त्या वेळी एसएससीला होतो मी. 1966-67 चा तो कालावधी. अलीकडच्या काळात 10वी 12वी नंतर काय, याची माहिती देणाऱया अनेक संस्था, व्यक्ती आहेत. त्या वेळी ते प्रमाण फारसं नव्हतं. माझ्या घरात तर एसएससी होणारा मीच पहिला ठरणार होतो. पुढे काय, हा प्रश्न इतरांना सतावत असला तरी मला त्याचा त्रास नव्हता. कारण नववी इयत्तेत असल्यापासून काही तरी उद्योग मी करीत आलेलो होतो. त्यामुळं आता काही नवं, भव्य-दिव्य करण्याचं मनात होतं. त्या वेळी मी कोपरगावला राहत होतो. त्याच वर्षी पालिकेनं भाजी मंडईच्या बाजूनं काही गाळे काढले होते. इथं काही तरी करायला हवं. मनाचं विमान कल्पनेचे पंख लावून उडू लागलं आणि एके दिवशी मी पालिकेत गाळ्यासाठी अर्जही केला. आश्चर्य म्हणजे कोणताही वशिला न लावता तो मंजूर झाला. 105 रुपये डिपॉझिट आणि 35 रुपये भाडे, असा तो करार होता. सात बाय आठ या आकाराचा पत्र्याचं छत असलेला गाळा माझा झाला. स्वप्नांना धुमारे फुटू लागले होते. या जागेत कोणता व्यवसाय करायचा, हे माझ्या मनाशी निश्चित होतं.
माझी आई म्हणजे साक्षात सुगरण. तिनं एखादा पदार्थ करावा आणि तो उत्तमच व्हावा, हे समीकरणच बनलं होतं. आमच्या घरातला मसाला तीच करे. कोणत्याही पदार्थावर स्वतची छाप पाडणारा तो मसाला असे. आमच्या परिवारात त्याचा बोलबाला होता. खरं तर त्या काळी प्रत्येक जण घरचा मसाला घरातच करीत असे; पण पुण्याला बेडेकरांचा लोकप्रिय होत असलेला मसाला मी पाहिला होता. त्याची चव घेतली होती आणि आईचा मसाला सरस आहे, याची खात्रीही झाली होती. पुण्यातच मंडईजवळ `प्रकाश’चा झणझणीत मसालाही चाखलेला होता. आईनं रेसिपी द्यायची आणि मी मसाला बनवायचा, अशी माझ्या व्यवसायाची कल्पना होती. एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे
व्यवसायाची तयारी, असं चालू होतं.
मार्चमध्ये परीक्षा झाली आणि मी यंत्रसामग्रीसाठी कोल्हापूरला आलो. तेव्हा डबल हॅमर खलबत्ते तेथे तयार होत त्यांची पाहणी केली, चौकशी केली. काय घ्यायला हवं, काय घ्यायचं याचा विचार पक्का झाला. पुन्हा कोपरगावला आलो. मित्रमंडळीत या काळात कमालीचं उत्साहाचं वातावरण असायचं; कारण त्यांच्यातला एक मी एक नवा
व्यवसाय सुरू करणार होतो. ज्यांना हवा त्यांना मसाला, तिखट कुटून देणार होतो आणि गावोगावी विकणार होतो. `वहिनीचा तयार मसाला’ वहिनीचा यासाठी की आईला मी वहिनी म्हणत असे आणि वहिनीच्या मसाल्यात आपलेपणाचा भाव होता. कदाचित त्या काळात मराठी चित्रपटांचाही प्रभाव असावा. (जसे वहिनीच्या बांगड्या) तर मसाला विक्रीसाठी कुठेकुठे जायचं, संगमनेर, श्रीरामपूरला कोणत्या हॉटेलात मसाले द्यायचे, याचे बेत तयार झाले होते. माझ्या मित्रानं तर एक प्रस्ताव आणला होता. माल पोहोचविण्यासाठी जीप घेऊ म्हणाला. त्या वेळी अवघ्या पाच हजारात जीप सहजी मिळत होती; पण पाच हजार ही फार मोठी रक्कम होती. तो विषय तात्पुरता बाजूला ठेवला तरी आमची तयारी चालू होती. वीज मीटरसाठी अर्ज देणं, कोटेशन मिळविणं, अनेकांशी बोलणं, पॅकिंगची व्यवस्था करणं, मशिन आणणं… किती तरी गोष्टी करायच्या होत्या. रोज तापत्या उन्हातही आम्ही त्या गाळ्यात बसायचो. बाहेर उन्हं, वर तापलेला पत्रा अशी अवस्था असली तरी त्रासदायक नाही वाटलं काही. संध्याकाळी शेजारच्या गाळ्यामधली तयारी, अनुभव अशा गप्पा होतं. माझ्या शेजारच्या गाळ्यामध्ये चहाचं दुकान होतं. वेगवेगळ्या प्रकारचा चहा तिथं विकला जायचा. गुलाब फुलाचा गंध, चॉकलेटचा गंध असलेल्या चहा पावडर हे त्या दुकानाचं वैशिष्ट्य होतं. त्या दुकानदाराचं आणि माझं छान जमत असे. त्याला माझ्या व्यवसायामध्येही रस असावा; कारण `कुठपर्यंत आलं?’ अशासारखी चौकशी सातत्यानं असे. त्याच्या या सौजन्यपूर्ण वागणुकीमुळं मीही त्याचा एक ग्राहक बनलो होतो. माझं एक स्वप्न साकार होण्याच्या दिशेनं माझा प्रवास सुरू झाला होता.
पालिकेचा गाळा घेऊन आता तीन महिने झाले होते. पुढच्या तिमाहीचे भाडेही भरायचे होते. त्या दिवशी पालिकेचे अधिकारी माझ्याकडे आले. भाडे भरण्याची माझी व्यवस्था झाली होती. त्यामुळं त्यांचं हसतच स्वागत केलं. ते म्हणाले, “तुम्हाला इथं तुम्ही ठरविलेला व्यवसाय करता येणार नाही. त्याची नोटीस द्यायला आम्ही आलो आहोत.” माझ्या घशाला कोरड पडली होती. असं कसं, असं का? हे प्रश्न विचारण्याचंही त्राण नव्हतं माझ्यात; पण त्यासाठी फार वेळ थांबावं लागलं नाही. `डबल हॅमर कांडप यंत्राचा शेजारच्या दुकानांना त्रास होईल, मसाल्याचा ठसका उडेल, याची जाणीव पालिकेला झाली आहे. या बाजूच्या सर्वच दुकानदारांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळं हा धंदा इथं नाही करता येणार,’ इतकं सांगून एक नोटीस त्यांनी दिली. माझी सही घेतली. ते निघून गेले. मी थंडपणे बसलो होतो. नंतर काही दिवसांतच मी तो गाळा सोडून दिला. स्वप्नातून जमिनीवर आलो. वहिनीचा तयार मसाला तयार झालाच नाही.
अलीकडेच कोपरगावला गेलो होतो. एस्.टी. स्टँडवरून म. गांधी चौकाकडे जाताना बागेजवळ उगाचच उजवीकडे वळलो. भाजीमार्केटकडे पावले पडू लागली. उजवीकडे कदाचित माझा गाळा एका स्वप्नाचं अस्तित्व सांगत राहिला असता; पण आज इथंही खूप गर्दी होती. गाळ्याकडे वळण्यापूर्वीच आवाजानं लक्ष वेधून घेतलं. तिथं डबल हॅमर कांडपयंत्र धडधडत होतं. मी भानावर आलो.
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.
Leave a Reply