रोग प्रतीबंधक अथवा रोग प्रतिकारासाठी लागणारे वैद्यकिय संशोधन आज एका गुंतागुंतीच्या वळणावर थबकले आहे. एका बाजूस मलेरिया, विषमज्वर, क्षय सारख्या जुन्या रोगांवर प्रभावी नवीन औषधे बाजारात येत नाहीत. त्याच वेळी एड्स, स्वाईनफ्लू आणि आता एबोलासारख्या रोगांचे जीवाणूचा प्रसार होत आहे. दुसऱ्या बाजूस नँनो टेक्नॉलॉजी [Nano technology] सारखे प्रभावी शास्त्र आधुनिक विज्ञानाने उपलब्ध करून दिले आहे. परंतु या विज्ञानाचा उपयोग करून नवीन संशोधनाने औषधे अथवा लस निर्माण करण्यासाठी संशोधकांचे पुढील रस्ते वैद्यकीय नीतीच्या ‘नो एन्ट्री’ पुढे हतबल झाले आहेत. वैद्यकिय नीतीशास्त्र, माणुसकी, मानवता, यावर उभारलेले आहे. तसा हा वाद जुना आहे. मध्यमयुगी काळापर्यंत म्हणजे सतराव्या शतकापर्यंत मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आणि शस्त्रक्रियांसाठी क्रूर पद्धती वापरल्या जात होत्या. नवीन औषधांचा वापर रोग्यांवर त्याच्या माहितीशिवाय आणि परवानगीशिवाय ट्रायल अँड अेरर पद्धतीने केला जात होता. या गोष्टीना समाजातील नीतिवान घटकांनी मानवतावादी विचारांनी विरोध करण्यास सुरवात केली. विसाव्या शतकात या विचारांना संघटित स्वरूप आले आणि पाश्चात्य जगात या बाबतीत कायदे निर्माण झाले. हे कायदे आता अधिक कडक झाले आहेत. हे परस्पर विरोधी विचार एकमेकांना छेद देत आहेत. या छेद बिंदूचा सखोल संशोधनात्मक अभ्यास ठाण्यातील मध्यमवर्गाय तरुणी डॉ. प्रिया साताळकर करीत आहे.
शालेय वर्षांपासून अभ्यासू म्हणून ओळख असलेल्या प्रियाचा संवेदेनशीलता हा स्थायी स्वभाव. जिज्ञासा संस्था गेली एकवीस वर्षे प्रकशित करत असलेल्या शालेय जिज्ञासा या नियतकालिकाची प्रिया ही प्रथम संपादिका. सरस्वती सेकंडरी स्कूलमधील ही हुषार विद्यार्थ्यांनी १९९५ साली शालांत परीक्षेत मुंबई विभागात गुणवत्ता यादीत आली होती. शालांत परीक्षेनंतर प्रियाचा गेल्या वीस वर्षाचा शिक्षण प्रवास हा निश्चितच यशस्वी आणि स्फूर्तीदायक आहे. १९९९-२००१ वर्षात रतन टाटा शिष्यवृत्तीधारक, २००३ साली मुंबई विद्यापीठातून होमराजगी कामा सुवर्ण पदकासहित एम.बी.बी.एस. पदवी. २००७ साली ब्राक विश्वविद्यालय, ढाक्का बंगलादेश येथून सार्वजनिक आरोग्य विषयात एम.एस.सी. २००९ मध्ये Amsterdam Netherland येथून वैद्यकीय मानव वंशशास्त्र या विषयात एम.एस.सी. २०१० वर्षात युरोपमधील इटाली, बेल्जियम आणि नेदरलँड्स या देशातील तीन विद्यापीठांनी संयुक्तपणे एका विशेष मोहिमे अंतर्गत मास्टर्स इन बायोएथिक्स हा विशेष अभ्यासक्रम तरुणासाठी आखला होता. प्रियाने या अभ्यासक्रमात सहभागी होऊन वरील विषयाची एमएससी. हि पदवी तिन्ही विद्यापीठांकडून मिळवली. या दीर्घकालीन शिक्षण प्रवासामध्ये तिने उत्तर प्रदेशातील सीतापुर जिल्ह्यात W.H.O. या आंतरराष्ट्रीय संस्थेत वैद्यकिय अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर दिल्ली येथील Family health International या संस्थेत तांत्रिक सल्लागार म्हणून काम केले.या दोन्ही अनुभव संपन्न कार्याचा तिला पुढच्या शिक्षणात नक्कीच फायदा झाला. प्रिया सध्या स्वित्झर्लंड येथील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रासेल येथे पी.