किसन्या कडे सरकवत,  डोळ्यातून अश्रू सांडत, त्याच्या कडे पाहत  रडू लागली.  संत्याने आणलेली भाजी भाकरी खात किसन्या म्हणाला, “दोस्ता,  तू हायेस म्हणून आधार हाय बघ आम्हासनी”.  त्यावर संत्या  त्याच्याकडे नजर टाकत त्याच्या पाठीवर हात ठेवत बोलला, “किसन्या, आरं समद ठीक होईल बघ,त्यो हाय ना आपल्याकडे बघणारा. त्यो करील काहीतरी”, अस म्हणत आकाशाकडे बघत देवाचे आभार मानू लागला. सर्वांची जेवणं झाल्यावर संत्या आणि त्याची बायको निघून गेले.

हळू हळू किसन्यावर घडलेल्या प्रसंगाची बातमी   संपूर्ण गावात पसरली होती. जो तो त्याला बघण्यासाठी गर्दी करू लागला.  ही बातमी आता सरपंचा पर्यंत जाऊन पोहोचली होती. दोन दिवसा नंतर त्यांनी पण किसन्या आणि सुगंधाची भेट घेण्याचं ठरवलं .

आतापर्यंत घरातलं अन्न धान्य हळू हळू संपायला लागलं होतं. दोघांपैकी कोणीच जंगलात लाकडं आणायला जात नव्हती, त्यामुळे खर्चासाठी त्यांच्याकडे आता पैश्यांची कमतरता भासू  लागली.

आज सरपंच येणार होते, म्हणून सगळा गावच किसन्याच्या घराभोवती  गोळा झाला होता. जो तो त्यांच्यावर घडलेल्या प्रसंगाविषयी सहानुभूती दाखवत होता, पण सर्वांच्या तोंडून एकच कौतुक ऐकू येत होतं,  आणि ते होतं  सुगंधाचं…
तिने दाखवलेल्या शौर्याचं..

“चला चला… बाजूला व्हा.. सरपंच आलेत, चला…”  अस म्हणत कोणीतरी बोलला आणि सर्वाना बाजूला सारू लागला, पांढरा शर्ट, डोक्यावर पांढरी टोपी आणि पांढरे धोतर नेसलेले वयाची साठी पार केलेले सरपंच आता किसन्याच्या घराजवळ पोहचले .  घरात आल्यावर संत्याने त्यांना बसण्यासाठी खाट आडवी करून दिली, त्यावर गोधडी अंथरली, आपल्या मिश्यावर ताव मारत आणि खाटेवर बसत सरपंच बोलले,”  वा.. रं.. मर्दा…, काय हिम्मत दाखवलीस…तू…, तुझं कौतुक करावं तेवढं थोडचं आहे…, आणि सुगंधे… वा.. रं…!  माझी वाघीण…!, एकदम वाघाशीच सामना केलास तू .”  अस म्हणत सुगंधाचं कौतुक करू लागले. सुगंधा त्यांच्या जवळ आली, सरपंचाच्या पाया पडली.  सरपंचाने  तिला जवळ घेतलं आणि मायेने डोक्यावरून हात फिरवत खिशातून पाचशे रुपये काढून सुगंधाला देत बोलले,” पोरी..  तू आपल्या गावाची शान आहेस बघ.., शान.. वाघाशी लढण्यासाठी जिगर लागते पोरी… जिगर….”  अस म्हटल्यावर सुगंधाचा उर दाटून आला आणि सरपंचाच्या पाया पडून ती आतल्या घरात निघून  गेली. थोडा वेळ सरपंच किसण्याशी आणि गावकऱ्यांशी गप्पा मारून निघाले.  गावकरी सुद्धा आता हळूहळू आपापल्या घरी गेले.

सरपंचाने दिलेले पाचशे रुपये जवळ असल्यामुळे सुगंधाला आता  थोडं हायस वाटत होत, त्यामुळे तिचे कसेतरी  4-5 दिवस निघू शकत होते. संत्या आणि त्याची बायको सुद्धा आता जायला निघाले.

