नवीन लेखन...

वाघीण – भाग ३

दुपारचे  दोन वाजले होते,  रखरखत्या उन्हात सुगंधा घराकडे निघाली होती. सकाळपासून अन्नाचा एक दाणा सुध्हा पोटात गेला नव्हता. त्यामूळे तिला थकवा आला  होता. आपली अशी अवस्था आहे, तर आपल्या चिमुकल्याच काय हाल झाले असतील, या विचारत ती होती. तिच्या मनात एकच विचार येत होता की जर मी आता रिकाम्या हाताने घरी गेले तर माझ्या चिमुल्याला खायला  काय देणार.  तीची पावलं झपझप घराच्या दिशेने निघाली.  विचारात मंत्रमुग्ध असताना ती कधी गावाच्या वेशीशेजारी पोहचली हे तिला कळलेच नाही.  ती आपल्या तंद्रीतून बाहेर पडत हताश मनाने एका घराशेजारच्या झाडाखाली बसली. रिकाम्या हाताने  घरी जाण्याची तिची हिम्मत होत नव्हती. तेवढ्यात समोरच्या घरातून तिला  भांडणाचा आवाज ऐकू आला.
तिने  वळून बघितलं तर एक बाई भांडी घासत होती आणि तिची मालकीण तिला ओरडत होती,
“काय गं..  तू  2  दिवसापासून कामावर का नाही आलीस?”.
“बाईसाहेब मला बरं नव्हतं म्हणून नाही आली,” कामवाली उद्गारली.
“तुझं नेहमीचंच आहे हे, मला काय कळत नाही का ?…” बाईसाहेब म्हणाल्या.
दोघांचा पारा हळू हळू वर चढला. एकमेकांवर शब्दांची कुरघोडी करत  आता वाद शिगेला पोहचला होता. ती कामवाली बाई भांडे तशीच ठेवत तावातावाने निघाली.
“ बाईसाहेब तुमच्या एकटीचच काम  नाही करत मी, मला आहेत अजून बरीच काम, मी नाही येणार उद्यापासून, मला माझा पगार पाहिजे उद्या.” तणतणत  ती निघून गेली.
भांडी तशीच धुवायची पडली होती. बिचारी मालकीण बाई बघतच राहिली.
सुगंधाला तिच्या मुलाची आठवण झाली, माझा मुलगा उपाशीच आहे. ही भांडी जर का मी  घासून दिली तर बदल्यात मला भाकरी मागता येतील आणि मी माझ्या मुलाचं पोट भरू शकेल ह्या विचाराने ती  त्या बाई जवळ गेली.
“बाईसाहेब म्या जर का ही भांडी घासली तर चालल का? बदल्यात  मला चतकोर भाकर दया?”.
दचकत ती बाई सुगंधा कडे पाहायला लागली. तिची दशा पाहून आणि तिने केलेली मोबदल्याची मागणी ऐकून त्या बाई ला सुगंधाची दया आली.
त्या दाराजवळ येत म्हणाल्या, “ हो देईन की, तू घसशील ही भांडी ?”. अस म्हणताच सुगंधाने आनंदाने होकारार्थी मान हलवत लगेच कामाला सुरुवात केली.