एचडी करीत आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे ‘आधुनिक विज्ञान शास्त्रातील अतिसूक्ष्म तंत्रज्ञान आणि वैद्यकिय नितीमत्ता’ हा तिच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. अतिसूक्ष्म तंत्रज्ञान [Nano Technology] हे गेल्या काही वर्षात विकसित झालेले आधुनिक तंत्रज्ञान आहे. अतिसूक्ष्म म्हणजे एक मीटर लांबीच्या कणाचा [particle] शंभर कोटीवा भाग [n=[0.000000001]. या मापनाच्या अतिसूक्ष्म कणामधील विविध गुणधर्मामध्ये बदल होऊ शकतात उदाहरणार्थ इलेक्ट्रो मँग्नेटीक रासायनिक, भौतिक, दृश्य, [elctro magnetic ,chemical-physical- optical-.] या प्रक्रियाचा उपयोग मानवी शरीरात नवीन औषधांचा डोस अतिशय काटेकोरपणे आणि नेमकेपणाने विषाणू व्याप्त पेशी अथवा जीवाणूपर्यंत पोचवण्यासाठी अतिशय कौशल्याने केला जातो. या कणांच्या अतिसूक्ष्म आकारमानामुळे ते शरीरातील कुठल्याही पेशींपर्यंत पोचू शकतात. या कणाचा पृष्ठभाग त्याच्या आकाराच्या प्रमाणात मोठा असल्याने दिलेल्या औषधांचा मानवी शरीरातील पेशींवर होणारा परिणाम आणि त्याची प्रतिक्रिया समजून घेता येतात. हा अति सूक्ष्मकण, रोगाचे निदान आणि उपचार अशा दोन्ही भूमिका पार करू शकतो. यास theargnostics असे म्हणतात. ही सर्व प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण कॅन्सर रोग्याचे उदाहरण घेऊ. अशा रोग्याला अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जर नवीन कुठल्या औषधाचा डोस दिला तर हे कण कॅन्सर पिडीत पेशींना शोधून त्यांना नष्ट करतील. निरोगी पेशी त्यामुळे सुरक्षित राहतील. केमो थेरेपी मध्ये निरोगी पेशीपण नष्ट होण्याचा धोका असतो तो या पद्धतीत टाळला जाऊ शकतो.
हे सर्व इतके चांगले असताना विनाकारण वाद कशा करता आणि नितीमत्तेचा प्रश्न कुठे येतो असा प्रश्न तुम्हा आम्हाला पडतो. परंतु इथेच तर खरी गोची आहे. कणांचा अतिसूक्ष्मपणा हा जसा फायदेशीर घटक आहे तसा तोच त्याचा दुर्गुण पण असू शकतो. यांच्यामुळे होणाऱ्या वाईट परिणामांचा अजून पुरेसा अभ्यास झालेला नाही. यामुळे काही प्रश्न उभे राहतात. उदाहरणार्थ त्याच्या पासून तयार होणाऱ्या काही घातक विषारी पदार्थ मानवाच्या शरीराबाहेर पडतात का व त्याचे दुष्परिणाम रोग्याच्या शरीरावर आणि पर्यावरणावर होतात का? याचा वापर करताना औषधांचा कमी जास्त डोस कसा ठरविणार?
मानवावर औषधांचा वापर करण्या अगोदर उंदीर, ससे, माकडे, यांच्यावर उपयोग केला जातो. त्याचा अगोदर खोल अभ्यास केला जातो. त्याची उपयुक्तता आणि निर्धोकपणा सिद्ध झाल्यावरच मानवी रोग्यावर त्याचा वापर केला जातो. इथे परत वैद्यकिय नितीमत्ता आडवी येते कारण शेवटी प्राण्याचे शरीर आणि मानवाचे शरीर सारखे नाही आहे. सर्वात कळीचा प्रश्न उरतोच याचा वापर करण्यासाठी, रोगी निवडताना कसोट्या कुठल्या लावणार?
हे सर्वच प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत आणि म्हणूनच नीती अनितीचा मुद्दावादासाठी उभा राहतो. यातील शेवटच्या मुद्यावर प्रियाने मागीलवर्षी ईबोलाच्या अत्यंत जीवघेण्या साथीच्या पाश्र्वभूमीवर एक पेपर सादर केला होता. अत्यंत थोड्या वेळात या संहारकारक रोगावर औषध शोधल्यावर त्याचा वापर कोणावर आधी करावाचा याची अनेक प्रश्ने उभे राहतात. शेवटच्या अवस्थेत असलेल्या रोगावर, वाचवू शकणाऱ्या इतर रोग्यांवर, आरोग्य सेवा करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसवर अथवा परदेशी स्वयंसेवकावर? नीती – अनीतीच्या कसोटीवर या सर्व प्रश्नावर एकमत होणे कठीण आहे.
नीती- अनितीच्या छेद बिंदूचा शोध घेण्यासाठी प्रियाने एक सखोल प्रश्न मालिका तयार केली आहे. यामध्ये वरील सर्व प्रश्नाचा समावेश केला आहे. या विषयांशी निगडीत असलेल्या विविध क्षेत्रातील जागतिक पातळीवरील ४८ तज्ञ व्यक्तींना ही प्रश्न मालिका पाठवू त्यांची उत्तरे मिळवली आहेत. सध्या ती मिळालेल्या उत्तरांचे विश्लेषण करीत आहे. पुढील सहा महिन्यात हे काम संपवू प्रबंध सादर करण्याच्या तिचा मानस आहे.
सर्व जगाच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या या विषयाचे सापेक्षपणे विवेचन करण्याच्या तिच्या प्रयत्नांना मन:पूर्वक शुभेच्छा.
सुरेंद्र दिघे.
Leave a Reply