संख्याशास्त्रात २१ या संख्येची महती विलक्षण आहे. श्रीगणेश उपासनेत तर त्या संख्येचं माहात्म्य असाधारण म्हणावं लागेल.
गणेशाची पूजा करताना २१ संख्येचं पालन कटाक्षाने केलं जातं. गणपतीला २१ दुर्वा वाहतात. त्या वाहताना २१ गणपतींची नावे घेऊन त्या वाहिल्या जातात. मोदकांचा नैवेद्य, पूजेसाठी विड्याची पाने, पत्री वाहताना २१ संख्येचं बंधन स्वखुशीनं पाळलं जातं. किमान दक्षिणा २१ रुपये दिली जाते. गणेशाला प्रदक्षिणाही २१ घातल्या जातात.
गणपतीची वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजवक्र, लंबोदर, विकट, विघ्नराजेंद्र, धुम्रवर्ण, भालचंद्र, विनायक, गणपती, गजानन, ओंकार, मयुरेश्वर, धुम्रकेतू, महोदर, विघ्नराज, ब्रह्मणस्पती, जगदीश, आदिदेव अशी २१ नावे प्रसिद्ध आहेत.
गणेशाला २१ पत्री वाहिल्या जातात त्यांची नावे दूर्वा, मधुमालती, बोर, माका, बेल, धोतरा, आघाडा, तुळस, डोलरी, कण्हेर, शमी, अर्जुन, रुई, विष्णुकांत, जाई, डाळींब, देवदार, केवडा, मोरवा, पिंपळ व अगस्ती अशी आहेत. गणेशाची माहिती असलेली गणेशपुराण, मुद्गल पुराण, ब्रह्म पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, अग्रिपुराण, पद्मपुराण, पद्मपुराण उत्तर, नारद पुराण, शिवपुराण, लिंगपुराण, लिंगपुराण उत्तरार्ध, वराह पुराण, वराह पुराण उत्तरार्ध, वामन पुराण, मत्स्यपुराण, गरुड पुराण, ब्रह्मांड पुराण, भविष्य पुराण, स्कंदपुराण ब्रह्मखंडे, स्कंद पुराण, अवंतीखंड, स्कंदपुराण, भासकंड अशी २१ पुराणे प्रसिद्ध आहेत.
कुठल्याही गणेशस्तोत्राची २१ आवर्तने करतात.
चंद्रलोक, सूर्यलोक, इंद्रलोक असे एकूण २१ सचलोक आहेत. त्यातील शेवटचा श्रीगणेशाचा लोक स्वानंदलोक म्हणून प्रसिद्ध आहे.
२१ संख्येचा एकांक २+१=३ असा येतो. ३ हा अंक भगवान प्रभू श्रीगजाननाचा आहे. गज याचा अर्थ दशदिशा आणि आनन म्हणजे मुख. सर्व दिशा ज्याचे मुख आहे तो गजानन श्रीगजाननाचे सर्व विश्वाला व्यापून टाकले आहे.
आज २१वे शतक चालू आहे.
एकविसाव्या शतकात २१ संख्येची महती लक्षात घेऊन प्रत्येकाने श्रीगजाननाची उपासना करणे अपरिहार्य ठरेल.
(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply