“इश्क मुझ को नहीं वहशत ही सही
मेरी वहशत तेरी शोहरत ही सही
हम भी दुश्मन तो नहीं हैं अपने
गैर को तुझ से मोहब्बत ही सही”
मिर्झा गालिब यांच्या एका सुप्रसिद्ध गझलेतील या ओळी म्हटले तर दरबारी रागाची तोंडओळख दाखवतात अन्यथा एका प्रेमी मनाची हैराणी अवस्था दर्शवतात. दरबारी राग हा असाच आहे, एकाच वेळी मानवी भावनांच्या अनंत छटा दर्शवून रसिकांना चकित टाकणारा. खरतर हे वैशिष्ट्य बहुतेक सगळ्या रागदारीबद्दल मांडता येईल.
लखलखती झुंबरं, लालगर्द गालिचा, आजूबाजूला खाशा स्वाऱ्या, प्रशस्त दालनाच्या एका टोकाला; पण मध्यभागी रत्नजडीत सिंहासन. सर्वत्र गंभीर वातावरण. तरीही, अत्तराच्या फवाऱ्यानं सुगंधित झाल्याने वातावरणात काहीसा हलकेपणा. दालनाच्या बरोबर मध्यभागी खास बिछायत अंथरलेली आणि त्यावर वाद्यं मांडून ठेवलेली आणि सगळेजण राजगायक येण्याची आतुरतेने आहेत. अशा अत्यंत आलिशान दरबारात राजगायकाचे आगमन होते आणि त्याच्या सोबत, कोमल धैवत आणि कोमल निषाद स्वरांची चाहूल लागते.
दरबारी राग ऐकताना, मनासमोर असंच वैभवशाली चित्र उभं राहतं. संगीतसम्राट तानसेननं अकबर बादशहाच्या विनंतीवरून आणि त्याच्या दरबाराच्या मांडणीतून हा राग तयार केला, असं इतिहासात वाचायला मिळतं. अर्थात, याला तसा शास्त्राधार काही नाही. मात्र, हा राग अतिशय वैभवशाली आहे. यात सगळे स्वर लागत असल्यामुळे या रागात स्वरविस्ताराला भरपूर वाव असतो. म्हणून हा खऱ्याअर्थी ‘संपूर्ण’ राग आहे. यात ‘गंधार’ स्वर इतका ‘कोमल’ लागतो की, कधीकधी आधीच्या ‘रिषभ’ या स्वराशी नातं जाणवून देतो. अर्थात, असा प्रकार ‘अवरोही’ स्वरांत दिसतो, म्हणजे त्याचं ‘मध्यम’ स्वराशी नातं जोडलेलं असतं. या रागाची प्रकृती गंभीर. त्यामुळे तो गाणाऱ्या गायकाची परीक्षाच असते. म्हणून कदाचित बहुतेक गायकांच्या हा राग पचनी पडत नसावा. याची आलापी तर फारच कठीण. मंद्र सप्तकातून सुरुवात होते, ‘गंधार’ स्वर आंदोलित पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे गायकाचा रियाज किती ‘कसदार’ आहे, याचा पडताळा घेता येतो. या रागाची स्वरसंहती बघितल्यास, “सा सा रे रे सा नि सा”,”म ग म रे सा”,”नि ध नि ध नि नि सा”. या स्वरसंहितीवरून आपल्याला या रागातील प्रमुख स्वरांची ओळख करून घेत येते.
सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलेलं. वातावरणात एकांत इतका की, साध्या काजव्याचं कुजबुजणंही अंधारावर ओरखडा उमटवून जाईल. वाराही झुळकीच्या स्वरूपात स्वत:चं अस्तित्व दाखवतोय. त्यामुळे वातावरण थंडगार, स्निग्ध झालेलं. चंद्राचा प्रकाश आपलं नाममात्र अस्तित्व दाखवतोय. अशा वेळी दूरवरून पंडित हरिप्रसाद चौरसियांच्या बासरीचे हलके आलाप कानावर येतात.