“ अगं हो.. हो..  थांब जरा, तुझा अवतार बघ, किती थकलीस तू, असं कर, आधी थोडं खाऊन घे मग सावकाश घास भांडी”,  त्या भाजी भाकरी आणण्यासाठी घरात जाऊ लागल्या.
“ नको बाईसाहेब मला लवकर घरी जायाय पाहिजे, माझं पोर घरी एकलंच हाये.”  सुगंधा पटापट भांडी घासू लागली. बाईसाहेबांना सुगंधा मधील प्रामाणिकपणा भावला होता, त्या तिच्या शेजारीच बसून तिचं काम बघत गप्पा मारू लागल्या.
“काय गं, तुझं नाव काय?”.
“सुगंधा” तिने भांडी घासतंच उत्तर दिलं.”
“अच्छा… म्हणजे तूच का ग ती..  वाघाशी सामना करणारी बाई !, मी ऐकलंय तुझ्याबद्दल”. बाईसाहेबांनी आश्चर्य व्यक्त केलं.
“ जी बाईसाहेब म्याच ती”.
सुगंधाला गप्पा मारण्यात आता बिलकुल रस नव्हता, तीचं  सर्व लक्ष घराकडे लागलं होतं. पटापट भांडी  घासून झाल्यावर आपले  ओले हात साडीच्या पदराला पुसत ती भाकरीच्या आशेने तिथेच उभी राहिली. बाईसाहेबांनी तिच्या मनातली इच्छा लगेच ओळखली. त्या लगबगीने घरात गेल्या. थोडी भाजी आणि दोन भाकऱ्या आणून तिला दिल्या. त्या भाकऱ्या सुगंधाने आपल्या पदराला बांधल्या आणि पटापट चालू लागली.
तेवढयात बाईसाहेबांनी आवाज दिला, “ उद्या पासून येशील का कामाला?.”
पण सुगंधाला जास्त वेळ थांबण्याची ईच्छा नव्हती, तीचं मन तिच्या बाळासाठी झुरत होत.  होकारार्थी मान हलवत ती तेथून  निघून  गेली.  बाईसाहेबांना काही समजलच नाही. त्या बिचाऱ्या  रिक्त मनाने तश्याच घरात निघून गेल्या.
सुगंधा घराजवळ पोहचली आणि समोरच दृश्य  बघून तिच्या  काळजात धस्स झालं….
पाण्याचं मडकं फुटलेलं होत. त्याच्या ठिकाऱ्या  झाल्या होत्या. सर्वत्र पाणीच पाणी सांडलं होत,पाण्याचा रंग लाल झाला होता. त्या पाण्यात किसन्या जमिनीवर  आडवा पडलेला होता. त्याच्या डोक्यातून आणि पायातून रक्त वाहत होत. तो अर्धवट बेशुद्धावस्थेत होता., त्याच्या आसपास कोणीही नव्हत.
सुगंधा  धावत त्याच्या जवळ गेली. बाजूला असलेली खाट व्यवस्थीत करत किसन्याला आवाज देत ती त्याला उठवू लागली . अवं उठा ना, काय झालं तुम्हांसनी, उठा ना… उठा…,”
“देवा काय वाईट केलं आम्ही तुझं, का असा तरास देतो आम्हांसनी”.
“अवं उठा ना.. काय झालं तुम्हांसनी,?  अस कसं खाली आला तुम्ही! ,  तुमचं अंग बघा नुसतं  रक्ताने भरलया. असं काय करत व्हतासा तुम्ही?.” किसन्याला हलवत  ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली.  तिच्या आवाजाने तो  हळू हळू शुद्धीवर येत होता.
लागलीच तिने त्याचा डावा हात आपल्या खांद्यावर ठेवला, आणि  तिचा एक हात त्याच्या कमरेभोवती ठेवत ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली, कसंबसं त्याला खाटेवर बसवलं. साडीने त्याचे अंग पुसलं. किसण्याच्या डोक्याला तिने पट्टी बांधली.
“ काय न्हाई ग, मला तहान लागली व्हती  घसा अगदी कोरडा पडला होता आणि तू पण घरात नव्हती म्हणून जरा उठण्याचा प्रयत्न करत व्हतो, पण काय जमलं नाय मला,  घसरून पडलो आणि खांब्यावर डोकं आपटलं बघ ”.
“अवं मग सुऱ्याला आवाज द्यायचा व्हता ना, त्याने दिलं असतं पाणी, तुम्ही कशापायी तरास घेतला!.”
“कुठं गेला तो?, सुऱ्या…. ये सुऱ्या…” सुऱ्याला आवाज देत ती त्याला शोधायला  बाहेर गेली. तेवढ्यात सुऱ्या तिकडून धावत आला. किसन्याचा अवतार बघून तो सुगंधाला बिलगून तिच्या पदराआड लपला. सुगंधाने त्याला कवेत घेतलं.
तिने सोबत आणलेली भाकर आणि भाजी सुऱ्याला दिली,  तो सकाळ पासून उपाशीच होता म्हणून भराभर खाऊ लागला. ती त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत त्याला भरवू लागली. त्याचं पोट भरल्यावर  तो पुन्हा बाहेर खेळायला निघून गेला. उरलेली  भाजी आणि भाकरी सुगंधाने दोघांमध्ये वाटून घेतली.