घरात पुन्हा एकदा भयाण शांतता पसरली. एका खांब्याशेजारी बसून सुगंधा किसण्याकडे बघत बसली.  ती उद्याच्या विचारात असताना तिचा डोळा कधी  लागला हे  तिला कळलेच नाही.

कसेबसे 4-5 दिवस निघून गेले. पुढच्या दिवशी ची सकाळ नेहमी प्रमाणेच होती, पण या कुटुंबासाठी ती मोठी कष्टाची होती.

सुऱ्या नुकताच खेळून आला होता, सुगंधाचा पदर ओढत म्हणाला,”माय, मले जोराची भूक लागली, काई खायला दे ना…” सुगंधा स्वयंपाक घरात गेली पण तिकडे खाण्यासाठी काहीच शिल्लक नव्हतं. सुऱ्या च मन वळविण्यासाठी ती म्हणाली, “थोडा धीर धर की, सांच्याला तुला खिरपुरी खायला देईन,तुला आवडते नव्ह.” अस म्हणत ती वेळ मारून न्यायचा प्रयत्न करू लागली. सुऱ्या पण संध्याकाळी खिरपुरी मिळणार म्हणून आनंदाने बाहेर खेळायला निघून गेला. पण असं किती दिवस करू शकणार होती ती. मन अगदी सुन्न झालं होतं.

जो पर्यंत रानातून लाकडं नाही आणत तो पर्यंत घरात चूल पेटू शकणार नव्हती. सुगंधाची घालमेल किसन्याला जाणवत होती, पण बिचारा असहाय होता. तो काहीच करू शकत नव्हता.

बराच वेळ विचार केल्यावर किसन्याने रानात जाण्याचा निर्णय घेतला. कसातरी एक हात खाटेवर टेकवून दुसया हाताने खांबा चा आधार घेत खाटेवरून उठण्याचा प्रयत्न करू लागला,पण ते काही त्याला शक्य झालं नाही, आणि तो धाडकन खाली पडला. किसन्याला खाली पडलेलं बघून सुगंधा धावतच त्याच्याजवळ आली आणि म्हणाली,  “कश्याला तरास करून घेतायसा, मी हाय ना, मी जाईन रानात लाकडं फोडाय..”

तसा तो तिला दूर लोटत रागाने म्हणाला, “मी काय मेलो का?, तू चालली मोठी रानात एकटीच जायला”. अस म्हणत तो खाली मान घालून मोठ्याने रडू लागला, त्याच्या असहायतेची  कीव येत  होती त्याला.

थोडा वेळ विचार केल्यावर सुगंधाने निश्चय केला की ती एकटीच रानात जाणार. तिने माजघरात पडलेली कुऱ्हाड काढली आणि एक कटाक्ष किसन्याकडे टाकत रानाच्या दिशेने निघाली. किसन्या खाली मान घालून गुपचूप पडून होता, तो काहीच करू शकत नव्हता, कसंही करून घरात पैसे तर अणायलाच पाहिजे होते, हे तो जाणून होता.

साधारण 1 किलोमीटर सुगंधा चालुन गेली होती, पण तिच्या मानात विचारांचे काहूर माजले होते, ती अचानक थांबली, तिला वाटले, पुन्हा जर असाच हमला झाला आणि माझा जीव गेला तर माझ्या मुलाकडे आणि नवऱ्याकडे कोण लक्ष देईल?, त्यांचा सांभाळ कोण करेल?. या विचाराने ती खूप घाबरली. तीचं मन अगदी सुन्न झालं.  काय करावं आणि काय नाही हेच तिला कळत नव्हतं. अश्या विचारात असताना  तिचे पाय आपोआप तिथेच थबकले आणित्यांनी परतीचा रस्ता धरला.

— भैय्यानंद वसंत बागुल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..