सुरांची अनुभूती, या शब्दाची प्रचिती यावी तर अशी! फक्त आलापी! त्याला तालवाद्याचा धक्काही सहन होणं अवघड. अत्यंत नाजूक; पण लपेटदार स्वरांची वळणं… हे सर्व आपल्याला फक्त ‘दरबारी’ रागाचीच आठवण करून देतं. याचा प्रत्येक स्वर इतका शांत, गंभीर असतो की, तिथं स्वत:चा श्वास आणि त्याचा आवाजही नको वाटावा! स्वरांचं ते ‘आत्मगत’ वळण, आपल्याला संमोहित करतं. इथं स्वरांची ‘जात’ कळून येते. याचं तंतोतंत प्रात्यक्षिक या वादनातून समजून घेता येईल. यात, ‘आंदोलित’ गंधार स्वर आणि त्याचं संपूर्ण सप्तकातील अस्तित्व, याची खुमारी जाणता येते. त्याचसोबत स्वरभाषा म्हणजे काहीतरी न कळण्यासारखा विषय आहे, ही समजूत खोडून काढण्यासही मदत होते.
सुगम संगीतात या रागावर आधारित भरपूर गाणी आहेत. शांत, नीरव अंधाराचं नेमकं प्रत्यंतर ‘मीलन’(१९५८) चित्रपटातील ‘हाये जिया रोये’ या गाण्यात येते.
वास्तविक हे गाणं तसं प्रसिद्ध नाही; पण या गाण्यातील, लताताईंची गायकी अपूर्व आहे. यात दरबारी रागाची केवळ ‘छाया’ आहे. बहुधा, संगीतकार हंसराज बहेल यांना या रागातील एखादी ‘फ्रेज’ ऐकून, त्यातून या असामान्य गाण्याची चाल सुचली असणार. अर्थात, हा केवळ तर्क आहे. लताताईंच्या सगळ्या सप्तकात सहजगत्या विहार करण्याच्या असामान्य कुवतीचा या गाण्यात पुरेपूर वापर करण्यात आला आहे. या गाण्यातील विरहाची भावना इतकी टोकाची आहे की, आपण ऐकताना थक्क होतो. सुरुवातीच्या ‘हमिंग’मधून या रागाची थोडी कल्पना येते आणि पार्श्वभागी वाजत असलेल्या बासरीनं त्याचं स्वरूप स्पष्ट होतं. चालीचा ‘मुखडा’ बांधताना या रागाचे काही सूर घ्यायचे; पण पुढे चाल आणि राग स्वतंत्रपणे आपापला मार्ग शोधीत जातात. इथे हेच झालं आहे. सुरुवातीला ‘रिषभ’ आणि ‘पंचम’ या दोन स्वरांच्या आधारे इतर स्वर जोडून घेतले, त्याला ‘कोमल’, ‘गंधार’ स्वराची विलक्षण जोड दिली आणि त्यातून चाल झाली.
संगीतकाराची बुद्धिमत्ता अशा वेळी दिसून येते. पुढे या गाण्याची चाल रागापासून दूर जाते, म्हणजे नक्की काय होतं? त्यासाठी ‘तुमने तो देखा होगा, ई चांद तारो’ ही ओळ ऐकावी. ‘तुमने’मधील ‘तु’ शब्दावर किंचित वजन देऊन तो शब्द उच्चारला आहे… आणि क्षणात लताताईंचा आवाज वरच्या स्वरांत जातो, अगदी टिपेला पोहोचतो, तो ‘तारो’ या शब्दापर्यंत. स्वर सतत ‘चढता’ आहे. हे ‘वळण’ साध्या गळ्याला पेलणारं नाही. या चालीच्या स्वरांत कुठेही नेमका ‘दरबारी’ दिसत नाही. म्हणजे बघा, सुरुवात या रागावर; पण पुढे चाल त्याच स्वरांच्या साक्षीनं; पण वेगळी वाट चोखाळते. सुगम संगीतात प्रयोग करायला तसा वाव कमी असतो, पण तरीही अशा ठिकाणी संगीतकाराला वाव मिळतो.