दुपारी सुऱ्या उशिरा जेवल्यामुळे आणि दिवसभर खेळल्याने तो थकला होता, त्यामुळे  तो रात्री उपाशीच झोपला. रात्री तिघेही उपाशीपोटी च होते.

दुसऱ्या दिवशी सुनंदाला पुन्हा तोच प्रश्न पडला  की आता पुढे काय.?
तेव्हा तिला त्या बाईसाहेबांची आठवण झाली, त्यांनी कामावर बोलावलं होतं. असंही ती एकटी रानात जाऊ शकत नव्हती, म्हणून तिला बाईसाहेबांचाच आधार घ्यावासा वाटला. तिने किसन्याला तिच्या कामाबद्दल सांगितले. त्यानेही नाखुषीने का होईना पण तिला साथ दिली. सुगंधा सुऱ्याला घेऊन बाईसाहेबांकडे गेली. त्यांनी तिला चार हजार रुपये महिन्याने कामावर घेतलं. घरातलं पडेल ते काम तिने करावं असं त्यांच्यात ठरलं. तिच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे त्यांनी तिला हजार रुपये आगाऊ दिले. ते पैसे पगारातून त्या कापून घेणार होत्या.
असे सहा महिने निघून गेले.
इकडे किसण्यासुद्धा कुबडीच्या आधाराने चालू फिरू लागला होता.  आतापर्यंत सुगंधाने बाईसाहेबांच्या मनात चांगली जागा निर्माण केली होती. त्या सुगंधाच्या भरवश्यावर घर सोपवून जाऊ लागल्या . ती पण आपल्या  स्वतःच्या घराप्रमाणे  काळजी घेत होती.

बाईसाहेब म्हणजे देशमुख मॅडम,  ह्या एक प्रसिध्द समाजसेविका होत्या.  त्यांनी वयाची पन्नाशी पार केली होती. त्या शहरातील आणि गावातील लोकांसाठी विविध प्रकारच्या माध्यमातून काम करत असत. त्यांची स्वतःची एक संस्था होती. तालुक्याच्या ठिकाणी त्यांची चांगली ओळख होती. त्यांनी दिलेला शब्द कधी वाया जात नव्हता.  त्यांना दोन मुली होत्या आणि त्या दोघांची लग्न झालेली होती. साहेब हयात नव्हते, त्यामुळे त्या एकट्याच घरात राहत असत. आता सुगंधा त्यांच्या सोबत दिवसभर असायची म्हणून त्यांना पण तिची कामात मदत होत होती.

