माझं लहानपण सदाशिव पेठेत गेलं.. घराशेजारीच भरत नाट्य मंदिर होतं. सहज जाता येता, तिथे लागणाऱ्या नाटकांचे बोर्ड मी नेहमी वाचायचो.. त्यात ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाचा बोर्ड मी अनेकदा वाचला. घरच्यांनी ते नाटक पाहिलं होतं. त्यांच्या तोंडून ‘ताई’ ची भूमिका आशा काळेनं छानच केलीय, हे वाक्य कानावर पडलं.. पुढे पंचवीस वर्षांनंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क आला.. एका चहाच्या जाहिरातीच्या फोटोसेशनवेळी पडद्यावरील आशाजींशी, मला समोरासमोर बोलता आलं…
आशाताईंचा जन्म कलानगरी, कोल्हापूरचा! लहानपणापासून नृत्याची आवड. कथ्थक व भरत नाट्यमचं रितसर शिक्षण घेतल्यामुळे त्या नृत्याचे कार्यक्रम करु लागल्या. १९६२ साली ‘शिवसंभव’ या नाटकात नर्तकीचे पहिल्यांदा काम केले. सिने-नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवरांनी ते पाहिले. १९६४ रोजी ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाचा शुभारंभ झाला व आशाजींच्या ‘ताई’ने शेकडो प्रयोगांतून लाखों नाट्यरसिकांच्या मनात कायमचं ‘घर’ केले..
भालजी पेंढारकरांनी ‘ताई’ पाहूनच ‘तांबडी माती’ चित्रपटाद्वारे तिला पहिल्यांदा रजतपटावर आणले.. त्यातील सोशिक भूमिका पाहूनच तिला ‘सतीचं वाण’ हा धार्मिक चित्रपट मिळाला.
या चित्रपटापासून सासूचा छळ निमूटपणे सहन करणारी, पतिव्रता सून, तिने अनेक चित्रपटांतून निभावली. हा दुसराच चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला व तिला लागोपाठ असेच, उत्तम चित्रपट मिळू लागले..
बाळा गाऊ कशी अंगाई, सतीची पुण्याई, सासुरवाशीण, थोरली जाऊ, माहेरची माणसं, ज्योतिबाचा नवस, कुलस्वामिनी अंबाबाई अशा चित्रपटांतून तिने टिपिकल सोशिक सूनबाई, सासूबाईच्या भूमिका केल्या तर घर गंगेच्या काठी, कैवारी, हा खेळ सावल्यांचा, गनिमी कावा, हिच खरी दौलत, अर्धांगी, संसार, देवता, चोराच्या मनात चांदणं, आई पाहिजे अशा चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका सादर केल्या.
त्यांनी सुरुवातीपासूनच रंगभूमीशीही इमान राखलं. ‘जुडी’ नंतरचं त्यांचं गाजलेलं नाटक होतं..’गुंतता हृदय हे’! या नाटकाचेही शेकडो प्रयोग झाले.. देव दिनाघरी धावला, बेईमान, लहानपण देगा देवा, वर्षाव, विषवृक्षाची छाया, गहिरे रंग, घर श्रीमंताचं, वेगळं व्हायचंय मला इत्यादी नाटकांतून त्यांनी रसिक प्रेक्षकांचं अखंड मनोरंजन केलं..
चित्रपट व नाटकांच्या जाहिराती करण्याच्या व्यवसायामुळे आशाताईंचे मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथा-संवाद लेखक, कलादिग्दर्शक, संगीतकार माझ्या संपर्कात आले. त्यांच्याकडून आशाताईंविषयी अनेक गोष्टी कळल्या. चित्रपटांच्या प्रिमिअर शोचे वेळी त्यांना प्रत्यक्ष पहात होतो..
चहाच्या जाहिरातीचे फोटोसेशन करताना, ‘एकटा जीव’ पुस्तकाच्या अकराव्या आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी प्रत्यक्ष भेटी झाल्या. जेव्हाही कधी त्यांना पाहिलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सोशीक, सहनशील, सोज्वळ, सुसंस्कृत भाव दिसले.. जे आत्ताच्या ‘डिजिटल’ जगात अभावानेच दिसतात…
त्यांच्या पन्नास वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीचं गमक एकच आहे, ते म्हणजे.. सर्वसामान्य प्रेक्षकालाही ती ‘आपली’च कोणीतरी वाटते.. कुणी तिला ‘आई’ म्हणून पाहतो तर कुणी ‘ताई’ असावी तर अशी म्हणतो.. कुणी तिला ‘सुने’च्या रुपात पाहतो तर एखादीला, आपली ‘सासू’ अशीच असावी असं मनापासून वाटतं..
आशाताईंना चित्रपट व नाट्य सृष्टीच्या सुवर्णकाळातील योगदानाबद्दल अनेक गौरव प्राप्त झाले आहेत. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाचा ‘व्ही. शांताराम’ जीवनगौरव पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, संस्कृती कलादर्पण पुरस्कार, हे आहेत..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२३-११-२१.
Leave a Reply