दुसरं गाणं जरा वेगळ्या धाटणीचं आहे. एकतर त्यात दरबारी ‘शोधायला’ लागतो आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, दरबारी म्हणजे गंभीर, असं जे चित्र निर्माण होतं, ती ओळख आपल्याला पूर्णत: पुसून टाकावी लागते. अर्थात, असा प्रकार अनेक रागांच्या बाबतीत घडला आहे. जुन्या ‘आझाद’ चित्रपटातील ‘कितना हंसी है मौसम, कितना हंसी सफर है’ हे गाणं अतिशय बारकाईनं ऐकलं, तर एक-दोन ठिकाणी दरबारी रागातील स्वरांची झलक ऐकायला मिळते.
अर्थात, राग डोळ्यासमोर ठेवून गाण्याची चाल बनवली, तर लगेच त्याचा अदमास घेता येतो. इथं चाल आधी तयार झाली आणि मग त्या गाण्याच्या सुरावटींचं दरबारी रागाशी कुठेतरी नातं जुळलं. अत्यंत हलकीफुलकी आणि त्या गाण्यातील शब्दांच्या भावार्थाशी नेमकी जुळणारी चाल आहे. रागाच्या प्रकृतीशी फटकून वागणारी ही चाल दरबारी रागावर आहे, हे मानायलाच मन तयार होत नाही. ही किमया अर्थात, संगीतकार सी. रामचंद्र यांची. ‘मिलती नही मंझील राही हो जो अकेला’ या ओळीत या रागाशी नातं सांगणारे सूर सापडतात; पण तरीही स्वरांची ‘ठेवण’ भिन्न आहे. म्हणजे या कडव्याची सुरावट दरबारीच्या सुरांशी मिळतीजुळती आहे; पण जेव्हा गाणं पुन्हा मूळ ध्रुवपदाकडे वळतं, तेव्हा हीच चाल आपला नवीन मार्ग सोडून, मूळ मार्गावर येते. हेही संगीतकार म्हणून सी. रामचंद्र यांचंच कौशल्य!
दरबारी रागाचं खरं वैभव दाखवून देणारं आणखी एक गाणं म्हणजे, ‘तू प्यार का सागर है’. यात दरबारी रागाच्या श्रीमंतीचं पुरेपूर दर्शन घडतं.
रागाची गंभीर वृत्ती, शांत स्वभाव आणि स्वरांचं मंद्र सप्तकातील चलन. आंदोलित ‘कोमल गंधार’, तसंच ‘रिषभ’ आणि ‘पंचम’, या दोन प्रमुख स्वरांचं नातं. गाण्याचा सुरुवातीचा जो वाद्यमेळ आहे, ऑर्गन आणि व्हायोलिन, त्यांच्यातून जी सुरावट निर्माण होते, ती दरबारी रागाची खूण. अगदी नेमके सूर या वाद्यमेळातून निघतात. तोच गंभीर भाव, तेच शांत सूर आणि गायक मन्ना डे यांचं अतिशय परिणामकारक गायन. परिणामी हे गाणं अजरामर झालं.संगीतकार शंकर/जयकिशन या जोडगोळीने हे गाणे स्वरबद्ध केले आहे. गाण्याच्या सुरवातीला, “ऑर्गन” सारख्या अति गंभीर वाद्यातून आपल्याला या रागाची खूण पटते. पुढील रचनेवर, याच रागाची सावली तरळत असते आणि रागच जो मूळचा गंभीर भाव आहे, त्याचीच प्रचीती ऐकताना मिळते.