एक दिवस त्यांच्या घरी काही कामानिमित्त पाहुणे आले होते. त्यांच्यासाठी सुगंधाला नाश्ता बनवायचा होता. तिने त्यासाठी गरमागरम भजी बनवली. चहा सोबत तिने पाहुण्यांना भजी  दिली. पाहुण्यांना तिने केलेला चहा  आणि भजी खूप आवडली.
एवढंच नाही तर त्यांच्यातल्या एकाने देशमुख बाईंना विचारले,
“ मॅडम, भजी कोणत्या हॉटेल मधून मागवली ?”
बाईसाहेबांनी सुगंधाने भजी बनवल्याच सांगितल. त्यांनी तीच तोंडभरून कौतुक केलं..
त्यांनी सुगंधाला हॉटेल टाकण्याचा सल्ला दिला. तिच्या हाताला चव छान आहे असंही ते म्हणाले. पण  सुगंधाला त्यात काही नवल नाही वाटले. ती बिचारी खाली मान घालत घरात  काम करण्यासाठी निघून गेली. पाहुण्यांनी नाश्त्याचा  आस्वाद घेतल्यानंतर बाईसाहेबांची रजा घेतली आणि ते निघून गेले.
सुगंधा घरातील पसारा आवरत असताना बाईसाहेब तिच्याकडे आल्या,
“सुगंधा, पाहुणे तुझं फारचं कौतुक करत होते, खरच तू चहा आणि भजी  छानच बनवली होती, मला  पण वाटत की तू खरच एखादी टपरी टाकावी, चहा भजीची..”
हे आपलं काम नाही असं समजून सुगंधा म्हणाली “ बाईसाहेब हे काय आमचं काम हाय व्हय, एवढा पैका कुठाय आमच्यापाशी, आम्ही कशी टपरी टाकू शकू!,” एवढ बोलून बिचारी पसारा आवरू लागली.
“का नाही करू शकत तू?, तुला पैश्याची मदत मी करीन, तू दे  नंतर हळू हळू , तू काय पळून चाललीस होय,
बघ विचार कर आणि सांग मला”.
बिचाऱ्या सुगंधाची त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया नव्हती.
पूर्वी ती नवऱ्यासोबत त्याच्या मागेमागे रानात लाकडं फोडायला जात होती. तो सांगेल तेच ती करायची. ते विकण्याचं काम पण किसण्याच करायचा. तिला त्यातलं काहीच कळत नव्हतं. आपला नवरा जे सांगेल तेवढंच करायची तिची सवय होती, आणि आता स्वतंत्र व्यवसाय करायचा म्हणजे काहीतरीच…
तिला ते काही पचनी पडत नव्हतं.

घरी गेल्यावर जेवणं झाली.  झोपायची वेळ झाली, तेव्हा पडल्या पडल्या तिला बाईसाहेबांचे शब्द आठवत होते. कसं तरी हिम्मत करून तिने ही कल्पना किसन्याला सांगितली. तो एकदम शांत होता. तिच्याकडे तो रोखुन बघू लागला, कधी तिच्याकडे तर कधी आकाशाकडे तो बघत होता, पण त्याच्या तोंडातून काही शब्द बाहेर येत नव्हते. हे चित्र पाहून तीच मध्ये बोलली,
“जाऊ द्या,  ते काय आपलं काम न्हाई, आणि आपल्याला बी ते जमनार नाही.  आपलं घरकामच बरं हाय.” तिने कुशी बदलून गुपचूप झोपण्याचा प्रयत्न केला. तिला कळलं होतं की किसन्याला  ही कल्पना  आवडली नव्हती.
थोडा वेळ शांततेत गेला.
“ सुगंधे, मी काय म्हणतो…”.
त्याचा आवाज ऐकुन सुगंधा घाबरलीच. तो आता काहीतरी वेगळंच बोलणार असंच तिला वाटू लागलं. ती घाबरून उठून बसली. किसन्याने तिला जवळ बोलावलं, खाटेवर बसायला सांगितलं. ती बिचारी  घाबरत त्याच्या शेजारी बसली.
“तू म्हणतेस ते पटतंय मला, आपण जर धंदा केला तर आपल्याला बी बक्कळ पैका कमावता येईल, तू जर चहा भजी बनिवलीस तर म्या बी गिर्हाईक बघीन की.. आणि मला बी काम मिळल. असाबी नुसताच भाकरी मोडतो म्या, दुसरं काय काम हाय मला.”
त्याच्या या बोलण्याने सुगंधाच्या आशा पल्लवित झाल्या, तिचा उर आनंदाने भरून गेला. तिला पुन्हा आता नवऱ्याची सोबत मिळाली होती. आता ती कोणत्याही संकटाला जुमानणार नव्हती.
“तू सांग बाईसाहेबांना, गाडी बनवून द्या म्हणावं., आपण फेडू त्यांचं पैका, लई मेहनत करू दोघबी…
कसं बी करून त्यांचं कर्ज फेडू”.
दोघांनीही नव्याने कष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना आशेचा नवा किरण दिसत होता.
आता त्यांच्यावरच संकट ओसारण्याची वेळ आली होती. आपल्या जीवनातील दुःख कमी होतील या आशेने ते दोघेही उद्याच्या सकाळ ची वाट पाहत आनंदाने झोपी गेले…..

— भैय्यानंद वसंत बागुल

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..