भारतीय चित्रपट संगीत किती विविधतेनं नटलेलं आहे, याचा आणखी एक पुरावा. ‘अगर मुझसे मुहब्बत है, मुझे सब अपने गम दे दो’ हे गाणे.
हे असंच आणखी एक सुंदर गाणं. यात लताताईंच्या सर्वव्यापी गायकीचा पुरेपूर वापर केला आहे. चालीला अतिशय अवघड; पण तितकंच सुश्राव्य. मदन मोहन यांच्या शैलीतील एक प्रातिनिधिक गीत, असं याचं वर्णन करता येईल. गाण्याच्या सुरुवातीला जो व्हायोलिनवरील सुरांचा तुकडा आहे, त्यातून या रागाची ओळख होते. गमतीचा भाग म्हणजे, पुढे ही ओळख पुसट होत जाते. इतकी की, या गाण्याची चाल हे एक स्वतंत्र प्रकरण होतं! हे फार अवघड चालीचं गाणं केवळ लताबाईंच्याच गळ्याला साजेसे असे हे गाणे आहे. वास्तविक या संगीतकाराच्या रचना ऐकल्या तर आपल्याला लगेच जाणीव होते, याची संगीतकाराची प्रकृती ही मुळात “गीतधर्मी” आहे, त्यामुळे गाण्याची चाल किती अवघड असली तरी गाणे ऐकताना, अतिशय सुश्राव्य वाटते आणि हीच तर या संगीतकाराची खासियत आहे.
“दैय्या रे दैय्या लाज मोहे लागे” हे गाणे वास्तविक रंगमंचावरील “नृत्य गीत” आहे आणि नृत्य गीत जसे असायला हवे, त्याच प्रकृतीने बांधलेले आहे. संगीतकार नौशाद यांची रचना आहे आणि आशा भोसले यांनी गायलेले आहे. गाण्यातील खटके तसेच धारदार हरकती, ही खास सौदर्यस्थळे आहेत. आशा भोसले यांच्या आवाजातील ही नजाकत नेमकी ध्यानात घेऊन, नौशाद यांनी गाण्याची चाल बांधली आहे. आता रंगमंचावरील नृत्य असल्याने, गाणे जलद गतीत आहे. वैजयंतीमाला या अभिनेत्रीच्या नृत्यकौशल्याचा अतिशय सुरेख उपयोग करून घेताना, गाण्याची रंगत वाढलेली आहे. गाणे जिथे संपते, तिथे एक छोटीशी सतारीची गत आहे, ही गत म्हणजे दरबारी रागाची स्पष्ट खूण.
काही वर्षांपूर्वी “साजन” नावाचा हिंदी चित्रपट आला होता आणि त्यातील बहुतेक सगळीच गाणी खुप गाजली होती. त्या चित्रपटात, “देखा है पहेली बार, साजन की आंखो में प्यार” हे गाणे देखील खूप गाजले होते. या गाण्यातील काही सांगीतिक वाक्यांश दरबारी रागाशी नाते सांगतात. संगीतकार नदीम/श्रवण या जोडीने या गाण्याची तर्ज बांधली आहे. चाल अतिशय सोपी आहे, अलका याज्ञिक आणि बाल सुब्रमणियम यांनी गायलेले युगुलगीत आहे. सुंदर प्रणयी भावनेचे गीत आहे आणि गाण्यातील ठेका, आपल्याला डोलायला लावतो.
दरबारी रागाची अशीच खासियत आहे. नावाप्रमाणे रागाचे सून आपल्याला रागाची “शान-ओ-शौकत” दर्शवित असतात आणि हेच ऐट, स्वरांचे ऐश्वर्य, स्वरांची अथांग गंभीरता आपल्या मनावरून कधीच पुसून टाकता येत नाही. कुठल्याही स्वरावलींचे हेच तर मूळ उद्दिष्ट असते किंवा असावे.
— अनिल गोविलकर
Leave a Reply